वाहनातून प्रवास करतांना वाटेत पुरामुळे निर्माण झालेली संकटे गुरुकृपेने दूर होणे आणि मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडता येणे

भीषण नैसर्गिक आपत्तीत सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि साधक यांनी अनुभवलेली गुरुकृपा

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

 

१. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूरकडे जातांना मार्गावरील पुरातील
पाण्यात वाहन अडकणे आणि गुरुकृपेमुळेच त्यातून आमचे रक्षण होणे

९ जुलै २०१६ या दिवशी मी आणि माझ्यासोबत अन्य दोन, असे आम्ही तिघे जण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून स्कॉर्पिओ गाडीतून कोल्हापूरकडे जायला निघालो होतो. रात्रीचे १० वाजले होते आणि कोल्हापूर ३५ ते ४० किलोमीटर एवढ्या अंतरावर राहिले होते. पाऊस आणि जोराचा वारा चालू होता आणि रस्त्यावर पाणी साचले होते. गाडीची डिपर लाईट बंद पडली होती. त्यामुळे रस्त्यावर पाणी किती साचले आहे, याचा अंदाज येत नव्हता आणि खाली उतरूनही पाण्याचा अंदाज घेणे शक्य होत नव्हते. अशा स्थितीत पाण्यातून वाहन चालवतांना लक्षात आले की, आमच्या गाडीचा अर्ध्याहून अधिक भाग पाण्याखाली बुडाला होता आणि गाडी मागे वळवून घेणेही शक्य नव्हते. त्यामुळे आमच्या समोर मोठे संकटच उभे ठाकले होते. या वेळी आम्ही तिघांनी प.पू. गुरुदेवांना प्रार्थना करून जयघोष केला आणि त्या पाण्यातून गाडी बाहेर काढली. त्यानंतर पुढचा प्रवास करावा कि नको, असा प्रश्‍न पडला. त्याचक्षणी एक घर दिसले. त्या घरातील एका काकूंकडे पुढच्या मार्गाविषयी चौकशी केली असता काकू म्हणाल्या, पुढे जाऊ नका; कारण पुढे पाणी पुष्कळ आहे आणि एक ट्रकही पाण्यात बुडाला आहे. असाच पाऊस पडत राहिला, तर चार दिवस पाणी ओसरणार नाही. ती संपूर्ण रात्र जंगलात काढावी लागली. या संपूर्ण कालावधीत प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळेच आमचे रक्षण झाले. भीषण आपत्काळ काय असतो, याचा अक्षरशः आम्ही अनुभव घेतला. त्या संपूर्ण परिस्थितीत प.पू. गुरुदेवच सतत आमच्या बरोबर होते, याची अनुभूती आली. सकाळी आमच्या गाडीचे निरीक्षण केले असता गाडीत कुठेही पाणी शिरले नव्हते.

 

२. एका घाटातून प्रवास करतांना आमची गाडी मार्गस्थ
झाल्यानंतर घाटातील दरड कोसळणे आणि मृत्यूच्या दाढेतून रक्षण होणे

दुसर्‍या दिवशी म्हणजे १० जुलैला दुपारी १२ वाजेपर्यंत सिंधुदुर्गाच्या दिशेने जाणार्‍या मार्गावरील पाणी ओसरले होते. त्यामुळे विचार करून कोल्हापूरला न जाता सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे परत यायला निघालो. एका घाटातून प्रवास करत असतांना आमची स्कॉर्पिओ गाडी घाटातून मार्गस्थ झाल्यानंतर काही वेळातच घाटातील दरड कोसळली. ईश्‍वराच्या कृपेमुळेच आमचे रक्षण झाले आणि आम्ही या मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडलो.

– (सद्गुरु) कु. स्वाती खाडये, सनातन संस्था

प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक, दैनिक सनातन प्रभात

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात