गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी कपिलेश्‍वरी (फोंडा) येथील पू. (सौ.) सुमन नाईक सनातनच्या संतांच्या मंदियाळीतील ६२ वे संतपुष्प !

सौ. लता दीपक ढवळीकर, सौ. शालिनी मराठे आणि कु. कन्हैया श्रीवास्तव
६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

सनातन आश्रम, रामनाथी (वार्ता.) – कठीण प्रसंगांतही ईश्‍वरावर असलेली दृढ श्रद्धा, श्रीगुरूंप्रती अपार कृतज्ञताभाव, साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी निरपेक्षतेने प्रयत्न करणे आदी अनेक गुणवैशिष्ट्यांनी संपन्न असलेल्या कपिलेश्‍वरी, फोंडा येथील साधिका सौ. सुमन नाईक (वय ६७ वर्षे) या सनातनच्या ६२ व्या समष्टी संत झाल्याची आनंदवार्ता सनातनच्या रामनाथी आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त झालेल्या कार्यक्रमात सर्वांना मिळाली. सनातनच्या साधिका सौ. ज्योती ढवळीकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी यानिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचनही केले.

अशी झाली संतपदाची घोषणा !

कार्यक्रमाच्या आरंभी धर्मावरील आघात रोखण्याच्या तीव्र तळमळीमुळे पू. (सौ.) सुमन नाईक यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात ख्रिस्ती करत असलेल्या हिंदूंच्या अवैध धर्मांतराच्या विरोधात तेथील रुग्णांचे प्रबोधन कशा प्रकारे केले, याविषयी स्वत:चे अनुभव सांगितले. मडगाव स्फोट प्रकरणाच्या वेळी समाजकंटकांनी दिलेल्या त्रासाने खचून न जाता साधना कशा प्रकारे चालू ठेवली, त्याविषयी सांगितले. त्यानंतर सौ. सुमन नाईक यांच्यासमवेत सेवा करणार्‍या सहसाधकांनी त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचे कथन केले. ही गुणवैशिष्ट्ये ऐकतांना पू. (सौ.) सुमन नाईक यांना गुरूंप्रतीच्या कृतज्ञतेने भरून आले. अशा भावविभोर वातावरणातच सौ. सुमन नाईक यांनी संतपद प्राप्त केल्याची घोषणा करण्यात आली. सनातनच्या संत पू. (सौ.) मालिनी देसाई यांनी त्यांचा सन्मान केला. यापुढे पू.(सौ.) सुमन नाईक गोवा राज्यातील साधकांना साधनाविषयक मार्गदर्शन करण्याची समष्टी सेवा करतील, ही आनंदाची वार्ताही या वेळी देण्यात आली.

श्रीगुरूंच्या कृपेने ३ साधक जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त जाहले !
भाग्य आम्हा सर्वांचे असे परात्पर गुरु आम्हास लाभले !

सनातनच्या ३ साधकांनी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठल्याच्या वार्तेने श्रीकृष्णाकडून मिळालेल्या आनंदात आणखी वाढ झाली. या वेळी बिहार येथून रामनाथी आश्रमात साधनेसाठी आलेला, सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणारा बालसाधक कु. कन्हैया श्रीवास्तव (वय १२ वर्षे), प्रभावी लेखनशैली असणार्‍या, उतारवयातही तळमळीने सेवा करणार्‍या सौ. शालिनी प्रकाश मराठे (वय ६८ वर्षे), तसेच अडचणींवर मात करून साधकांना साहाय्य करणार्‍या, दायित्व घेऊन तळमळीने सेवा करणार्‍या आणि श्रीगुरूंप्रती उत्कट भाव असलेल्या सौ. लता दीपक ढवळीकर (वय ५७ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर प्राप्त केल्याचे या वेळी घोषित करण्यात आले. सौ. लता ढवळीकर या गोव्याचे कारखाने आणि बाष्पक मंत्री श्री. दीपक ढवळीकर यांच्या धर्मपत्नी आहेत. सनातनचे संत पू. सीताराम देसाई यांच्या हस्ते तीनही साधकांचा सत्कार करण्यात आला.

हे श्रीगुरूंच्या कृपेने शक्य झाले ! – पू. (सौ.) सुमन नाईक

संतपदी विराजमान झाल्यानंतर पू. (सौ.) सुमन नाईक मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या, सर्वकाही केवळ श्रीगुरूंच्या कृपेनेच शक्य झाले. साधकांच्या अडचणी सोडवतांना मी श्रीगुरूंना प्रार्थना करत असे की, तुम्हीच उत्तर द्या. त्यात माझा मीपणा नको. मी असमर्थ असल्याने ईश्‍वराला प्रार्थना केल्यावर तोच येऊन साहाय्य करतो.

या वेळी त्यांची कन्या सौ. श्‍वेता नाईक यांनी कोणतीही अडचण असल्यास आई मनातून प.पू. डॉक्टरांना सांग, असे मला नेहमी सांगते, असे मनोगत व्यक्त केले.

साधकांना साधनेत साहाय्य करणार्‍या आणि धर्मप्रसाराची सेवा तळमळीने
करणार्‍या सौ. सुमन (मावशी) नाईक संतपदावर आरूढ !

कपिलेश्‍वरी, फोंडा येथील ६७ वर्षांच्या सुमन (मावशी) नाईक म्हणजे प्रेमभाव आणि तत्त्वनिष्ठता यांचा अनोखा संगम ! त्या सर्वांना सहजतेने आपलेसे करून घेतात. साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती व्हावी, याची त्यांना पुष्कळ तळमळ आहे. त्या साधकांना साधनेसाठी सर्वतोपरी साहाय्य करतात आणि वेळोवेळी तत्त्वनिष्ठतेने त्यांच्या चुकाही लक्षात आणून देतात.

या वयातसुद्धा कोणतीही सेवा करण्याची त्यांची सिद्धता आहे. ऊन-पाऊस कशाचीही तमा न बाळगता त्या धर्मप्रसाराची सेवा तळमळीने करत आहेत. अधिकाधिक जणांपर्यंत साधना पोचावी, तसेच त्यांच्यात राष्ट्र-धर्म यांच्याप्रती जागृती व्हावी, यासाठी त्या गावा-गावांत जाऊन प्रसार करतात. त्यांचे आणखी एक आगळे-वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध प्रचंड चीड आहे. समाजात राष्ट्र-धर्म यांच्या विरोधात कोणतीही घटना घडल्यास त्या कणखरपणे विरोध दर्शवतात.

कठीण प्रसंगीही स्थिर रहाणार्‍या सुमनमावशींनी केवळ वयस्करांपुढे नव्हे, तर तरुण साधकांसमोरही मोठा आदर्श ठेवला आहे. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून त्या सनातनच्या संतांच्या मांदियाळीतील ६२ व्या समष्टी संतरत्न झाल्या आहेत.

पू. सुमनमावशींची उत्तरोत्तर आध्यात्मिक उन्नती होऊ दे, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात