सनातनचा देवद आश्रम म्हणजे नव्या काळातील तीर्थक्षेत्र ! – समर्थभक्त पू. मंदारबुवा रामदासी

समर्थभक्त पू. मंदारबुवा रामदासी यांची देवद आश्रमाला सदिच्छा भेट

1

पनवेल : आपण तीर्थक्षेत्री जातो, तेव्हा थोडा वेळ देवदर्शन करतो आणि बराचसा वेळ करमणूक, खरेदी आणि पर्यटन यांमध्ये घालवतो. तेथे गेल्यावर साधना, ध्यानधारणा, सात्त्विकतेचा लाभ घेणे होत नाही. सनातनचा देवद आश्रम म्हणजे नव्या काळातील तीर्थक्षेत्र आहे. येथे सेवाही साधना म्हणून आणि नामजप करत केली जाते, असे मार्गदर्शन दादेगाव, तालुका अष्टी, जिल्हा बीड येथील समर्थभक्त पू. मंदारबुवा रामदासी यांनी केले. समर्थभक्त पू. मंदारबुवा रामदासी यांनी नुकतीच सनातन संस्थेच्या देवद (पनवेल) येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी समवेतच्या भक्तांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. ते सुकापूर गाव आणि पनवेल येथे धर्मप्रसार करण्यासाठी आले होते.

पू. मंदारबुवा पुढे म्हणाले की, प्रपंच करतांना व्यक्ती जेवढी मेहनत घेते, त्यापेक्षा अधिक मेहनत येथील साधक घेतात. त्यांच्यातील भावामुळे आणि उपासनेमुळे येथील वातावरण शांत आहे. येथील साधकांनी सेवेसाठी स्वत:चे आयुष्य अर्पण केले आहे आणि त्याचा त्यांना कर्तेपणा नाही. देवाला शरण गेल्यावर देवच आपला भार वहातो आणि आनंद देतो, याचाच पुरावा म्हणजे येथील साधक आहेत. तसेच साधक लहान-मोठी कोणतीही सेवा करतात.

पू. मंदारबुवांनी सनातनच्या कार्याला पुढीलप्रमाणे आशीर्वाद दिला. ‘मुख्य ते हरिकथानिरुपण (अध्यात्म) । दुसरे ते राजकारण । तिसरे ते सावधपण । सर्वविषयी ॥ चौथा अत्यंत साक्षेप । फेडावे नाना आक्षेप ॥’ या श्री समर्थ रामदासांच्या सूत्राप्रमाणे आपली संस्था सर्व हिंदु समाजास त्याचे आत्मभान, आत्मगौरव जागृत करून इह-पर सुखसमाधानाचा ठेवा देणारी कामधेनूच आहे. श्री समर्थकृपेने आपल्या सर्वांच्या कार्यास यश प्राप्त होवो, हीच प्रार्थना !

दादेगाव (जिल्हा बीड) येथे समर्थ रामदास स्वामी यांनी बांधलेले रामपंचायतन मंदिर आहे. तेथे आश्रम उभारणीचे कार्य चालू आहे. समर्थ सत्संग परिवाराच्या वतीने बालसंस्कार केंद्र, शिववंदना, सामुदायिक नामजप आदी कार्यक्रम आयोजित केले जातात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात