देवाच्या अखंड अनुसंधानात रहाणार्‍या श्रीमती शेऊबाई लोखंडेआजी संतपदी विराजमान !

सनातनच्या संतांच्या मांदियाळीत ६४ व्या संतरत्नाची भर !

पू. लोखंडेआजी यांच्या कन्या श्रीमती
इंदुबाई श्रीधर भुकन यांनीही गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

डावीकडून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, पू. (श्रीमती) लोखंडेआजी आणि श्रीमती भुकन

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) : सर्व भार देवावर सोपवून निरागसपणे सतत देवाच्या अनुसंधानात रहाणार्‍या श्रीमती शेऊबाई मारुति लोखंडेआजी (वय ८१ वर्षेे) यांनी संतपद प्राप्त केले आणि त्यांच्या कन्या श्रीमती इंदुबाई श्रीधर भुकन (वय ५२ वर्षे) याही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या, असे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात ७ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या एका सत्संग सोहळ्याच्या वेळी घोषित केले. ‘पू. लोखंडेआजींविषयी ‘सर्व संत आतून सुंदर असतात. सनातनच्या संतांमध्ये श्रीमती लोखंडेआजी अंतर्बाह्य सुंदर आहेत’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी म्हटले आहे. पू. आजींना ओळखायला आम्हीच न्यून पडलो. श्रीमती लोखंडेआजी या सनातनच्या ६४ व्या व्यष्टी संत झाल्या’, असे सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू म्हणाल्या. या वेळी पू. (श्रीमती) लोखंडेआजी यांचा सन्मान सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पुष्पहार घालून आणि भेटवस्तू देऊन केला, तर श्रीमती इंदुबाई भुकन यांचा सत्कार सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांनी भेटवस्तू देऊन केला.

१५ दिवसांपूर्वीच एकादशीला रामनाथी येथील सनातन आश्रमातील १२ साधक जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाल्याचे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घोषित केले होते. योगायोगाने ७ फेब्रुवारी या दिवशीही एकादशीच होती आणि याच दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी आनंदवार्ता दिल्याने सर्वच साधक भावविभोर झाले. पू. (श्रीमती) लोखंडेआजी यांनी अनेक वेळा पंढरपूरची पायी वारी केली आहे. तसेच भुकन कुटुंबियांनी वारकर्‍यांची माळ धारण केली आहे. श्रीमती भुकन यांचे संपूर्ण कुटुंब काही मासांपूर्वी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आले. व्यावहारिक जीवनातील सर्व गोष्टींचा त्याग करून एकाच कुटुंबातील ४ पिढ्यांनी आश्रमजीवन स्वीकारले, हे या कुटुंबाचे वैशिष्ट्य आहे. सर्वांसाठी आदर्श ठरलेल्या या कुटुंबियांचे वैशिष्ट्यपूर्ण मनोगत जाणून घेण्यासाठी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी या सत्संग सोहळ्यात कुटुंबातील प्रत्येक सदस्याची मुलाखत घेतली. या सोहळ्याचे प्रास्ताविक आश्रमातील साधिका कु. निधी देशमुख यांनी केले. या सोहळ्याच्या वेळी श्रीमती भुकन यांचे पुत्र श्री. रामेश्‍वर भुकन, त्यांच्या पत्नी सौ. उर्मिला भुकन, महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली चि. वेदश्री रामेश्‍वर भुकन (वय ४ वर्षे), श्रीमती भुकन यांचे द्वितीय पुत्र श्री. वाल्मिक भुकन आणि त्याची होणारी पत्नी कु. रोहिणी गुरव, सौ. मनीषा गायकवाड (श्रीमती भुकन यांच्या कन्या), त्यांचे पती श्री. दामोदर गायकवाड, मुलगा कु. आशुतोष गायकवाड यांच्यासह अन्य साधक उपस्थित होते. या वेळी पू. लोखंडेआजी आणि श्रीमती भुकन यांनी त्यांच्या जीवनातील कठीण प्रसंगांमध्ये देवाने त्यांना कसे साहाय्य केले, याविषयी मनोगत कथन केले. पू. लोखंडेआजी यांनी एक तेजस्वी संत त्यांच्या घरी येऊन जेवण करून गेल्याची, तसेच श्रीकृष्ण, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून दर्शन झाल्याच्या अनुभूतीही या वेळी कथन केल्या.’

क्षणचित्र : भावसोहळ्याच्या वेळी पू. लोखंडेआजी गुलाबी रंगाच्या नऊवारी साडी नेसल्या होत्या. पू. लोखंडेआजींना भेटस्वरूप दिलेली साडीही गुलाबी रंगाचीच होती.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी भावसोहळ्यात
भुकन कुटुंबियांच्या मुलाखतीच्या वेळी केलेले भावपूर्ण मार्गदर्शन

१. ‘मोठ्या वयात स्थिरावण्याकडे, निवांत रहाण्याकडे कल असतो; मात्र अशा वयात देवाला शरण येणे, ही महत्त्वाची गोष्ट आहे.

२. साधनेत श्रद्धा आणि सबुरी ठेवावी. (सत्संग सोहळ्यात प्रारंभी तांत्रिक अडचणींमुळे विलंब होत होता, त्या वेळी सद्गुरु गाडगीळकाकूंनी अशा प्रसंगांकडे साधनेच्या दृष्टीने कसे पहायचे, हे तत्त्व साधकांना या वेळी शिकवले.)

३. खरी सुंदरता ही मनाची असते. संत सुंदर दिसतात; कारण त्यांच्याकडे मन आणि बुद्धी यांचे सौदर्य असते. मनाच्या निर्मळतेमुळे संतांमध्ये निरागस बालकांप्रमाणे सुंदरता असते. त्यामुळे पू. लोखंडेआजी अंतर्बाह्य सुंदर दिसतात. संतांची बुद्धी ही ईश्‍वरी प्रेरणेने चालते. संतांमध्ये अहं नसतो. सर्व काही देव करतो, असा त्यांचा सतत भाव असतो. चित्तावरचे संस्कार अल्प असणे, हे संतांमधील सुंदरतेचे लक्षण असते. प्रकृतीनुसार काही संत बाह्यदृष्ट्या सुंदर दिसत नसले, तरी त्यांचे अंतर्मन सुंदर असते; मात्र पू. लोखंडेआजी या अंतर्बाह्य नितांत सुंदर आहेत.’

भावसोहळ्यातील आनंदवार्ता सर्व साधकांना देण्यासाठी
रामनाथी आश्रमातील भोजनकक्षातील फलकावर लिहिलेेले काव्य

‘संतांच्या मांदियाळीत आणखी एक रत्न मिळाले ।

परात्पर गुरुमाऊलींच्या कृपेनेच आम्हाला हे कळले ॥

सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंच्या मधुर वाणीतून आजचे गुपित उलगडले ।

श्रीमती लोखंडेआजींनी आज संतपद गाठले ॥

त्यांच्या मुलीने (श्रीमती इंदुबाई भुकन यांनी) सेवा मनोभावे केली ।

म्हणूनच गुरुमाऊलीने त्यांची जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्तता केली’ ॥

– कु. स्वाती गायकवाड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सोहळ्यात सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू यांनी
साधलेल्या संवादाच्या वेळी भुकन कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत

देवच आपल्याला खरा आनंद देऊ शकतो ! – श्रीमती इंदुबाई भुकन

‘देवाशिवाय आपल्याला कोणीही आनंद देऊ शकत नाही. तोच आपल्यासाठी सर्वकाही करतो आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करतो. यासाठी त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी थोडीच आहे. ‘माझ्या अन्य मुलींनीही पूर्णवेळ साधना करावी’, असे मला वाटते. पतीचे निधन झाल्यानंतर मी सर्व भार देवावर सोपवला. ‘माझ्या मुलांना चांगली बुद्धी द्या आणि ते शूरवीर होऊ देत’, अशी प्रार्थना मी प्रतिदिन सूर्यदेवतेला करायचे. जेव्हा मोठ्या मुलाने पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ‘देवच त्याला सुखी ठेवील’, हे लक्षात घेऊन मीही त्याच्यासोबत आश्रमात येण्याचा निर्णय घेतला.’

प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच शक्य झाले ! – श्री. रामेश्‍वर भुकन

‘मला नोकरीतून आनंद मिळत नव्हता. व्यवहारामध्ये काही मिळवायचे नव्हते. त्यामुळे ‘नोकरीचा त्याग करावा’, असे तीव्रतेने वाटायला लागले. प्रारंभी पत्नीची याला सहमती नव्हती; मात्र देवाला प्रार्थना केल्यानंतर तीसुद्धा सकारात्मक झाली. जेव्हा माझ्या मनाचा संघर्ष होत असे, तेव्हा दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध होणार्‍या चौकटींतून मला उत्तरे मिळायची. आईने आम्हा मुलांच्या पालनपोषणासाठी खूप कष्ट घेतले आहेत. जेव्हा मी पूर्णवेळ होण्याविषयी सांगितले, तेव्हा आईनेे ते सहज स्वीकारले. केवळ प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच झाले. ‘सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यापूर्वीपासूनच प.पू. डॉक्टरांची आमच्या कुटुंबावर कृपा आहे’, असे जाणवते.’

व्यवहारापेक्षा साधनेत आनंद मिळत असल्याने पतीच्या
पूर्णवेळ साधना करण्याच्या निर्णयाला सहमती दिली ! – सौ. उर्मिला भुकन

‘प्रारंभी माझ्या मनात ‘नोकरी करून मुलीच्या भवितव्यासाठी पैसे जमवूया आणि नंतर पूर्णवेळ साधना करूया’, असा विचार यायचा. माझ्या यजमानांना व्यवहारात आनंद मिळत नव्हता आणि त्यांचा ओढा आश्रमाकडे होता. आम्ही देवाच्या सेवेसाठी मुलीला देवाकडे मागितले होते. तिची जडणघडण आश्रमात चांगली होणार आहे. त्यामुळे नंतर मी आश्रमात जाण्याचा पतीच्या निर्णयाला सहमती दिली. माझ्या स्वभावदोषांमुळे प्रारंभी आश्रमाजीवनात रुळण्यास मला अडचणी आल्या; मात्र गुरुकृपेने या दोषांवर मात करता आली. माझ्या सासूबाईंनी मला मुलीप्रमाणे प्रेम दिले.’

असा झाला भावसोहळा !

१. ‘महर्षींच्या आज्ञेने अखंडपणे दैवी प्रवासात असणार्‍या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे काही दिवसांपूर्वीच आश्रमात आगमन झाले होते. चराचरातील अनेक गुपिते उलगडणार्‍या सद्गुरु गाडगीळकाकू आश्रमातील काही गुपिते उलगडतील, याची चाहूल अनेक साधकांना लागली होती.

२. पू. लोखंडेआजी या मूळ मांडवगण, तालुका त्रिगोंडा, जिल्हा नगर येथील, तर श्रीमती भुकन या मूळ टाकळी, तालुका आष्टी, जिल्हा बीड येथील आहेत आणि हे सर्व कुटुंबीय आता पूर्णवेळ साधनेसाठी रामनाथी येथील सनातन आश्रमात आलेले आहेत. सत्संग सोहळ्यात भुकन कुटुंबियांशी सद्गुरु गाडगीळकाकू यांनी संवाद साधला आणि हे कुटुंबीय सर्वांसाठीच आदर्श असल्याचे सांगितले.

३. ‘ज्याप्रमाणे श्रीकृष्णाची द्वारका, मारुतिरायाची किष्कींधा, रामाची अयोध्या आहे, त्याप्रमाणे रामनाथी येथेही रामनगरी होणार आहे. ‘अनेक साधक रामनाथी आश्रमात साधना करण्यासाठी येतील’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले शब्द प्रत्यक्षात उतरत आहेत, हे पूर्णवेळ झालेले भुकन कुटुंबीय आणि आश्रमातील अन्य कुटुंबियांवरून लक्षात येते’, असे कु. निधी देशमुख यांनी सोहळ्याचे सूत्रसंचालन करतांना सांगितले.

४. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले संपूर्ण पृथ्वीलाच रामनगरी करणार आहेत’, असे महर्षींनी सांगितल्याची आठवण सद्गुरु गाडगीळकाकूंनी सोहळ्याला उपस्थित सर्व साधकांना करून दिली.

५. निरागस बालकाप्रमाणे सतत आनंदी आणि देवाच्या अखंड अनुसंधानात रहाणार्‍या श्रीमती लोखंडेआजी यांनी संतपद, तर श्रीमती इंदुबाई भुकन यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे गुपित भावसोहळ्याच्या शेवटी अलगद उलगडतांना साधक आनंदात न्हाऊन गेले.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment