सहस्रो वर्षांच्या कालपटलावर ठसा उमटवणारे अवतारी पुरुष !

hh_gurudev
त्रैलोक्याचे योगीराज हे अवतरले भूवरी !

सर्वसामान्य माणसाचे जीवन म्हणजे चिमण्या-पाखरं करतात, तसा चार काटक्यांचा संसार ! त्यातूनही जी व्यक्तीमत्त्वे स्वार्थ त्यागून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी जगतात, ते विभूती असतात. अशा अनेक विभूती भारताने अंगाखांद्यावर खेळवल्या आहेत. काही व्यक्तीमत्त्वे स्वत:च्या कार्याचा ठसा त्या-त्या काळावर उमटवतात आणि कीर्तीवंत होतात. अशा काही महापुरुषांची देणगीही भारताने जगाला दिली आहे. या सर्वांच्याही पुढे जाऊन सहस्रो वर्षे मानवजातीवर प्रभाव राहील, असे कार्य करणारे, लाखो जिवांच्या अंतरंगात पालट करून त्यांच्यामध्ये देवत्व निर्माण करणारे अवतारी पुरुषही या भूमीवर जन्मले आहेत. असेच एक अवतारी रूप ईशकृपेने आम्ही साधक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या माध्यमातून अनुभवत आहोत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे संपूर्ण जीवन आणि शिकवण जीवन कशासाठी आणि कसे जगायचे ? याचा एक वस्तूपाठ आहे. त्यांच्या शब्दांतील आणि कृतींतील शिकवणीमुळे अनेक साधकांच्या भावविश्‍वाला देवत्वाचे कोंदण लाभले आणि ते जीवन धन्य झाले ! या कृतज्ञताभावात आज जगत आहेत. असे सहस्रो व्यक्तींचे जीवन सर्वार्थाने समृद्ध करणारे हे अवतारी पुरुष कसे असतात ?, याचे संपूर्ण आकलन सामान्य बुद्धीला होणे किंवा त्यांना शब्दांत साठवणे तसे कठीणच; पण आम्हाला त्यांचे अवतारत्व अंशरूपाने अनुभवता येते. त्यांच्याच कृपेने आम्ही अनुभवलेले परमपूज्य डॉक्टर (परात्पर गुरु डॉ. आठवले) शब्दबद्ध करण्याचा हा बाळबोध प्रयत्न !

 

१. प्रत्येक विषयाकडे जिज्ञासेने पहाणे आणि
त्याचा सखोल अभ्यास करून मानवजातीला लाभ करून देणे

प.पू. डॉक्टरांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी जिज्ञासूच ज्ञानाचा अधिकारी अशी शिकवण दिली. प.पू. डॉक्टर आज पूर्णत्वाच्या स्थितीला पोचल्यानंतरही या शिकवणीनुसार आचरण करत आहेत. ते मूलत: संशोधक वृत्तीचे असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म अभ्यास आणि त्यामागची कारणमीमांसा करणे, हा त्यांचा स्थायीभाव आहे.

१ अ. प्रत्येक पालटाकडे आध्यात्मिक संशोधनाच्या
भूमिकेतून पहाणे आणि त्यामागील अध्यात्म समाजाला सांगणे

nagesh_gade
श्री. नागेश गाडे

प.पू. डॉक्टर व्यक्ती, वस्तू, वातावरण अशा प्रत्येक घटकातील पालटाकडे आध्यात्मिक संशोधनाच्या भूमिकेतून पहातात. त्यामुळे सामान्य व्यक्तीला कधीही न जाणवणार्‍या आश्रमातील अनेक आध्यात्मिक पालटांची ओळख झाली. आश्रमात निर्माण होणारे सूक्ष्म नाद, भिंतीतून जाणवणारी स्पंदने, खिडक्यांच्या काचांमधील पारदर्शकतेत होणारे पालट, निर्जीव वस्तूंमधील कंपने, फरश्यांमधील पालट, आश्रमात विविध ठिकाणी येणारे दैवी गंध, स्वत:च्या आणि साधकांच्या शरिरावर होणारे पालट, विविध ठिकाणी आपोआप उमटणार्‍या आकृत्या अशी अनेक उदाहरणे प.पू. डॉक्टरांच्या शोधक दृष्टीमुळे साधकांना समजली. प्रथमत: हे पालट प.पू. डॉक्टरांच्या सूक्ष्म दृष्टींनी टिपले. त्यांनी पालटांची वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टीकोनातून परीक्षणे करून त्यांमागील अध्यात्म सांगितले. त्यांच्या संशोधक भूमिकेमुळे हे पालट आणि त्यांमागील अध्यात्मशास्त्र पुढील सहस्रो वर्षे लोककल्याणार्थ मानवजातीला उपलब्ध झाले आहे.

१ आ. प्रत्येक विषयाची माहिती संकलित
करणे आणि तिचा उपयोग जनप्रबोधनासाठी होणे 

प.पू. डॉक्टरांनी आतापर्यंत विविध विषयांचे विपुल वाचन केले आहे. अर्थात प.पू. डॉक्टरांचे वाचन हे सर्वसामान्यांप्रमाणे वाचा आणि सोडून द्या या प्रकारातील नाही. त्यांनी मागील कित्येक वर्षांपासून वाचनात आलेल्या प्रत्येक साहित्यातील जे समाजासाठी उपयुक्त आहे, ते साठवून ठेवले. त्यांनी अशा प्रकारे निवडलेल्या साहित्यापैकी केवळ नियतकालिकांची कात्रणे २५ खोकी भरतील इतक्या प्रचंड प्रमाणात होती. हे सर्व निवडलेले साहित्य त्यांनी योग्य प्रकारे संग्रह करून ठेवले. हे लिखाण केवळ धर्म किंवा अध्यात्म यांवर नव्हे, तर मानवाचा संबंध येणार्‍या २ सहस्र ५०० पेक्षा अधिक विषयांनुसार वर्गीकरण करून जतन केले आहे. प.पू. डॉक्टरांनी संकलन केलेल्या या माहितीच्या व्याप्तीवरून त्यांनी यासाठी सातत्याने किती दशके परिश्रम घेतले असतील, याची जाणीव होते आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटते.

प.पू. डॉक्टरांनी काही दशके केलेल्या या अथक परिश्रमामुळेच आज सनातन प्रभात नियतकालिकांतील बहुतेक लेख बनतात. ग्रंथनिर्मितीत त्याचा उपयोग होतो. अध्यात्माच्या विविध विषयांवर येणारी नियतकालिके, ग्रंथ यांचे वाचन करणे, त्यांतील उपयुक्त भागांचे टिपण करणे, हे त्यांचे कार्य अव्याहत चालूच आहे. हे त्यांनी एकट्यानेच केले असे नाही, तर ते सातत्याने करण्याची सवय, त्यामागील उदात्त आणि व्यापक विचार त्यांनी साधकांमध्येही रुजवला.

१ इ. माहीत नसलेली प्रत्येक गोष्ट
जाणून घेणे आणि त्याचा व्यापक स्तरावर विचार करणे

प.पू. डॉक्टरांच्या वाचनात विविध विषय येतात. त्यांतील काही सूत्रांविषयी त्यांना माहिती नसल्यास ती ते जाणून घेतात. यात कायद्याचा अर्थ, शासकीय कार्यपद्धती आदी विविध विषयांचा समावेश असतो. एकदा त्यांच्या वाचनात महाबळेश्‍वर येथील बगदादी पॉईंटचा उल्लेख आला. त्यावर या ठिकाणाला बगदादी पॉईंट असे नाव का पडले ?, हे त्यांनी जाणून घेतले. पथदीप सकाळी उजाडल्यानंतरही चालू असतात आणि त्यामुळे विजेचा अपव्यय होतो, हे लक्षात आल्यावर त्यांनी पथदीप किती वाजता चालू-बंद करावेत ?, याचे शासकीय आदेश काय आहेत, याची माहिती घेण्यास सांगितले. ही माहिती मिळाल्यानंतर त्यात शासनाचा हलगर्जीपणा आणि व्यवस्थापनातील त्रुटी कोणत्या आहेत, हे समजले. प.पू. डॉक्टरांनी त्या विषयावर लेख लिहिण्यास सांगितले. पथदीपाच्या खांबावर दिवे अडकवण्याच्या प्रचलित पद्धतीतील त्रुटी कोणत्या आहेत, कशा प्रकारे ते लावल्यास अधिक प्रकाश मिळून विजेची बचत होईल, हे त्यांनी वैज्ञानिक भाषेत आकृत्या काढून स्पष्ट केले. ते दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्धही झाले. रस्त्यावर लावण्यात येणार्‍या सूचना, दोन सूचनांमधील अंतर, त्या लावण्याची पद्धत, रस्त्यावर आरसा लावण्याचे निकष या गोष्टीही त्यांनी जाणून घेतल्या आणि त्यांतील त्रुटी हेरून त्यांचे सनातन प्रभातमधून प्रबोधनपर लिखाण केले.

 

२. नवीन गोष्ट इतरांना समजावी, याची तळमळ

जे जे आपणासी ठावे, ते इतरांसी सांगावे या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीचे प.पू. डॉक्टर तंतोतंत पालन करतात. आजूबाजूचा परिसर आणि वस्तू यांत होणारे पालट, पहाण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण वस्तू आश्रमातील सर्व साधकांना दाखवण्यास सांगतात. यामुळे बर्‍याच दुर्मिळ गोष्टी साधकांना पहायला आणि अनुभवायला मिळाल्या.

२ अ. उच्चलोकांशी साधर्म्य असणारे निसर्गातील पालट

१. एकदा सायंकाळी सूर्यास्तानंतरचे वातावरण नेहमीपेक्षा वेगळे, म्हणजे फिकट तांबूस रंगाचे झाल्याचे प.पू. डॉक्टरांनी पाहिले. हे वातावरण स्वर्गलोकातील वातावरणाशी मिळतेजुळते आहे, असे सांगून आश्रमातील साधकांना त्याचा अनुभव घेण्यास सांगितले.

२. एकदा सायंकाळी सूर्यास्तानंतरचे वातावरण असेच नेहमीपेक्षा वेगळे झाले. त्यांनी हे वातावरण जनलोकातील वातावरणाशी मिळतेजुळते आहे, असे सांगून त्याची अनुभूती घेण्यास साधकांना सांगितले.

बुद्धीवाद्यांच्या दृष्टीकोनातून वातावरणातील पालट निसर्गचक्राचा भाग म्हणून दुर्लक्षण्यासारखे असतील; पण अध्यात्म जगणार्‍यांसाठी स्वर्गलोक, जनलोक येथील वातावरण पृथ्वीवर अनुभवणे महत्भाग्यच.

२ आ. फुलांच्या भावपूर्ण आणि आकर्षक रचना

आश्रमातील काही साधक देवपूजेचे तबक सिद्ध करतांना फुलांची भावपूर्ण आणि आकर्षक रचना करतात. यांतील काही रचना प.पू. डॉक्टरांना दाखवल्यावर त्यांनी त्या आश्रमातील सर्व साधकांना पहाण्यासाठी ठेवण्यास सांगितले. त्या रचनांची छायाचित्रेही काढण्यास सांगितली. प.पू. डॉक्टरांच्या या गुणाचे फलित म्हणजे फुलांच्या अनेक भावपूर्ण आणि आकर्षक रचना आता छायाचित्रांच्या माध्यमातून संग्रहित झाल्या आहेत. आगामी काळात ग्रंथरूपात त्या समाजापर्यंत पोचणार आहेत.

२ इ. भावपूर्ण शुभेच्छापत्रे

आश्रमातील साधक वाढदिवस, मुंज, विवाह आदी औचित्यांच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छापत्रे देतात. ही शुभेच्छापत्रे आध्यात्मिक स्तरावरची आणि साधकांनी बनवलेली असतात. आरंभीच्या काळात ही शुभेच्छापत्रे साधक प.पू. डॉक्टरांना पहाण्यासाठी देत. शुभेच्छापत्रांतील भाव आणि प्रीती पाहून त्यांचा संग्रह करण्यास प.पू. डॉक्टरांनी सांगितले. अशा काही वैशिष्ट्यपूर्ण शुभेच्छापत्रांचा ग्रंथ आगामी काळात प्रकाशित होईल. ही शुभेच्छापत्रे पाहून महागड्या शुभेच्छापत्रांतील अर्थहीन काव्याऐवजी इतरांचे हित चिंतण्याचा संदेश निर्मळ मनाने कसा द्यावा, हे शिकता येईल.

 

३. व्यक्तीगत जीवन विरक्त भावाने जगणे

amended-new
परात्पर गुरु डॉ. आठवले वास्तव्य करत असलेली खोली

३ अ. आहार

प.पू. डॉक्टरांचा आहारही मागील काही वर्षांपासून एक-दोन पदार्थ आणि तेही करपात्राइतक्या भांड्यात असतो.

३ आ. कपडे

पांढ-या रंगाच्या सदरा-पायजम्याचे प्रतिदिन घालण्याचे २ – ३ जोड आणि कार्यक्रमात घालण्यायोग्य २ – ३ जोड इतकेच जेमतेम गरज भागेल इतके कपडे प.पू. डॉक्टरांकडे आहेत.

३ इ. निवासव्यवस्था

प.पू. डॉक्टरांचा निवास शौचालय आणि स्नानगृह असलेल्या साधारणत: १० x १४ फूट आकाराच्या एका खोलीत असतो. खोलीला अंतर्गत सजावट केली नाही. खोलीत वातानूकुलित यंत्र असूनही त्यांनी ते कधीही वापरले नाही. ते म्हणतात, साधकांसाठी वातानूकुलित यंत्र नाही, तर माझ्यासाठी कशाला ?

३ ई. फर्निचर

खोलीत २ x १.५ फूट आकाराचे एक पटल (टेबल), २.५ फूट रूंदीचा पलंग, २ कपाटे (यांतील एका जुन्या लोखंडी कपाटात दैनंदिन वापरातील साहित्य, तर दुस-या लाकडी कपाटाचा वापर देव्हारा म्हणून होतो.), १ रेलून बसता येईल अशी आसंदी (खुर्ची) इतकेच फर्निचर प.पू. डॉक्टरांच्या खोलीत आहे.

यांतील बहुतांश फर्निचर अर्पणातून आलेले आहे. अर्पणातील साहित्य वापरण्याकडे प.पू. डॉक्टरांचा किती कटाक्ष असतो, याचे एक उदाहरण चांगले स्मरणात राहिले आहे. प.पू. डॉक्टरांच्या वापरात असलेली रेलून बसता येईल अशी आसंदी (खुर्ची) खराब झाली. ती आसंदी पालटण्याचा विषय आला, त्या वेळी नवीन आसंदी वापरण्यास प.पू. डॉक्टरांनी नकार दिला आणि अर्पणात आलेल्या आसंद्यांपैकी एखादी आसंदी देण्यास सांगितले; पण अर्पणातून आलेल्या आसंद्यांमध्ये ते वापरतात तशी आसंदी नव्हती. नंतर एका दुकानदाराने स्वत:चे अर्पण म्हणून अल्प किमतीत दिलेली आसंदी त्यांनी वापरण्यास घेतली.

३ उ. वेळेचा विनियोग

प.पू. डॉक्टर मागील अनेक वर्षांपासून धर्मकार्यासाठी कार्यरत आहेत. मागील काही वर्षांपासून आजारपणामुळे ते स्वत:च्या खोलीच्या बाहेरही येऊ शकत नाहीत. हा सर्व काळ त्यांनी धर्मकार्यासाठी वापरला. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत धर्मकार्य करत असतांना थोडा विरंगुळा म्हणून सेवेच्या व्यतिरिक्त त्यांनी काही केले नाही. शरीर अगदी साथ देत नाही, अशा प्रसंगातच ते विश्रांती घेतात. थोडक्यात धर्मकार्यापासून स्वत:चे व्यक्तीगत जीवन वेगळे करण्याची आसक्ती त्यांनी ठेवलेली नाही. त्यामुळे कित्येक वर्षांपासून ते क्षणभर विश्रांतीसाठी शांत बसलेले किंवा धर्मकार्याला उपयुक्त नसलेले वेगळे काही करतांना कोणी पाहिलेले नाही.

 

४. समष्टीसाठी उपयुक्त अशा सर्वोच्च आणि दैवी गुणांचा समुच्चय !

प.पू. डॉक्टर म्हणजे अवतारी पुरुष आहेत, असा भाव सर्व साधकांचा आहे. वास्तविक प.पू. डॉक्टर उच्च कोटीचे संत असूनही त्यांनी कधी चमत्काराचे दावे केले नाहीत किंवा कोणाच्या व्यावहारिक समस्या सोडवल्या नाहीत. जितक्या निष्ठेने तुम्ही साधना कराल, तितके ईश्वराच्या जवळ पोहोचाल, असा कर्माचा सिद्धांत त्यांनी सातत्याने मांडला. अवतारी पुरुषाच्या संकल्पनेसोबत चिकटलेले चमत्कार आणि नमस्कार यांपासून दूर राहूनही प.पू. डॉक्टरांना साधक अवतारी पुरुष म्हणतात. याचे कारण त्यांच्या देवत्वाची प्रचीती त्यांच्यातील विविध दैवी गुणांच्या समुच्चयातून येते.

४ अ. आज्ञापालन

गुरूंच्या सहवासात असतांना प.पू. डॉक्टरांनी केलेल्या त्यांच्या आज्ञापालनाची अनेक उदाहरणे आहेत. आता परात्पर गुरु स्तरावरील संत असतांनाही प.पू. डॉक्टर अनेक संतांचे आज्ञापालन करतात. अनेक संत सनातनच्या साधकांना होणार्‍या त्रासासाठी त्यांना आध्यात्मिक उपाय करण्यास सांगतात आणि प.पू. डॉक्टरही ते उपाय नित्यनेमाने करतात. त्या उपायांमधून त्यांना फळाची अपेक्षा नसते, तर संतांचे आज्ञापालन करून त्यांच्या संकल्पाचा लाभ मिळवणे, हा उद्देश असतो.

४ आ. प्रीती (निरपेक्ष प्रेम)

प.पू. डॉक्टरांची निरपेक्ष प्रीती विविध घटनांमधून व्यक्त होत असते. त्याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

१. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सहस्रो साधक साधना करतात. एखाद्या ठिकाणचे साधक प.पू. डॉक्टरांना भेटले, तर तेथील जुन्या परिचयातील अन्य साधकांचीही प.पू. डॉक्टर आवर्जून चौकशी करतात. तसेच पूर्वी त्या साधकांनी किती तळमळीने धर्मप्रसाराचे कार्य केले, हे सांगून त्यांच्याविषयी आदरही व्यक्त करतात.

२. आश्रमात रहाणारा एखादा साधक रुग्णाईत आहे किंवा त्याला घरगुती अडचणी आहेत, असे त्यांना समजल्यास त्याची ते वेळोवेळी चौकशी करतात आणि त्याचा उत्साह वाढून त्याला मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर आधार मिळेल, असे पाहतात.

३. आश्रमात रहाणारे साधक हे कुटुंबातील घटकच आहेत. त्यांची गैरसोय व्हायला नको, असा त्यांचा कटाक्ष असतो.

४. साधकांप्रमाणे ते परिचयातील हिंदुत्ववाद्यांचीही चौकशी करतात. तसेच ओळख नसलेल्या एखाद्या हिंदुत्ववाद्याने चांगले कार्य केले असल्यास त्याचेही कौतुक करतात.

५. एखादा साधक किंवा साधकाचे नातेवाईक रुग्णाईत असल्यास त्याला रुग्णालयात साहाय्यासाठी साधक पाठवणे, गाडी पाठवणे आदी व्यवस्था केली आहे का, हे ते पहातात.

या सर्व कृती करतांना त्या साधकाकडून भविष्यात काही मिळेल, अशी त्यांची अपेक्षा नसते. उलट तो साधक राष्ट्र आणि धर्म यांसंदर्भात करत असलेल्या कार्याप्रती त्यांच्यात कृतज्ञताभाव अधिक असतो.

४ इ. इतरांना शिकवणे

ग्रंथलिखाणाची सेवा विविध टप्प्यांतून पुढे सरकत असते. त्यांपैकी प्राथमिक टप्प्याच्या सेवा बर्‍याच क्लिष्ट स्वरूपाच्या आणि शिकण्यास अवघड असतात. प्रथमत: या सर्व सेवा प.पू. डॉक्टर स्वत: करत; पण पुढे जसजसे साधक उपलब्ध होत गेले, तसतसे प.पू. डॉक्टर त्या सेवा साधकांना शिकवत गेले. अशा प्रकारे अनेक साधकांना त्यांनी या सेवा शिकवल्या. सेवा शिकणार्‍या साधकाला त्या सेवेतील बारकावे वारंवार सांगणे, तो कुठे चुकत तर नाही ना, याकडे लक्ष ठेवणे आणि त्याने केलेली सेवा पडताळणे इत्यादी सेवा बारकाईने करण्यासारख्या असतात; पण त्या करण्यात त्यांनी कधी कंटाळा केला नाही किंवा त्या इतरांनाही सांगितल्या नाहीत.

४ ई. काटकसर

प.पू. डॉक्टरांच्या या गुणामुळेच आर्थिक स्रोत अल्प असतांनाही संस्थेचे भव्यदिव्य कार्य अल्पावधीत उभे राहू शकले. छोट्या-छोट्या गोष्टींतून प.पू. डॉक्टर काटकसर करतात. ती कशी करतात, हे सर्वांसाठीच शिकण्यासारखे आहे.

पाठकोरे कागद, औषधाच्या पाकिटांची आतील बाजू, तिकिटे यांचा लिखाणासाठी उपयोग केला जातो. दैनिकाची पाने पडताळण्यासाठी त्यांची प्रत पाठकोर्‍या कागदांवरच काढली जाते. अशा प्रकारे मागील २० वर्षांत शासकीय कामकाजाचे कारण वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी कोर्‍या कागदांवर प्रत काढली जात नाही. यातून आतापर्यंत संस्थेच्या किती पैशाचा अपव्यय टाळला गेला असेल, हे लक्षात येईल.

४ उ. इतरांचा विचार करणे

प.पू. डॉक्टर प्रत्येक घटनेत इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतात. साधक लहानात लहान असला, तरी त्याला आपल्यामुळे त्रास होऊ नये, असा प.पू. डॉक्टरांचा भाव असतो. हा भाव त्यांनी आचरणात आणलाच, त्याचप्रमाणे आश्रमात रहाणार्‍या साधकांमध्येही रुजवल्या. त्यासाठी आश्रमात विविध कार्यपद्धती घातल्या गेल्या आणि त्यांचे आचरण करता करता आता साधकांमध्येही इतरांचा विचार करण्याचा गुण निर्माण झाला.

१. एखादा साधक खोलीत झोपला असल्यास इतरांनी खोलीत गेल्यावर गोंगाट करू नये किंवा प्रखर दिवा लावू नये, हे प.पू. डॉक्टरांनी साधकांना शिकवले.

२. आश्रमात एखादे प्रदर्शन असेल, तेव्हा सर्व साधकांनी एकाच वेळी जाऊन गर्दी होऊ नये आणि साधकांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी साधकांना टप्प्याटप्प्याने पाठवण्याची शिकवण प.पू. डॉक्टरांनी दिली.

३. आश्रमात साधक रुग्णाईत असल्यास त्याच्या खोलीतील किंवा विभागातील सहसाधकांनी त्याचे औषधोपचार, भोजन, कपडे धुणे आदी व्यवस्था करावी, अशी शिकवण प.पू. डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे आश्रमात एखादा साधक आजारी पडल्यास बरे होेण्यासाठी त्याला घरी जाण्याची आवश्यकता नसते. घरच्यांप्रमाणेच साधकही त्याची आश्रमात काळजी घेतात.

४. प.पू. डॉक्टरांना एखादी सेवा करतांना अन्य साधकाचे साहाय्य लागणार असल्यास त्याच्या भोजन, विश्रांती, नामजप यांच्या वेळांमध्ये पालट होणार नाही, याची ते काळजी घेतात किंवा सेवा चालू असल्यास त्या त्या वेळी त्या साधकाला मोकळीक देतात.

४ ऊ. व्यक्तीची त्वरित पारख करणे

प.पू. डॉक्टर एखाद्या व्यक्तीशी ४ – ५ मिनिटे बोलल्यानंतर लगेचच त्याची पारख करतात. अर्थात ही पारख आध्यात्मिक अंगाने असते. यात त्या व्यक्तीचा अहं किती आहे ?, भाव कसा आहे ?, धर्मकार्याची तळमळ कशी आहे ?, असे निरीक्षण ते करतात आणि त्या व्यक्तीच्या स्तराला उपयुक्त होईल, असे मार्गदर्शन करतात.

४ ए. वेळेचा काटेकोर वापर

१. प.पू. डॉक्टर वेळेचा काटेकोरपणे वापर करतात. याचाच एक भाग म्हणजे भोजन करत असतांनाही दुसरीकडे त्यांचे वाचन चालू असते.

२. पूर्वी जाहीर सभांच्या निमित्ताने प.पू. डॉक्टर विविध दौर्‍यांवर जात असत. त्या काळातही त्यांची रात्री उशिरापर्यंत ग्रंथलिखाणाची सेवा चालू असे.

 

५. समाजातील चांगल्या-वाईट घटनांकडे संवेदनशीलतेने पहाणे

प्रवास, वाचन अथवा अन्य व्यक्तींनी सांगितलेल्या गोष्टी यांतून समाजात घडणार्‍या चांगल्या-वाईट गोष्टी प.पू. डॉक्टरांपर्यंत पोचतात. या गोष्टींचा ते संवेदनशीलतेने विचार करतात आणि ती परिस्थिती पालटण्यासाठी काय करता येईल ?, याचा विचार करतात. याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

अ. रस्त्यांच्या कडेला लावलेल्या गावांच्या नावांत व्याकरणाच्या गंभीर चुका असल्याचे प.पू. डॉक्टरांनी पाहिले. त्यांनी त्वरित चुकीचे फलक असलेल्या ठिकाणांची नावे सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध करण्यास सांगितले, तसेच संबंधित खात्याकडे तक्रारीही करण्यास सांगितले.

आ. एका साधकाने त्यांना रुग्णालयात रुग्णांवर होणार्‍या अत्याचारांविषयी सांगितले. त्यावर त्यांनी असे रुग्णालयांचे सर्व अनुभव सनातन प्रभातच्या वाचकांकडून मागवून त्याविषयी प्रबोधन चळवळ राबवण्यास सांगितले.

इ. समाजात एखाद्या व्यक्तीने राष्ट्र आणि धर्म यांच्या दृष्टीकोनातून चांगले कार्य केले असल्यास त्या व्यक्तीची मुलाखत सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध करावी, असे प.पू. डॉक्टर सुचवतात. त्या कृतीतून प्रेरणा घेऊन तशी कृती करण्याची स्फूर्ती इतरांना यावी, हा त्यामागील उद्देश असतो.

केवळ एक व्यक्ती म्हणून पाहिले, तरी प.पू. डॉक्टरांकडून आदर्श जीवन कसे जगावे ? याचा बोध मिळतो. असे आदर्श व्यक्तीमत्त्व अध्यात्माच्या कोंदणात बसल्यामुळे त्याची प्रभा आज सर्वत्र फाकत आहे. या प्रभेला शब्दांत साठवणे अशक्यच ! केवळ त्यात न्हाऊन निघावे !! जीवन धन्य करून घ्यावे !!!

– श्री. नागेश गाडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात