सनातन प्रभात हे राष्ट्रजागरण करणारे वृत्तपत्र ! – प.पू. श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज

प.पू. श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज यांना श्रीफळ अर्पण करतांना श्री. पराग गोखले
प.पू. श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज यांना
श्रीफळ अर्पण करतांना श्री. पराग गोखले

दहिवली (जिल्हा पुणे), २० जुलै – सनातन प्रभात हे राष्ट्रजागरण करणारे वृत्तपत्र आहे. सनातन संस्था आणि दैनिक सनातन प्रभात यांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे साधनारत राहून हिंदु धर्मरक्षणाचे कार्य हातून होत आहे, असे मार्गदर्शन प.पू. श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज यांनी केले. दहिवली (पुणे) येथील स्वामी करपात्री फौंडेशन आणि अखिल भारतवर्षीय धर्मसंघ संस्कार शाला या आश्रमात हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त प.पू. श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज यांची १९ जुलै या दिवशी भेट घेतली. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. या वेळी प.पू. श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज यांचा दैनिक सनातन प्रभातचा गुरुपौर्णिमा विशेषांक, श्रीफळ आणि भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

ते पुढे म्हणाले, हे धर्मकार्य असेच उत्तरोत्तर वाढत रहाणार. हे प्रसादरूपी दैनिक देऊन तुम्ही आम्हाला प्रसन्न केले. आम्ही सनातनच्या रामनाथी आश्रमाला अवश्य भेट देऊ. भेटीस आलेल्या साधकांची नम्रता पाहून एवढी विनम्रता कुठून शिकलात ? असे आश्‍चर्य व्यक्त केले. त्यांनी उज्जैन येथील सिंहस्थ कुंभमेळ्यात भेटलेल्या सनातन संस्थेच्या साधिका कु. पूनम चौधरी आणि सनातनचे संत पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांची आस्थेने चौकशी केली.

या वेळी त्यांचे गुरुबंधू प.पू. श्री गुणप्रकाश चैतन्यजी महाराज यांचाही पाक्षिक सनातन प्रभात आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांनाही आश्रमात येण्याचे निमंत्रण देण्यात आले.

क्षणचित्र

१. प.पू. श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज यांचे दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेले संस्कृत काव्य आणि त्याचे भाषांतर पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. भाषांतरकर्त्या सौ. मंगला रिसबूड यांनी काव्याच्या मूळ आशयाच्या अधिकतम, म्हणजेच ९० टक्के जवळ जाणारा अनुवाद केला असल्याचे सांगून त्यांचे मुक्तकंठाने कौतुक केले. या काव्याचा पद्यात्मक अनुवादही करावा, अशी इच्छा व्यक्त केली.

२. प.पू. श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज यांना श्री. पराग गोखले पुष्पहार घालत असतांना त्यांनी तो हार प.पू. श्री गुणप्रकाश चैतन्यजी महाराज यांना प्रदान करण्यास सांगितला. प.पू. श्री गुणप्रकाश चैतन्यजी महाराज यांनी पुष्पहार स्वीकारून पुन्हा तो श्री. गोखले यांच्या गळ्यात घातला आणि सांगितले, हा पुष्पहार तुम्ही ज्या वाहनातून आलात, त्याला घाला. आश्रमातून परत निघतांना साधकांनी तो पुष्पहार चारचाकीला घातला. त्यानंतर प्रवासात मुसळधार पाऊस पडत होता; मात्र पुष्पहारामुळे रक्षण झाल्याची अनुभूती साधकांना घेता आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात