इंग्रजी अंक, तसेच देवनागरी लिपीतील सर्वसाधारण अंक आणि सात्त्विक पद्धतीने लिहिलेला अंक यांचा वायूमंडलावर होणारा परिणाम

पिप तंत्रज्ञानाच्या साहाय्याने
महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी

सात्त्विक देवनागरी लिपीतील सात्त्विकतेचा अधिकाधिक
लाभ व्हावा, यासाठी सात्त्विक लेखनपद्धतीचाच वापर करा !

अंक लिहितांना अंकातील रेषांची जाडी, वळण आदींमध्ये पालट करून एकच अंक अनेक पद्धतींनी लिहिता येतो. अनेक पद्धतींपैकी कोणती लेखनपद्धत सर्वाधिक सात्त्विक आहे ?, हे संत (अध्यात्मातील जाणकार) सांगू शकतात.

इंग्रजी अंक, तसेच देवनागरी लिपीतील सर्वसाधारण (प्रचलित) पद्धतीने लिहिलेला अंक यांच्या तुलनेत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधक-चित्रकारांनी विकसित केलेल्या, म्हणजेच सात्त्विक पद्धतीने लिहिलेल्या अंकातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वायूमंडलावर काय परिणाम होतो ?, हे वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यासण्याच्या उद्देशाने तीनही पद्धतींनी लिहिलेल्या ५ या अंकाच्या छायाचित्राची पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

 

१. वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश

एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत, तो घटक सात्त्विक आहे कि नाही, तसेच तो आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्द प्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली, तरच ती खरी वाटते.

 

२. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत इंग्रजी अंक 5, देवनागरी लिपीतील सर्वसाधारण अंक ५ आणि सात्त्विक अंक ५ या अंकांची छायाचित्रे चाचणीसाठी ठेवण्यापूर्वीच्या अन् ठेवल्यानंतरच्या वातावरणाची घेतलेली पिप छायाचित्रे निवडली आहेत. या तीनही अंकांतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होेतो ?, हे या चाचणीद्वारे जाणता आले.

 

३. वैज्ञानिक चाचणीतील अंकांविषयी माहिती

३ अ. इंग्रजी अंक 5

भारतात अनेक शाळांमध्ये विविध स्थानिक भाषांत लिखाण करतांनाही अंक मात्र इंग्रजीत लिहिण्याची पद्धत प्रचलित आहे. पिप चाचणीसाठी इंग्रजीतील प्रचलित पद्धतीने लिहिलेला 5 हा अंक निवडला आहे.

३ आ. सर्वसाधारण अंक ५

हा देवनागरी लिपीतील प्रचलित पद्धतीने लिहिलेला अंक आहे. प्रचलित पद्धतीमध्ये अंक अधिकाधिक रेखीव आणि आकर्षक दिसण्यावर भर असतो. अशा पद्धतीने लिहिलेले अंक सध्या फलक, नियतकालिके, पुस्तके आदींमधील लिखाणात सर्रासपणे आढळतात.

३ इ. सात्त्विक अंक ५

हा देवनागरी लिपीतील अंक सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधक-चित्रकारांनी विकसित केलेल्या पद्धतीने, म्हणजेच सात्त्विक पद्धतीने लिहिलेला आहे. लेखनाच्या या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीविषयी विस्तृत माहिती सनातनचा ग्रंथ सात्त्विक मराठी अक्षरे आणि अंक लिहिण्याची पद्धत यात दिली आहे.

 

४. पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) तंत्रज्ञानाची ओळख !

या तंत्रज्ञानाद्वारे आपण एखाद्या वस्तूची सामान्यपणे डोळ्यांना न दिसणारी अशी रंगीत प्रभावळ (ऑरा) पाहू शकतो. पिप या संगणकीय प्रणालीला व्हिडिओ कॅमेर्‍याशी जोडून त्याद्वारे वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती यांची ऊर्जाक्षेत्रे विविध रंगांत पहाता येतात. यात सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा आहे. त्या रंगांचे विवरण ६ अ या सारणीतील पहिल्या स्तंभात दिले आहे.

 

५. चाचणीसंबंधाने घेतलेली दक्षता

अ. या चाचणीची पिप छायाचित्रे घेण्यासाठी विशिष्ट कक्ष (खोली) वापरण्यात आला. या कक्षाच्या भिंती, छत आदींच्या रंगांचा अंकांच्या प्रभावळीतील रंगांवर परिणाम होऊ नये, यासाठी भिंती, छत आदींना पांढरा रंग दिला होता.

आ. संपूर्ण चाचणीच्या वेळी कक्षातील प्रकाशव्यवस्था एकसारखीच ठेवली होती, तसेच कक्षाबाहेरील हवा, प्रकाश, उष्णता यांचा कक्षातील चाचणीवर परिणाम होऊ नये, यासाठी चाचणीच्या वेळी कक्ष बंदिस्त ठेवण्यात आला होता.

 

६. निरीक्षणे आणि त्यांचे विवरण

६ अ. पिप छायाचित्रांत दिसणार्‍या प्रभावळींचे रंग, ते
कशाचे दर्शक आहेत आणि त्यांच्या प्रमाणात होणारी वाढ किंवा घट (पिप छायाचित्रे १ ते ४)

चाचणीसाठी अंकाचे छायाचित्र ठेवण्यापूर्वीच्या (मूळ नोंदीच्या) तुलनेत छायाचित्र ठेवल्यानंतरच्या प्रभावळीतील रंगाच्या प्रमाणात वाढ किंवा घट होते. ही वाढ किंवा घट त्या छायाचित्रातून प्रक्षेपित होणार्‍या त्या रंगाशी संबंधित स्पंदनांच्या प्रमाणानुसार असते, उदा. चाचणीसाठी छायाचित्र ठेवल्यानंतर त्यातून चैतन्याच्या स्पंदनांचे प्रक्षेपण पुष्कळ प्रमाणात झाल्यास प्रभावळीतील पिवळ्या रंगाचे प्रमाण वाढते, तर चैतन्याच्या स्पंदनांचे प्रक्षेपण न झाल्यास किंवा इतर स्पंदनांच्या तुलनेत अल्प प्रमाणात झाल्यास प्रभावळीतील पिवळ्या रंगाचे प्रमाण घटते. हे लक्षात घेऊन खालील सारणी वाचावी.

1

टीप १ : या चाचणीमध्ये आपण एखाद्या घटकामुळे वातावरणात झालेल्या पालटाची नोंद घेतो; पण वातावरणात सातत्याने पालट होत असल्यामुळे घटकाची चाचणी करण्यापूर्वी घटक ठेवणार असलेल्या वातावरणाची नोंद प्रथम घ्यावी लागते. हिला मूळ नोंद म्हणतात. त्यामुळे चाचणीसाठी अंकाचे छायाचित्र ठेवण्यापूर्वीच्या निरीक्षणाची नोंद प्रथम केली.

टीप २ : याच्या प्रभावळीची तुलना मूळ नोंदीशी केली आहे.

टीप ३ : घटकाच्या अंतर्बाह्य स्तरांवरील नकारात्मक स्पंदने नष्ट करण्याची आणि सकारात्मक स्पंदनांची वृद्धी करण्याची क्षमता

टीप ४ : घटकाच्या केवळ बाह्य स्तरावरील नकारात्मक स्पंदने नष्ट करण्याची आणि सकारात्मक स्पंदनांची वृद्धी करण्याची क्षमता

टीप ५ : थोड्या प्रमाणात सूक्ष्म स्तरावरील आध्यात्मिक उपायक्षमता आणि पुष्कळ प्रमाणात पवित्रता यांची स्पंदने प्रक्षेपित झाली, हे सारणीतील सूत्र क्र. १ आणि २ वरून स्पष्ट होते.

६ आ. पिप छायाचित्रांत दिसणार्‍या विविध रंगांच्या प्रमाणानुसार
आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी असणार्‍या स्पंदनांचे प्रमाण (टक्के)

2

टीप : छायाचित्रांत दिसणार्‍या विविध रंगांचे प्रमाण ठरवण्यासाठी पिप छायाचित्रावर संगणकीय प्रणालीद्वारे आलेख कागदावर असतात, तशा अनेक चौकटी योजल्या. त्यानंतर छायाचित्रातील एकूण चौकटी आणि त्यांच्या तुलनेत प्रभावळीतील प्रत्येक रंगाने व्यापलेल्या चौकटी यांची संख्या मोजली. या संख्येचे टक्क्यांमध्ये रूपांतर करून प्रभावळीतील प्रत्येक रंगाचे प्रमाण सर्वसाधारणपणे निश्‍चित केले आहे.

६ इ. निरीक्षणांचे विवरण आणि निष्कर्ष

६ इ १. सनातन आश्रमातील सात्त्विक वातावरणामुळे मूळ नोंदीच्या वेळी सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अधिक दिसणे : कलियुगातील सर्वसाधारण वास्तूमधून सकारात्मक स्पंदनांपेक्षा नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे प्रमाण अधिक असते. ही चाचणी अत्यंत सात्त्विक अशा सनातन आश्रमात केलेली असल्याने मूळ नोंदीच्या वेळीही (चाचणीसाठी अंकाचे छायाचित्र ठेवण्यापूर्वीही) प्रभावळीत सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण नकारात्मक स्पंदनांपेक्षा अधिक आहे.

६ इ २. इंग्रजी 5 या अंकामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण घटणे : इंग्रजी 5 या अंकामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण घटले आहे. याचे कारण इंग्रजी अंक सात्त्विक नाही. त्यामुळे इंग्रजी अंकांतून वाचक आणि लेखक यांना सात्त्विक स्पंदनांचा लाभ मिळत नाही.

६ इ ३. सर्वसाधारण ५ या अंकामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण थोडे वाढणे : सर्वसाधारण ५ या अंकामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण थोडे वाढले आहे. याचे कारण देवनागरी लिपी ही मुळातच अत्यंत सात्त्विक लिपी आहे. प्रचलित पद्धतीने लिहिलेल्या अंकातून देवनागरी लिपीतील सात्त्विक स्पंदनांचा लाभ अत्यंत अल्प प्रमाणातच मिळतो, हे यातून स्पष्ट होते.

६ इ ४. सात्त्विक ५ या अंकामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढणे : सात्त्विक ५ या अंकामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. सात्त्विक पद्धतीने लिहिलेल्या अंकातून सर्वाधिक प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात, हे यातून स्पष्ट होते. लिखाणातील अंक सात्त्विक असल्यास लिहिणार्‍या आणि वाचणार्‍या अशा दोघांनाही त्याचा आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होतो. त्यामुळे देवनागरी लिपीतील सात्त्विक स्पंदनांचा व्यक्तीला सर्वाधिक प्रमाणात लाभ करून देणारी सात्त्विक अक्षर आणि अंक लेखनपद्धत सर्वत्र प्रचलित व्हायला हवी.

 

७. सात्त्विक ५ या अंकात सकारात्मक स्पंदने
पुष्कळ अधिक प्रमाणात असण्यामागील अध्यात्मशास्त्रीय कारणे

७ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे सात्त्विक अंक लिहिण्याची क्षमता असणारेे साधक-कलाकार पुढे आले आणि त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार परिश्रमपूर्वक अन् सूक्ष्म स्तरावरील अभ्यास करून सात्त्विक अंक लेखनपद्धत विकसित केली.

७ आ. साधक-कलाकारांनी व्यावसायिक हेतूने प्रेरित होऊन नव्हे, तर ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना, या भावाने अंक काढणे : चित्रकला, संगीत, नृत्य आदी सर्व कलांची निर्मिती ईश्‍वरापासून झाली आहे. त्यामुळे ईश्‍वराची (सर्वोच्च आणि सातत्याने मिळणार्‍या आनंदाची) अनुभूती घेता येणे, हे या सर्व कलांचे अंतिम साध्य आहे. थोडक्यात सांगायचे, तर कलेसाठी कला नव्हे, तर ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, याची जाणीव परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनामुळे साधक-कलाकारांना सतत होती. त्यामुळे ते अंक सुंदर दिसण्यासह त्यात देवतेचे तत्त्व आकर्षित करण्याची अधिकाधिक क्षमता यावी, यासाठीही प्रयत्नरत होते. त्यांचा अन्य कोणताही व्यावसायिक हेतू नव्हता.

७ इ. साधक-कलाकारांमध्ये सूक्ष्म स्पंदने जाणण्याची क्षमता असणे : स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. अंकलेखनाची सात्त्विक पद्धत विकसित करतांना प्रत्येक अंकात देवतेचे तत्त्व येत आहे का ?, हे कळण्यासाठी चित्रकारामध्ये सूक्ष्मातील स्पंदने जाणण्याची क्षमता असावी लागते. ही क्षमता योग्य साधनेने विकसित होते. साधक-कलाकारांमध्ये ती क्षमता असल्याने ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार सात्त्विक अंक बनवू शकले.

– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२९.४.२०१६)

ई-मेल : [email protected]

 

इंग्रजी अंक, देवनागरी लिपीतील सर्वसाधारण (प्रचलित) अंक आणि सनातन-निर्मित सात्त्विक अंक यांची तुलनात्मक स्पंदने दर्शवणारी पिप तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घेतलेली छायाचित्र

3

4

6

7

सूचना : ही वातावरणातील प्रभावळीची चाचणी असल्याने पिप छायाचित्र क्र. २, ३ अन् ४ यांची तुलना मूळच्या प्रभावळीशी (छायाचित्र क्र. १ शी) करतांना छायाचित्रांतील पटल, तसेच अंकांची छायाचित्रे यांवरील रंग येथे ग्राह्य धरलेले नाहीत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात