वेद हा संपूर्ण मानवजातीचा ठेवा ! – डॉ. विजय भटकर

पुणे येथे वैदिक विज्ञान या विषयावर अ‍ॅस्ट्रा २०१७ ही आंतरराष्ट्रीय परिषद

पुणे : वेद हा संपूर्ण मानवजातीचा ठेवा आहे. युरोपमधून विज्ञान भारतात आले, असे आपल्याला शिकवले जाते; पण ते योग्य नाही. आपल्याकडे लाखो वर्षांपूर्वीचा वैदिक विज्ञानाचा ठेवा आहे. प्राचीनता आणि चिरंतनता ही वैदिक विज्ञानाची वैशिष्ट्ये आहेत. हे सर्व विज्ञान प्रमाणांवर आधारलेले आहे. वैदिक विज्ञान आजही आधुनिक विज्ञानाशी सुसंगत आहे; किंबहुना आधुनिक विज्ञानाच्या पुष्कळ पुढे आहे, असे प्रतिपादन परमसंगणकाचे जनक तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले.

येथील हरिभाई देसाई महाविद्यालयामध्ये १८ आणि १९ जानेवारी या दिवशी वैदिक विज्ञान या विषयावर अ‍ॅस्ट्रा २०१७ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. भाटकर बोलत होते. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शंकर गोवारीकर, अ‍ॅस्ट्राचे संस्थापक आणि प्रज्ञा विकास फोरमचे संचालक डॉ. सतीश कुलकर्णी, डेक्कन अभिमत विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. वसंत शिंदे, उच्च शिक्षण, पुणे विभागाचे संचालक डॉ. विजय नारखेडे, शारदा ज्ञानपीठम्चे पंडित वसंतराव गाडगीळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीष पठाडे, उपप्राचार्य पी.व्ही. पंधारे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी भारतासह बांगलादेश, नेपाळ, दुबई, तसेच जर्मनी या देशांतील संशोधक सहभागी झाले होते.

परिषदेच्या पहिल्या दिवशी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने २ शोधप्रबंध सादर करण्यात आले.

शोधप्रबंध सादर करतांना महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या डॉ. (श्रीमती) ज्योती काळे (डावीकडे)

डॉ. भटकर पुढे म्हणाले,

१. आधुनिक विज्ञानामुळे मनुष्य निसर्गावर विजय मिळवण्याचा विचार करतो; पण हा विचार म्हणजे महाघोटाळा आहे. आधुनिक विज्ञान निसर्गावर विजय मिळवण्यास शिकवते, तर वैदिक विज्ञान मनुष्याला निसर्गाचाच एक घटक मानते.

२. कुठलीही वैज्ञानिक तथ्ये जाणून घेतांना त्याचा इतिहासही जाणून घेणे आवश्यक असते. शास्त्रज्ञाला एखादी कल्पना सुचते अथवा एखादे वैज्ञानिक समीकरण शोधून काढले जाते, त्या वेळी त्याची विचारप्रक्रिया जाणणेही महत्त्वाचे ठरते. दुर्दैवाने सध्याच्या शिक्षणपद्धतीत याचा समावेश नसल्याने शिकण्याची प्रक्रिया रंजक होत नाही.

मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार

१. आतंकवादाच्या छायेखाली जग सध्या वावरत असतांना वैदिक विज्ञानाचे महत्त्व अधिक अधोरेखित होते, असे मत डॉ. गोवारीकर यांनी व्यक्त केले.

२. पंडित वसंतराव गाडगीळ यांनीही नेहमीप्रमाणे संस्कृत भाषेत भाषण केले. आधुनिक आणि वैदिक विज्ञानाची सांगड घालायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

३. पर्यावरणरक्षण आणि शाश्‍वत विकास यांसाठी यज्ञसंस्कृती ! – डॉ. सतीश कुलकर्णी

डॉ. सतीश कुलकर्णी म्हणाले, आज यज्ञसंस्कृतीच्या संदर्भात अनेक वाद उपस्थित केले जातात; पण पर्यावरणाचे रक्षण आणि शाश्‍वत विकास यांसाठी यज्ञयाग हेच योग्य तंत्रज्ञान आहे. वैदिक विज्ञान हा ज्ञानाचा प्रचंड मोठा खजिना आहे.

४. पारंपरिक विज्ञानाचे अभ्यासक्रमातून शिक्षण
दिले पाहिजे ! – डॉ. वसंत शिंदे, कुलगुरु, डेक्कन अभिमत विद्यापीठ

सर्वसामान्य माणसे वैदिक विज्ञानाच्या संदर्भात अनभिज्ञ आहेत. प्राचीन ज्ञानपद्धत आताच्या काळात सुसंगत आहे, हेच आपण विसरून गेलो आहोत. आपल्याकडे वाळवंटी भागात हडप्पा संस्कृतीचे पुरावे सापडले. त्यावरून हडप्पा संस्कृतीच्या काळात उत्तम जलव्यवस्थापन होते, हे लक्षात आले. हे तंत्र वापरल्यास आजही वाळवंटी ओसाड प्रदेश हिरवागार करता येऊ शकतो. पारंपरिक विज्ञान हे शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये शिकवले गेले पाहिजे.

क्षणचित्रे

१. श्री. नाईक आणि डॉ. (श्रीमती) ज्योती काळे यांनी सादर केलेले शोधप्रबंध (पेपर सादरीकरण) उपस्थित संशोधकांनी कुतूहलाने ऐकले आणि संशोधन अजून चांगले होण्यासाठी काही चांगल्या कल्पनाही सुचवल्या.

२. परिषदेच्या मध्यांतराच्या वेळेत श्री. नाईक आणि डॉ. (श्रीमती) ज्योती काळे यांनी डॉ. विजय भटकर, डॉ. शंकर गोवारीकर, तसेच परिषदेमध्ये पेपर सादर करणारे अन्य संशोधक यांची भेट घेऊन त्यांना अध्यात्म विश्‍वविद्यालय हा ग्रंथ भेट दिला.

डॉ. विजय भटकर यांना अध्यात्म विश्‍वविद्यालय ग्रंथाविषयी माहिती देतांना श्री. प्रवीण नाईक

 

३. ज्या वेळी डॉ. गोवारीकर यांची भेट घेतली, त्या वेळी त्यांनी साधकांचे डोळे निरखून ते आध्यात्मिक मार्गावरील असल्याचे सांगितले.

शोधप्रबंध सादर केल्यावर मिळालेले प्रशस्तीपत्रक आणि स्मृतीचिन्ह

शोधप्रबंध सादर केल्याबद्दल मिळालेले स्मृतिचिन्ह
शोधप्रंबध सादर केल्याबद्दल मिळालेले प्रशस्तीपत्रक
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment