स्वभावदोषांविषयी शंकांचे निरसन

या लेखात आपण स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेविषयी विचारलेल्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या शंका आणि त्याचे निरसन पाहू.

प्रश्न १. स्वभावदोष अनुवंशिक असतात का ?

उत्तर : हो, असू शकतात. आपल्या शरीरातील, विशेषतः मेंदूतील विविध रासायनिक घटकांचे, संप्रेरकांचे (हॉर्मोन्सचे) संतुलन बिघडल्यास त्याचा परिणाम आपल्या मानसिक स्थितीवर होतो. हे संतुलन बिघडण्याचे कारण अनुवंशिक असेल, तर त्या स्वरूपाचा मानसिक आजारही अनुवंशिक असू शकतो. काही वेळा वैद्यकीय औषधोपचारांनी हे बिघडलेले संतुलन पूर्ववत करता येते. याचे दुसरे कारण, म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीचा परिणाम मुलाच्या मानसिक जडण-घडणीत होत असतो. या तत्त्वानुसार संपर्कामुळे आई-वडिलांच्या गुण-अवगुणांचे संस्कारही मुलांच्या मनावर होतात. मुले अनुकरणप्रिय असल्यामुळे आई-वडिलांचे अनुकरण करतांना त्यांचे गुण-अवगुणही कळत-नकळत मुलांकडून आत्मसात केले जातात. या सर्व कारणांचा विचार केल्यास कुटुंबियांचे स्वभावदोष मुलांमध्ये कमी-अधिक प्रमाणात का असतात, हे लक्षात येते.

प्रश्न २. स्वभावदोष पूर्णपणे नष्ट होऊ शकतात का ?

उत्तर : हो. स्वभावदोष मनाशी निगडित आहेत. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया तळमळीने, प्रामाणिकपणे व आणि नियमितपणे अमलात आणल्यास स्वभावदोष दूर होण्यास मदत होते. त्याला आध्यात्मिक कृतींची (साधनेची) जोड दिल्यास ही प्रक्रिया कमी कालावधीत आणि प्रभावी होते.

प्रश्न ३. मृत्यूनंतर नवीन जन्मात नवीन देह
धारण केल्यानंतर कमी झालेल्या स्वभावदोषांसह
असेल की पुन्हा नवीन स्वभावदोष उद्भवतील ?

उत्तर : ‘अन्ते मति सा गति ।’ या उक्तीनुसार मृत्यूपूर्वी जो विचार जिवाच्या मनात येतो, त्यानुसार त्याला गती मिळते. तसेच देहत्यागानंतर त्या जिवाला पातळीनुसार आणि प्रारब्धानुसार त्या त्या लोकात स्थान मिळते. मृत्यूनंतर स्थूलदेह नष्ट झाला, तरी मनोदेह कार्यरत रहातो. नवीन देह धारण करेपर्यंत गतजन्मी केलेल्या पाप-पुण्यानुसार तो जीव विशिष्ट योनीत अडकला असल्यास त्या काळातही त्याच्या मनोदेहावर संस्कार होत रहातात. त्यामुळे मूळचे स्वभावदोष अधिक दृढ होतात. या व्यतिरिक्त नवीन देह धारण केल्यानंतर मूल थोडे मोठे होईपर्यंत आजूबाजूचे अवलोकन करून शिकत असल्याने, सभोवतालच्या परिस्थितीशी निगडित असलेल्या सर्व बाबींचे संस्कारही त्याच्या चित्तावर होतात.

प्रश्न ४. अहं आणि स्वभावदोष यांचे निर्मूलन आणि
गुण- संवर्धन यांमुळे स्वभावदोष दूर करून विविध
उपासनापंथांप्रमाणे साधना करणारे, सांप्रदायिक, हिंदूंचे
धार्मिक नेते आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते यांमध्ये परस्पर
प्रेमभाव वाढवून आंतरिक ऐक्य निर्माण होणे का आवश्यक आहे ?

हा मुद्दा समजण्यासाठी एक उदाहरण पाहूया. एका डोंगरावर एक मंदिर आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर अशा चारही दिशांनी त्या मंदिरात जाण्यासाठी मार्ग आहेत. प्रत्येक दिशेकडून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरून प्रत्येकी एक याप्रमाणे चार व्यक्तींना डोंगर चढून त्या मंदिरात जायचे आहे. डोंगर चढण्यास सुरुवात करण्यापूर्वी त्या चार व्यक्ती एकमेकांपासून खूप दूर असतात. त्या एकमेकांना पाहूही शकत नाहीत. त्या जसजसा डोंगर चढत जातात, तसतसे त्यांच्यातील अंतर कमी होत जाते. त्या जवळ येऊ लागतात. शेवटी मंदिरात पोहोचल्यावर त्यांचे ध्येय साध्य होते आणि त्यांच्यातील अंतर पूर्णतः कमी होते. कोणताही उपासनापंथ किंवा संप्रदाय हा ईश्वरप्राप्तीचाच मार्ग दाखवतो. विविध उपासनापंथांनुसार साधना करणाऱ्यांचेही असेच असते. सुरुवातीला त्यांच्यात खूप अंतर असते. प्रत्येकाचे ध्येय शेवटी ईश्वरप्राप्ती करणे, हेच असते. आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावरून धर्मजागृतीच्या शिखराकडे वाटचाल करतांना सुरुवातीला साधकांमध्ये असलेले अंतर कमी करणे शक्य होईल. सांप्रदायिक ऐक्यामुळे संतां-संतांमध्ये भेदभाव करण्याऐवजी त्यांच्याशी जवळीक साधून सर्वच संत आतून एकच असतात, याची अनुभूती सांप्रदायिक आणि हिंदूंचे धार्मिक नेते यांना घेता येईल. ही समाजाच्या आंतरिक ऐक्याची नांदी असेल. विविध उपासनापंथांप्रमाणे साधना करणारे, सांप्रदायिक, हिंदूंचे धार्मिक नेते आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते यांमध्ये परस्पर प्रेमभाव वाढवून आंतरिक ऐक्य निर्माण झाल्यास ते समाजात निर्माण करणेही शक्य होईल. सांप्रदायिक आणि हिंदूंचे धार्मिक नेते यांना आंतरिक ऐक्य आणि समष्टी साधनेचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. धर्म हा राष्ट्राचा आत्मा आहे. राष्ट्र हा समष्टीचा आत्मा आहे. धर्मजागृती केल्यामुळे धर्माधिष्ठित राष्ट्ररचना करणे शक्य होईल. धर्माधिष्ठित राष्ट्ररचनेमुळे व्यष्टी आणि समष्टी दोहोंची ऐहिक आणि पारमार्थिक उन्नती होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल. त्यामुळे सांप्रदायिकांची समष्टी साधना होऊन त्यांना ईश्वराशी एकरूप होता येईल.

प्रश्न ५. स्वभावदोष-निर्मूलनासाठी संतही प्रयत्न करतात का ?

उत्तर : हो, करतात. संतांनी स्वभावदोषनिर्मूलनासाठी केलेले प्रयत्न पुढीलप्रमाणे आहेत.

प.पू. एकनाथ महाराज : प.पू. एकनाथ महाराजांनीही स्वतःचे स्वभावदोष लिहून त्यांचे गुरु प.पू. जनार्दनस्वामींकडे पाठविले होते. त्या वेळी प.पू. जनार्दनस्वामींनीही त्यांना सांगितले होते, ‘तुम्हांस देहगांवचे ठाणे दिल्हे आहे. तर ठाण्यात सावधपणे वर्तणूक करणे. तेथे ममताताई (षड्रिपूंपैकी ममता) पाटलीण, तिनें लटिकेंच दंभ (षड्रिपूंपैकी दंभ) उभे केलें आहे; म्हणून तुम्हांस सूचनापत्र लिहिलें आहे.’ याचा अर्थ असा – काम-क्रोधादी षड्रिपूंवर पाळत ठेवा. एखादा जरी दोष त्रास देऊ लागला, तर लगेच कळवा. आपण त्याचा बंदोबस्त करू.’

संत तुकाराम महाराज : संत तुकाराम महाराज एके दिवशी समर्थ रामदासस्वामींच्या दर्शनास आले होते. त्या वेळी बोलण्याच्या ओघात समर्थांनी संत तुकाराम महाराजांना जिज्ञासू दृष्टीने ‘तुम्हाला ही उन्नत अवस्था कशी प्राप्त झाली ? कोणत्या साधनेमुळे प्राप्त झाली ? आपली गुरुपरंपरा कोणती’, असे प्रश्न केले असता, संत तुकारामांनी ‘विठ्ठलदास्य’ हा माझा रोजचा मंत्र, ‘चैतन्य’ हा माझा संप्रदाय, मी जे साधन केले ते फक्त मनोनिग्रहासाठीच, मी जेथे-जेथे कीर्तन करतो तेथे-तेथे माझे स्वतःचे दोष मीच उमजून घेऊन लोकांना सांगत असतो’, असे उत्तर दिले. स्वतःचे दोष समजून घेणे, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपण सर्वजण संत तुकाराम महाराजांसारखे नसून आपले दोष झाकण्याचा प्रयत्न करत असतो. इतकेच नव्हे, तर खोटेही सांगतो. आपल्यातील दोष कोणी दाखवले, तर आपल्याला त्याचा रागही येतो. ही लक्षणे मुमुक्षूची खचितच नव्हेत.’

या लेखमालिकेतील माहितीप्रमाणे आचरण करून प्रत्येक व्यक्तीचे जीवन आनंदी बनो, ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

संदर्भ : सनातन निर्मित ग्रंथ – स्वभावदोष (षड्रिपू)-निर्मूलनाचे महत्त्व आणि गुण-संवर्धन प्रक्रिया