देवघरात मृत व्यक्तीचे छायाचित्र लावून त्याचे पूजन का करू नये ?

येथे दिलेली माहिती सर्वसाधारण व्यक्तीच्या संदर्भात आहे. आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असलेल्यांच्या संदर्भात नाही. – संकलक 

 

१. देवघरात मृत व्यक्तीचे छायाचित्र लावल्याने
आर्थिक दौर्बल्य येते किंवा विवाह उशिरा होण्यास ते
कारणीभूत ठरू शकते, हा अनुभवांवर आधारित सिद्धांत असणे

कोणत्याही व्यक्तीने स्वतःचे मृत झालेले वडील, आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ किंवा निकटचे नातेवाईक यांचे छायाचित्र कधीही देवघरात लावू नये; कारण त्यामुळे आर्थिक दौर्बल्य येते किंवा घरात होणारे विवाह उशिरा होण्यास ते कारणीभूत ठरू शकते, हा माझा अनुभवांवर आधारित सिद्धांत आहे. हा सिद्धांत आजपर्यंत कोणत्याही वास्तुशास्त्राच्या पुस्तकात एकाही वास्तुशास्त्रज्ञाने मांडलेला नाही किंवा त्या दृष्टीकोनातून कधी कुणी पाहिलेले नाही, असे प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) जगप्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ श्रीमान् गणपति स्थपती यांनी मला बेंगळुरू मुक्कामी माझी पाठ थोपटून दिले.

 

२. नातेवाइकांवर असलेली माया आणि
त्यांच्याविषयी वाटणारी आपुलकी हे देवघरात लावलेल्या
मृतांच्या छायाचित्राची देवाप्रमाणे पूजा करण्यामागील कारण असणे

बर्‍याच ठिकाणी आपल्या निकटच्या मृत व्यक्तीचे छायाचित्र देवघरात किंवा त्याच्यावर ठेवलेले असते. एवढेच नव्हे, तर जशी आपण देवांची गंध-फुलांनी पूजा करतो, तशीच पूजा त्या मृत व्यक्तीच्या छायाचित्रांची केली जाते. याचे कारण असे की, अशा मृत व्यक्तीवर त्यांची माया, प्रेम आणि त्यांच्याप्रती आपुलकी असते किंवा त्यांच्यामुळे मी आज या स्थितीप्रत आहे, अशी समजूत असते. बरेच जण आई-वडील जिवंत असतांना त्यांचे ऐकत नाहीत; पण त्यांच्या मृत्यूनंतर मात्र हार घातलेले त्यांचे मोठे छायाचित्र घरात लावतात. हे मी पाहिले आहे.

 

३. मर्त्यलोकातील मृत व्यक्तीच्या छायाचित्राची
देवाप्रमाणे पूजा करणे अयोग्य असण्यामागील कारणे

आपण अमर आणि सर्वशक्तीमान अशा ईश्‍वराची पूजा करतो. आपले आई-वडील किंवा नातेवाईक हे मर्त्यलोकातील आहेत. मग ईश्‍वर अन् असे नातेवाईक या दोघांची एकाच पातळीवर पूजा करणे अयोग्य आहे.

३ अ. मागणे पूर्ण करणारा ईश्‍वर आणि मागणी पूर्ण न करू
शकणार्‍या मृत व्यक्ती यांची समपातळीवर एका भावनेने पूजा करणे अयोग्य !

आपल्याला ईश्‍वर भेटावा, त्याच्याकडे आपण काही मागावे आणि त्याने ते मागणे पूर्ण करावे, असे मनोमनी अनेक जिवंत व्यक्तींना वाटते. त्याच वेळी मृत व्यक्ती आपल्याला कधीही भेटू शकणार नाही. त्यामुळे आपण त्यांच्याकडे काहीही मागू शकत नाही आणि आपली मागणीही पूर्ण होणार नाही, याचीही जाणीव असते. असे जर आहे, तर मग ईश्‍वर आणि मृत व्यक्ती या दोन्ही भिन्न प्रकृतींची समपातळीवर एकाच भावनेने पूजा करणे योग्य ठरणार नाही.

३ आ. ईश्‍वर आणि पूजास्थान यांकडून येणार्‍या चांगल्या स्पंदनांना
मृत व्यक्तींकडून येणार्‍या दूषित स्पंदनांमुळे अडथळे निर्माण होणे

ईश्‍वर आणि पूजास्थान यांकडून आपल्याकडे चांगल्या स्पंदनांचा प्रवाह येत असतो. त्यामुळे पूजास्थळी वातावरण प्रसन्न असते. त्या वातावरणाला मृत व्यक्तींच्या आत्म्यांकडून येणारी दूषित स्पंदने बिघडवतात; कारण त्यांच्यात दूषित स्पंदने सोडण्याविना कोणतीही क्षमता नसते. ती दूषित स्पंदने जिवंत माणसाच्या प्रगतीत अडथळा आणतात.

३ इ. मृतांना आपुलकीमुळे ताटातूट पटत नसल्याने
ते त्यांच्या नातेवाइकांना स्वतःकडे ओढत असणे

मृत झालेल्या निकटच्या नातेवाइकांना आपली आणि त्यांची ताटातूट (Separation) झालेली केवळ आपुलकीच्या भावनेतून पटत नसते आणि म्हणून असे आत्मे आपल्याला त्यांच्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत असतात.

 

४. पितृपंधरवड्यात मृत व्यक्तींची एकदा तरी आठवण
काढल्याने त्यांनी तृप्त होऊन जिवंत व्यक्तीचेे हित चिंतणे

मृत व्यक्तींकडून केवळ चांगली स्पंदनेच मिळावीत, अशी व्यवस्था आपल्या धर्मात पितृपंधरवड्यात केली आहे. या १५ दिवसांमध्ये आपण आपल्या निकटच्या मृत व्यक्तींची आठवण काढून त्यांना ब्राह्मणांच्या माध्यमातून स्वतःच्या भावना कळवण्याची सोय केली आहे. या कालावधीत मृत व्यक्तींची न्यूनतम एकदातरी आठवण काढावी, म्हणजे हे मृतात्मे तृप्त होतात आणि जिवंत व्यक्तींचे हित चिंतितात. या पंधरवड्यात कोणतीही मृत व्यक्ती त्याच्या जवळच्या व्यक्तींचे नेहमी चांगले व्हावे, अशी दूषित नसलेली स्पंदने सोडू शकते.

 

५. मृत व्यक्तींच्या छायाचित्रांचे पूजन बंद केल्याने आर्थिक
आणि वैवाहिक प्रश्‍न अल्प काळात सुटत असल्याचे लक्षात येणे

ज्या ज्या घरांतून मृत व्यक्तींच्या छायाचित्रांची पूजा करण्याची पद्धत बंद केली आहे, त्या त्या घरांतील आर्थिक आणि वैवाहिक प्रश्‍न अल्प काळातच सुटलेले किंवा सुटत चाललेले आहेत, असे लक्षात आले आहे.

– श्री. अरविंद वझे (मासिक ग्रहवेध, दीपावली १९९६)