परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अधिवक्त्यांविषयी लिहिलेल्या तेजस्वी विचारावर एका अधिवक्त्यांनी व्हॉट्स अ‍ॅपवरून केलेली टीका आणि त्याचे हिंदुत्वनिष्ठांनी केलेले समर्पक खंडण

अधिवक्त्यांच्या टीकेचे समर्पक भाषेत खंडण करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! असे हिंदुत्वनिष्ठच  हिंदु राष्ट्र चालवतील, यात शंका नाही ! – संपादक

१८.१२.२०१६ या दिवशीच्या दैनिकात पृष्ठ १ वर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार ही चौकट वाचून एका शहरातील एका अधिवक्त्यांनी व्हॉट्स अ‍ॅपच्या एका गटात पोस्ट टाकून या चौकटीतील लिखाणाविषयी टीका केली आहे. या टीकेचे त्याच गटातील हिंदुत्वनिष्ठांनी समर्पक उत्तरे देऊन खंडणही केले आहे.

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे १८.१२.२०१६
या दिवशीच्या दैनिकात प्रसिद्ध झालेले तेजस्वी विचार

गुन्हा सिद्ध झाल्यावर न्यायाधीश गुन्हेगाराला शिक्षा ठोठावतात. तेव्हा गुन्हेगाराची खोटी बाजू लढवल्याबद्दल, त्याचे साथीदार झाल्याबद्दल त्याच्या अधिवक्त्यांना शिक्षा केली जात नाही. हिंदु राष्ट्रात अशा अधिवक्त्यांची वकिलीची सनद रद्द करून त्यांना आजन्म कारागृहात साधना करण्याची कडक शिक्षा केली जाईल ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अधिवक्त्यांची टीकात्मक पोस्ट : हे विचार म्हणजे वेडेपणा आहे. खरेखोटे ठरवण्याचा अधिकार न्यायाधिशांना आहे, वकिलांना नाही. वकिलांनी केस चालवली नाही, तर आरोपीला शिक्षा होईल का ? ज्यांना ज्या क्षेत्रातील कळत नाही, त्यांनी त्याबाबत वक्तव्य करू नये.

एक हिंदुत्वनिष्ठ (अधिवक्त्यांना उद्देशून) : एखाद्या क्षेत्रातील कळत नसतांना त्याला वेडेपणा ठरवून कसे काय मोकळे झालात ? हिंदु राष्ट्र ही संकल्पना काय आहे, हे आधी समजून घेऊया. हिंदु राष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्यच असणार. तिथे चुकीला क्षमा नाही. हिंदु राष्ट्र हे संतांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी चालवणार आहेत.

अधिवक्ता : हिंदु राष्ट्र असले, तरी कोणत्याही संकल्पनेचे समर्थन करता येणार नाही.

एक हिंदुत्वनिष्ठ : महाभारतात भगवान श्रीकृष्णांनी जसे अधर्माच्या बाजूने लढणारे भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण यांचा नाश केला. भीष्म आणि द्रोणाचार्य यांना असेच वाटायचे की, हे आमचे कर्तव्य आहे. यात श्रीकृष्णाला कुणी दोषी म्हणेल का ? तशाच प्रकारे अधर्मी लोकांच्या बाजूने केस लढवणारे वकीलही गीतेच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे शिक्षेस पात्र ठरतात. यामुळे पूजनीय गुरुजी (परात्पर गुरु डॉ. आठवले) गीता जगतात, हे सिद्ध होते. धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच हिंदु समाज अधोगतीला जात आहे. यासाठीच सनातन संस्था हिंदूंना धर्मशिक्षण देते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात