मध्यप्रदेश मराठी साहित्य संमेलनात सनातनच्या ग्रंथाचे प्रदर्शन !

इंदूर : ‘मुक्त संवाद’ या संस्थेच्या वतीने आयोजित ३ दिवसीय मध्यप्रदेश मराठी साहित्य संमेलनाची ८ नोव्हेंबरला सांगता झाली. ६ नोव्हेंबरपासून चालू झालेल्या या संमेलनाचा प्रारंभ ग्रंथदिंडीने झाला. पहिल्या दिवशी ‘भारतीय भाषांचे भवितव्य’ या विषयावर भारतीय विदेश विभागाचे सचिव आणि वरिष्ठ साहित्यकार श्री. ज्ञानेश्‍वर मुळे यांचे व्याख्यान झाले. दुसर्‍या दिवशी ‘आहे मनोहर तरी…’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात उपस्थित मान्यवरांनी ‘प्रगतीचे हे आधुनिक युग मनोहर असले, तरी मागच्या काही गोष्टी आजही कशा हव्याहव्याशा वाटतात’, या विषयी त्यांचे मनोगत व्यक्त केले. तिसर्‍या दिवशी कवितावाचनाचा कार्यक्रम पार पडला. या संमेलनात ‘लयपश्‍चिमा’ हा पुणे येथील डॉ. आशुतोष जावडेकर यांचा पाश्‍चात्त्य संगीताचा परिचय देणारा कार्यक्रम ही पार पडला. या संमेलनाच्या कालावधीत लावण्यात आलेले दिवाळी अंक आणि मराठी पुस्तके यांचे प्रदर्शनही श्रोत्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. येथील प्रितमलाल दुआ सभागृहात या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सनातनच्या ग्रंथाचे प्रदर्शन !

या कार्यक्रमात सनातनच्या विविध ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. याचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला. अनेकांनी ‘हे ग्रंथ वेगळे आहेत’, अशा शब्दांत ग्रंथांचे कौतुक केले. हे प्रदर्शन लावण्यासाठी मुक्त संवादचे श्री. मोहन येडगावकर आणि अन्य सदस्य यांचे सहकार्य लाभले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात