साधना करून गुरुकृपेने अल्प कालावधीमध्ये समाधानी आणि आनंदी होणारे साधक !

Article also available in :

कुठे वर्षानुवर्षे हिंदुत्वाचे कार्य करूनही
अशांत आणि असमाधानी असलेले कार्यकर्ते, तर कुठे सनातन संस्थेच्या
माध्यमातून साधना करून गुरुकृपेने अल्प कालावधीमध्ये समाधानी आणि आनंदी होणारे साधक !

आधुनिक वैद्या (कु.) माया पाटील
आधुनिक वैद्या
(कु.) माया पाटील

प्रसारामध्ये सेवा करतांना एका हिंदुत्वनिष्ठ संस्थेच्या माध्यमातून कार्य करणारे एक अधिवक्ता माझ्या संपर्कात आले. ते एका हिंदुत्वनिष्ठ संस्थेत अनेक वर्षे कार्य करत होते. त्यानंतर ते सनातन संस्थेच्या संपर्कात आले. त्यांना संस्थेची शिकवण आवडली. त्यामुळे ते सनातन संस्थेचा गोव्यातील रामनाथी येथील आश्रम पहाण्यासाठी आले. त्या वेळी त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांची मनःस्थिती असमाधानी आणि अशांत असल्याचे लक्षात आले.

 

१. अधिवक्त्यांची अशांत मनःस्थिती

१ अ. हिंदुत्वनिष्ठ संस्थेशी संबंधित असूनही हिंदुत्व आणि हिंदु धर्म

हिंदुत्वनिष्ठ संस्थेशी संबंधित असूनही हिंदुत्व म्हणजे नेमके काय, हे त्या अधिवक्त्यांना ठाऊक नव्हते. त्यांना हिंदु धर्म, त्यातील शास्त्र, उपासना पद्धती इत्यादींच्या संदर्भातील कोणतेही ज्ञान नव्हते. त्यांना जे काही ठाऊक होते, ते अतिशय अल्प होते आणि शास्त्र म्हणून तर काहीच ज्ञात नव्हते. ते आस्तिक होते; परंतु अध्यात्मातील काही सूत्रांविषयी त्यांच्या मनामध्ये प्रश्‍न होते. त्यांनी अध्यात्मावर अनेकांची मते आणि चर्चा ऐकली होती; पण त्यामुळे योग्य आणि अयोग्य काय, हे समजत नसल्यामुळे त्यांच्या मनामध्ये अध्यात्मातील सूत्रांविषयी अनेक प्रकारचा गोंधळ होता. या सर्व गोंधळामुळे त्यांच्या मनातील प्रश्‍नांना उत्तर कुठेच मिळत नव्हते.

१ आ. मनाला समाधान नसणे

अनेक वर्षे कार्य करूनही त्यांच्या मनाला समाधान नव्हते.

१ इ. जीवनातील समस्यांचे कारण बुद्धीअगम्य आहे, हे समजूनही शास्त्र
ठाऊक नसल्यामुळे आणि बुद्धीवादी असल्यामुळे त्याविषयी काही करू न शकणे

त्यांच्या जीवनात त्यांना अनेक कौटुंबिक समस्या होत्या. त्या समस्यांची कारणे बुद्धीने शोधणे त्यांना शक्य होत नव्हते; कारण त्यांच्या जीवनातील समस्या या आध्यात्मिक कारणांमुळे निर्माण झालेल्या होत्या, असे जाणवले. आपल्या समस्यांचे कारण आपल्या बुद्धीच्या पलीकडील आहे, हे त्यांना कळत होते; परंतु त्यावर काय उपाययोजना काढायची, हे त्यांना ठाऊक नव्हते. बुद्धीवादी असल्यामुळे या समस्यांचे कारण बुद्धीअगम्य आहे, हे समजूनही ते काही करू शकत नव्हते; कारण मुळातच याविषयीचे शास्त्र ठाऊक नसल्यामुळे आणि समाजामध्ये अनेक प्रकारचे फसवे लोक असल्यामुळे त्यांना आपली समस्या सोडवण्यासाठी कुणी विश्‍वासाची व्यक्ती भेटत नव्हती.

१ ई. स्थुलातील सर्व सुखे असूनही मन अशांत असणे

प्रसिद्ध अधिवक्ता असल्यामुळे त्यांना पुष्कळ कामे मिळणे, पैसा, प्रसिद्धी, वैवाहिक जीवनातील सर्व सुखे मिळणे, असे सर्व काही त्यांच्याकडे होते. असे असूनही त्यांना समाधान नव्हते. समाधान मिळण्यासाठी अजून काय करायला हवे ?, हे त्यांना कळत नव्हते. स्थुलातून पाहिल्यास त्यांच्याकडे सर्वकाही आहे; परंतु त्यांच्या मनाला जराही समाधान नाही, अशी स्थिती होती. त्यांचे वय ६० वर्षांच्या आसपास होते. या वयात आता नवीन काय करायचे आणि समाधानी कसे व्हायचे ?, असा त्यांच्यासमोर प्रश्‍न होता.

१ उ. पक्षकारांच्या समस्या सोडवतांना त्यांना खर्‍या अर्थाने साहाय्य करू शकत नाही, असे वाटणे

अधिवक्ता असल्यामुळे विविध खटले चालवतांनाही त्यांना स्वतःला ज्या प्रकारच्या समस्या आहेत, तशाच प्रकारच्या समस्या अनेकांना आहेत, असा अनुभव येत होता. काही कौटुंबिक समस्यांचे खटले त्यांच्याकडे यायचे. त्या समस्यांचा अभ्यास करतांना पक्षकारांच्या समस्येमध्ये काहीच तथ्य नसायचे; परंतु पक्षकारांसाठी ती समस्या पुष्कळ गंभीर असायची. तेव्हा त्यांच्या लक्षात यायचे की, आपण यांना यांच्या या समस्येत खर्‍या अर्थाने साहाय्य करू शकत नाही.

 

२. अधिवक्त्यांची स्थिती पहाता सनातन संस्थेच्या
माध्यमातून साधना करणारे साधक भाग्यवान असल्याचे लक्षात येणे

हे सर्व पाहिल्यावर सनातन संस्थेमध्ये येऊन साधना करणारा प्रत्येक साधक प.पू. डॉक्टरांमुळे किती भाग्यवान आहे, याची कल्पना आली; कारण सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्‍या साधकाला काही मासांमध्येच (महिन्यांमध्येच) त्याच्या जीवनातील सर्व समस्यांचे कारण, उपाययोजना आणि आपण काय करायला हवे, ते कळते. प्रत्येकाला सर्व गोष्टी पटकन कृतीत आणता येत नाहीत; पण त्याला कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर ठाऊक नाही, असे होत नाही. यामध्ये साधकाने अध्यात्मातील सर्व ग्रंथांचा अभ्यास केला आहे, असेही नसते. तरीही त्याला अध्यात्मातील प्राथमिक आणि उपयुक्त असे ज्ञान, स्वतःच्या जीवनातील समस्या, आपण कसे वागायला हवे आदी सर्व समजते. हे केवळ गुरुकृपेमुळेच शक्य आहे आणि प.पू. डॉक्टरांची सर्वांवरच कृपा असल्यामुळे सर्व साधक हा भाग अनुभवतात.

 

३. सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करून घेऊन
प्रत्येक साधकाला समाधानी आणि परिपूर्ण बनवणारे प.पू. डॉक्टर !

त्या अधिवक्त्यांशी बोलल्यानंतर सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करतांना अल्प कालावधीमध्येच मला किती अमूल्य ज्ञान मिळाले आहे, याची मला जाणीव झाली आणि प.पू. डॉक्टरांप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली. सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करतांना प.पू. डॉक्टर प्रत्येक साधकाला कसे समाधानी आणि परिपूर्ण बनवत आहेत, हे त्या अधिवक्त्यांशी बोलल्यानंतर आणि त्यांची स्थिती पाहिल्यानंतर लक्षात आले.

 

४. कृतज्ञता

सनातन संस्थेमध्ये येणारा प्रत्येक साधक आनंदी आणि समाधानी वृत्तीचा असण्यामागे प.पू. डॉक्टरांची सर्व साधकांवर असलेली कृपा, सनातनच्या सत्संगातून मिळालेले ज्ञान आणि प.पू. डॉक्टरांनी लिहिलेले ग्रंथ, हेच आहे. गुरूंची कृपा कार्य कशी करते, हे अशा प्रकारच्या व्यक्ती भेटल्या की, लक्षात येते आणि कृतज्ञतेने मन भरून येते. म्हणूनच साधक पावलोपावली प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात. हे अनुभवण्यासाठी सनातन संस्था सांगत असलेली साधना कृतीत आणण्याची बुद्धी सर्वांना होवो, अशी श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !

– आधुनिक वैद्या (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.८.२०१६)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात