गुर्वाज्ञापालनाने गुरुकृपा संपादन करणारे ब्रह्मचैतन्य प.पू. गोंदवलेकर महाराज !

gondavlekar_c
प.पू. गोंदवलेकर महाराज.

 

१. गणूबुवाचा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज झाल्याचा प्रसंग !

तुकारामचैतन्य (तुकामाई) महाराजांनी आपल्या शिष्याला एक खड्डा खणून तेथे खेळत असलेल्या तीन मुलांना त्या खड्ड्यात पुरण्यास सांगणे, मुलांच्या पालकांनी येऊन शिष्याला मारूनही तो एक शब्द न बोलणे, नंतर महाराजांनी मुलांना सुखरूप बाहेर काढणे आणि शिष्याला आशीर्वाद देणे : एके दिवशी तुकारामचैतन्य हे आपला शिष्य गणूबुवा याच्यासह सकाळच्या वेळी नदीवर गेले. तेथे काही मुले खेळत होती. गुरूंनी गणुबुवांना एक खड्डा खणण्यास सांगितले. तेथे खेळत असलेल्या मुलांपैकी तीन मुलांना घेऊन ते खड्ड्याजवळ गेले आणि म्हणाले, गणू, या मुलांना खड्ड्यात बसवून तो वाळूने भरून टाक अन् त्यावर तू सिद्धासन घालून बसून रहा. माझ्या आज्ञेविना येथून उठशील किंवा एक शब्द बोलशील तर खबरदार ! असे सांगून आपण जाऊन एका झाडाच्या आड बसले.

हे दृष्य पाहून इतर मुले आपापल्या घरी पळाली. त्या मुलांनी सांगितल्यावरून खड्ड्यात सापडलेल्या मुलांचे आई-वडील नदीकाठी आले. त्यांनी आपल्या मुलांविषयी तुकामाईजवळ चौकशी केली. त्या वेळी ते म्हणाले, तेथे वाळूत एकजण बसलेला आहे ना, त्याने तुमची मुले गडप केली आहेत; म्हणून तुम्ही त्याला चांगले चोपा ! हे ऐकण्याचाच अवकाश, सर्व मंडळी गणपतबुवाभोवती गोळा झाली. कोणी त्यांना शिव्या देऊ लागले, तर कोणी मारू लागले, तरी गुरूंंची आज्ञा नसल्यामुळे ते एक शब्दही बोलले नाहीत आणि जागेवरून हाललेही नाहीत.

त्यानंतर तुकामाई धावत धावत आले आणि त्यांनी गणूबुवाला उठवले. या ठिकाणची वाळू उकरा म्हणजे तुमची मुले तुम्हाला मिळतील, असे त्यांनी लोकांना सांगितले. त्याप्रमाणे वाळू उकरल्यावर तिन्ही मुले हसत हसत वर आली.

या वेळी गणुबुवा देहाभिमानशून्य झाल्याची तुकामाईंची निश्‍चिती झाली. त्यांनी त्यांना पोटाशी धरले आणि म्हणाले की, संत व्हायचे आहे ना तुला ? मग जगाचे आघात सोसण्याची शक्ती लागते; म्हणून अशा तर्‍हेने मला पूर्वसिद्धता करावी लागली. इतके बोलून त्यांनी गणपतबुवांच्या मस्तकी हात ठेवला आणि त्यांचे ब्रह्मचैतन्य, असे नाव ठेवले. हे गणुबुवा म्हणजेच प.पू. गोंदवलेकर महाराज. (५५/१६३)

 

२. गुर्वाज्ञापालनाचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारे गोंदवलेकर महाराज !

‘तुकाई (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे गुरु) एकदा शेतात वडाच्या झाडाखाली बसले होते. गणू (गोंदवलेकर महाराज) मागे उभा होता. तुकाईने आज्ञा केली, ‘‘अरे, या झाडाची पाने तोड बघू.’’ तेव्हा गणूने झाडावर चढून पाने तोडली. काही पाने तुकाईने हातात घेऊन पाहिली, तर पानांना दूध सुटले होते. ते ओरडले, ‘‘अरे, आता पुरे. पाने तोडली, तर त्या झाडांना त्रास होतो. बघ त्यातून दूध गळत आहे. तोडलेली पाने जिथल्या तिथे लावून टाक.’’

आज्ञा प्रमाण मानून गणूने एकेक पान तोडलेल्या ठिकाणी पुन्हा पान लावण्याचा क्रम चालू केला. काही वेळातच सर्व पाने जागच्या जागी लावून झाली. तुकाई म्हणाले, ‘‘शाबास ! याला म्हणतात आज्ञापालन !’’

 

३. तुकाईंच्या आज्ञेप्रमाणे डोहात उडी मारल्यावर पुन्हा वर
येण्यासाठी आज्ञा होईपर्यंत डोहाच्या तळाशी पडून रहाणे

‘एकदा तुकाईंनी गणूला ‘डोहात उडी मार’ म्हणून आज्ञा केली. गणूने उडी मारली; परंतु वर येण्याची आज्ञा न दिल्याने तो तसाच तळाशी पडून राहिला. तुकाईंनी आरडाओरडा केला. त्यामुळे लोक गोळा झाले. त्यांनी डोहात गळ टाकला; परंतु गणूचा पत्ता नव्हता. सर्वजण रडू लागले. हा प्रकार दोन-तीन घंटे चालू होता. शेवटी तुकाई ओरडले, ‘‘बाळ, तू आता वर आला नाहीस, तर मी डोहात उडी टाकून जीव देईन.’’ गुरूंचे शब्द कानी पडताच गणू पाण्यातून उसळी मारून वर आला. तुकाईंनी त्याला आपल्या पोटाशी धरले.’

– (सद्गुरु) डॉ. वसंत बाळाजी आठवले (वर्ष १९९१)

 

४. उन्नतांच्या रागाचे सोंग !

‘एकदा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मोठमोठ्याने भांडत असता मुद्दाम तेथे जाऊन वामनराव त्यांना म्हणाले, ‘‘महाराज, ही ओवी मला आता समजावून सांगा.’’ त्याचे ते बोलणे ऐकून श्री महाराज एकदम शांतपणे त्याच्या कानात म्हणाले, ‘‘वामनराव, आलो हं ! हे सोंग आटोपले की आलोच !’’ बेफाम झालेल्या महाराजांचा तो शांतपणा पाहून वामनराव थक्कच झाले. श्री महाराजांचा राग हा सोंगाचा राग आहे, अशी त्यांची खात्री झाली.

 

५. रज आणि सत्त्व गुणांचा एकाच प्रसंगात वापर

‘गोंदवलेकर महाराज एक कथा सांगत असत. ‘एक सत्पुरुष होते. त्यांच्या भूमीसाठी काही लोकांनी त्यांच्यावर खटला दाखल केला. तो खटला लढले. दोन्ही न्यायालयात खटला त्यांच्या बाजूचा झाला. ते खटला लढले, धडपड केली; पण खटला जिंकल्यावर ताबडतोब ती जमीन श्रीरामाच्या देऊळासाठी देऊन ते सत्पुरुष मोकळे झाले. (रजोगुणामुळे न्यायालयात लढले आणि सत्त्वगुणामुळे भूमी अर्पण केली.)’ (संदर्भ : अज्ञात)