मृत्यूनंतरच्या जीवनाचा विदेशातील काही रुग्णांनी घेतलेला प्रत्यक्ष अनुभव

४ ऋणांपैकी पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्राद्धात पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. श्राद्धाचे इतके महत्त्व असतांनाही आज हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे श्राद्धविधी दुर्लक्षिला जाऊ लागला आहे; म्हणूनच अन्य संस्कारांइतकाच श्राद्ध हा संस्कारही अत्यावश्यक कसा आहे, हे सांगणे क्रमप्राप्त ठरते.

 

मृत्यूनंतरच्या जीवनाचा विदेशातील काही रुग्णांनी घेतलेला प्रत्यक्ष अनुभव

अनेक वर्षांपूर्वी ऋषिमुनींनी सांगितलेल्या मृत्यूनंतरच्या जीवनाच्या संदर्भात विदेशी वैज्ञानिकांनी आता शोध लावला. यावरून लक्षात येते की, सहस्रो वर्षांपूर्वी झालेले ऋषिमुनी हेच खरे संशोधक आहेत. ऋषिमुनींनी मृत्यूनंतर जीवन असते, एवढेच सांगितले नाही, तर त्या जिवांना साहाय्य करण्यासाठी मृत्यूत्तर विधीही सांगितले आहेत. यावरून पाश्‍चात्त्य संशोधन बालवाडीतील असल्याप्रमाणे जाणवते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. मृत्यूनंतरही जीवन असू शकते, असे पुरावे शास्त्रज्ञांना मिळणे

मृत्यूनंतरही जीवनाचे अस्तित्व असल्याचे अनुभव आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी आतापर्यंत मांडले आहेत; मात्र ही गोष्ट वैज्ञानिक कसोट्यांवर सिद्ध झालेली नसल्याने त्या गोष्टीच्या खरेपणाविषयी कायमच शंका घेतली जात होती. आता मात्र मृत्यूनंतरही जीवन असू शकते, ही गोष्ट सिद्ध करता येऊ शकेल, असे पुरावे शास्त्रज्ञांना मिळाले आहेत.

२. संशोधनात काही रुग्णांची हृदयक्रिया बंद पडल्यानंतरही ती
पुन्हा चालू केली जाईपर्यंतच्या काळात जागृतावस्था अनुभवल्याचे त्यांनी सांगणे

या प्रयोगामध्ये युनायटेड किंगडममधील युनिव्हर्सिटी ऑफ साउदम्पटनने हृदयविकाराचा झटका आलेल्या २ सहस्र ६० व्यक्तींचा अभ्यास केला. गेली चार वर्षे हे संशोधन चालू होते. ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथील १५ रुग्णालयांतील रुग्णांचे निरीक्षण केले गेले. त्यांपैकी ३३० जण हृदयविकाराचा झटका येऊनही ते जिवंत राहिले. हृदयक्रिया बंद पडल्यानंतर त्या रुग्णाला क्लिनिकली डेड म्हणून घोषित केले जाते. त्यांपैकी १४० रुग्णांनी (४२ टक्के) त्यांना क्लिनिकली डेड घोषित केल्यानंतरही त्यांची हृदयक्रिया पुन्हा चालू केली जाईपर्यंतच्या काळात जागृतावस्था अनुभवल्याचे सांगितले. या प्रयोगातील रुग्णांचे अनुभव ऐकल्यानंतर मृत्यू पश्‍चात जीवन असल्याचे स्पष्ट संकेत शास्त्रज्ञांना मिळाले आहेत.

३. हृदयक्रिया बंद पडल्यानंतर एका रुग्णाला आपलेच शरीर पुन्हा जिवंत
करण्यासाठी आधुनिक वैद्य करत असलेले शर्थीचे प्रयत्न स्वतःच पहात असल्याचा अनुभव येणे

अमेरिकेतील स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कमध्ये कार्यरत असलेले आधुनिक वैद्य सॅम पार्निया यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले. या प्रयोगातील एका रुग्णाची हृदयक्रिया हृदयविकाराचा झटका येऊन बंद पडली. त्यानंतर २० ते ३० सेकंदांत मेंदूची क्रियाही खरेतर बंद पडते; मात्र या व्यक्तीने त्यानंतरच्या ३ मिनिटांचा अगदी आँखों देखा हालच आधुनिक वैद्यांना सांगितला. खोलीच्या कोपर्‍यात बसून आपलेच शरीर पुन्हा जिवंत करण्यासाठी आधुनिक वैद्य करत असलेले शर्थीचे प्रयत्न स्वतःच पहात असल्याचा अनुभव त्याला आला. उपचारांसाठी वापरण्यात येणारे एक यंत्र प्रत्येक ३ मिनिटांनी बीप, बीप असा आवाज करते. तो आवाज ऐकल्याचेही त्या व्यक्तीने सांगितल्याने अनुभवाचा खरेपणा सिद्ध झाला आणि अनुभवाचा कालावधीही निश्‍चित करता आला, असे आधुनिक वैद्य पार्निया म्हणाले.

४. हृदयक्रिया बंद पडल्यानंतर विविध रुग्णांना आलेले अनुभव

अ. हृदयक्रिया बंद पडल्यानंतर पाचपैकी एका रुग्णाला वेगळ्याच प्रकारची शांतता अनुभवायला मिळाली.

आ. काहींना प्रखर सूर्यप्रकाशाप्रमाणे प्रकाश पाहिल्याचे जाणवले.

इ. काहींना त्या कालावधीत वेगळीच भीती वाटली किंवा बुडत असल्याचा अनुभव आला.

ई. दोन टक्के रुग्णांना पूर्ण जागृतावस्थेत असल्याप्रमाणे सगळे काही आठवले.
प्रयोगातील इतरही अनेक व्यक्तींना असे काही अनुभव नक्की आले असतील; पण हृदयक्रिया पुन्हा चालू करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या औषधांच्या परिणामांमुळे त्यांना ते आठवत नसतील, असे आधुनिक वैद्य पार्निया यांनी सांगितले.

संदर्भ : वृत्तसंस्था, लंडन