बद्रीनाथमध्ये उगवणार्‍या बद्री तुळशीमध्ये प्रदूषणाशी लढण्याची अद्भुत क्षमता !

भारतीय संस्कृतीमध्ये स्थान असणार्‍या प्रत्येक घटकाचे
शास्त्रीयदृष्ट्याही अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे लक्षात घ्या !

1

डेहराडून : जलवायू परिवर्तनाच्या दुष्परिणामांपासून औषधी वनस्पतींचे रक्षण करण्यासाठी शास्त्रज्ञांकडून एका डाटा बेसची निर्मिती करण्यात येत आहे. या अंतर्गत शास्त्रज्ञांनी बद्रीनाथ भागात आढळून येणार्‍या बद्री तुळशीवर संशोधन केले असता त्यांना या तुळशीत जलवायू परिवर्तनाशी लढण्याची अद्भुत क्षमता असल्याचे आढळून आले आहे.

वन अनुसंधान संस्थेच्या पर्यावरण, जलवायू परिवर्तन आणि वन परिणाम विभागाने याविषयी संशोधन केले. या संशोधनात सामान्य तुळस आणि अन्य रोपटी यांहून बद्री तुळशीमध्ये कार्बन वायू शोषून घेण्याची क्षमता १२ टक्के अधिक प्रमाणात असल्याचे लक्षात आले आहे. तापमान वाढल्यावर या तुळशीच्या क्षमतेत २२ टक्क्यांनी अधिक वाढ होेऊ शकते. या तुळशीचे रोपटे ५ ते ६ फूट उंच असते. चारधाम यात्रेला येणारे यात्रेकरू ही तुळस प्रसाद म्हणून त्यांच्या घरी घेऊन जातात. या भागात कोणीही या तुळशीच्या रोपट्यांना हानी पोचवत नाही. केवळ भाविक प्रसाद ग्रहण करण्यासाठी या रोपट्यांची पाने तोडतात. बद्री तुळस एवढ्या विपुल प्रमाणात केवळ बद्रीनाथ तीर्थक्षेत्रातच आढळते. या तुळशीच्या औषधी गुणांविषयी पुराणांमध्ये उल्लेख दिसून येतो; मात्र जलवायू परिवर्तनामुळे निर्माण होणार्‍या नवीन वातावरणात या तुळशीचे अन्य गुणही समोर आले आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात