कु. तृप्ती गावडे यांनी दीपावलीच्या दिवशी घेतलेला भावसत्संग !

६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या
कु. तृप्ती गावडे यांनी दीपावलीच्या दिवशी घेतलेला भावसत्संग !

trupti_gavade
कु. तृप्ती गावडे

८.११.२०१५ या दिवशी भावसत्संगाच्या आरंभी प.पू. गुरुदेवांच्या हृदयात त्यांच्याशी एकरूप होऊन त्यांच्या चरणांकडे जाण्याचा भावसत्संग ९० मिनिटे चालू होता. त्यामध्ये सौ. सानिकाताईंनी एक लहानसा भावाचा प्रयत्नही सांगितला. तेव्हा ताईंनी साधकांना काय जाणवते ?, असे विचारले. त्या वेळी सर्वांना हलकेपणा आणि थंडावा जाणवला. त्यावरून ताई म्हणाली, भावाच्या छोट्याशा प्रयत्नाने एवढे सारे पालटते, तर आपण सर्वांनी भावाचे प्रयत्न किती वाढवले पाहिजेत, हे लक्षात घेऊ या. भाव हा असा आहे की, तो देवाकडे आणि त्याच्या गुणांकडे क्षणात घेऊन जातो. भावाचे प्रयत्न हे आपल्याकडून देवच करवून घेतो आणि तसा भाव देवच प्रत्येकात निर्माण करतो. त्यानुसार कृतज्ञतेचा दीप आपल्या हृदयात तेवत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करूया. त्यानंतर सानिकाताईंनी भावाच्या प्रयत्नांमध्ये पुढील प्रश्‍न विचारले आणि त्याची साधकांनी सांगितलेली उत्तरे पुढे देत आहे.

 

शरिरात आपण भावाचे दीप कुठे कुठे लावू शकतो ?

१. डोळे

अ. सतत गुरुचरणांकडे लक्ष जाण्यासाठी डोळ्यांत दीप लावूया.

आ. आपल्या डोळ्यांना दिसलेली कृती ही दिसेल ते कर्तव्य या भावाने करून कर्तव्याचा दीप लावूया.

इ. आपल्या मनात एखाद्या साधकाविषयी तो दिसल्यावर पूर्वग्रहाचे विचार चालू होतात. त्याऐवजी त्या साधकात जे गुण आहेत, ते गुण आत्मसात करून त्यांचा गुणरूपी दीप आपल्यात लावूया.

ई. प्रत्येक साधकात प.पू. डॉक्टरांचे सगुण रूप आहे, हा दीप आपल्या डोळ्यांत लावू या.
वरीलप्रमाणे अनेक भावाचे प्रयत्न करून आपल्या डोळ्यांत दैवी दृष्टी येणार; म्हणून असे प्रयत्न वाढवूया.

२. हात

अ. प्रत्येक वस्तू हाताळतांना, उचलतांना आणि ठेवतांना ती कृती कृतज्ञतेने करण्याचा दीप हातात लावूया.

आ. हातून होणारी प्रत्येक कृती करतांना गुरुदेवांच्या चरणांजवळ दीप ठेवत आहोत, असा भाव ठेवण्याचा प्रयत्न करूया.

इ. सेवा करतांना अखंड भावाचा दीप लावूया. त्यासाठी आपल्यात आपण परिपूर्णतेचे आणि भावपूर्णतेचे दीप लावले, तर त्या सर्व कृती हिंदु राष्ट्रातील असतील.

ई. गुरुदेवांच्या चरणांना सूक्ष्मातून कृतज्ञतेच्या दीपाने सतत ओवाळूया.

३. मन

अ. मनात अखंडपणे सकारात्मकतेचा दीप लावूया.

आ. आपल्या मनामध्ये ईश्‍वराचा मोठा दीप आहे. त्याच्या अवतीभोवती असलेले आपले अहं आणि दोष यांमुळे दिव्याची ज्योत धूसर झाली आहे. तिच्यावर आवरण आले आहे. ती काजळी आपण गुणांचे आणि अहं निर्मूलनाचे दीप लावून स्वच्छ वस्त्राने पुसून काढूया. त्यामुळे मनातील दीप उजळेल.

इ. मनच सर्व गोष्टींना उत्तरदायी असते. सेवा करतांना मनात भाववृद्धीच्या प्रयत्नांचा दीप लावूया. आपण सर्वांनी खरा दीप मनातच लावायचा आहे. त्यासाठी पुढील प्रयत्न करूया.

अ. मनात व्यापकतेचा दीप लावूया.

आ. मन चंचल आहे; म्हणून मनात स्थिरतेचा दीप लावूया.

इ. मनात चिकाटीचा दीप लावूया.

ई. मनात तळमळ, तत्परता, सद्गुण, प्रेमभाव अशा गुणांचे दीप लावूया.

उ. हे सर्व करतांना प्रयत्न व्हावे, यासाठी तेथे सातत्याचा दीप लावूया.

ऊ. आपण मनात अगदी महत्त्वाच्या ठिकाणी मनमोकळेपणाचा दीप लावणे अपेक्षित आहे, तो तेवत ठेवण्यासाठी प्रयत्न वाढवूया.

४. हृदय

अ. आपले हृदय आहे; म्हणून आपण आहोत; म्हणून हृदयात त्या भावाने कृतज्ञतेचा दीप लावूया. . हृदयात भावभक्तीचा दीप लावूया.

इ. मारुतीरायाच्या हृदयात प्रभु श्रीरामचंद्र आहेत, तसे आपल्या सर्वांच्या हृदयात प.पू. गुरुदेव आहेत, असा भावदीप लावूया.

ई. हृदयात आत्मविश्‍वासाचा दीप लावूया.

५. श्‍वासात नामजपाचा दीप लावूया.

६. पाय

पायात शक्तीचा दीप लावूया.

७. कान

अ. कानात श्रवणभक्तीचा दीप लावूया.

आ. गुरुदेवांची स्तुतीसुमने ऐकण्याचा दीप लावूया.

इ. आपण ऐकतो आणि सोडून देतो. प्रयत्न करत नाही. ऐकून कृतीत आणण्याचा दीप लावूया.

८. सहजतेचा दीप

सर्व ठिकाणी दीप लावणार, तर प्रत्येक कृती सहजतेने होण्यासाठी सहजतेचा दीप लावूया.

९. हास्य आणि प्रसन्नता यांचा दीप

आपण तोंडवळ्यावर हास्य आणि प्रसन्नता यांचा दीप लावूया.

१०. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी दीप

आपण लावलेले दीप अखंड तेवत रहाण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे महत्त्वाचे आहे, तर याचा दीप लावूया.

११. आपल्याला हे दीप हिंदु राष्ट्राच्या
स्थापनेसाठी अखंड तेवत ठेवायचे आहेत !

१२. संघटितपणाचा दीप

प्रत्येक साधक हे सर्व करतांना कुठेतरी न्यून पडतो. आपण त्याला साहाय्य करण्यासाठी दीप लावूया. दादा, तू येथे न्यून पडतोस, चुकतोस, तर तुझ्यात हा विझलेला दीप परत लाव, असे मनमोकळेपणे सांगूया. आपण सर्वजण एक मोठा दीप लावणार आहोत. तो कोणता, तर संघटीतपणाचा दीप. एकमेकांची मने जुळल्यावर खर्‍या अर्थाने दीपप्रज्वलन होईल.

१३. आपण स्वतःची प्रगती करून घेण्याचा
आणि गुरुचरणी अर्पण होण्याचा दीप आपल्यात लावूया.

अनुभूती : आपण वरील प्रयत्न करायचे आणि प्रगतीचा मोठा दीप रविवार दिनांक १५.११.२०१५ पर्यंत गुरुचरणांवर अर्पण करूया.

१. आपण मोठा दीप लावणार आहोत, असे सांगितल्यावर भावाच्या प्रयत्नाच्या आरंभी प.पू. गुरुदेव पांढर्‍या कपड्यांमध्ये आसंदीत बसलेले जाणवले आणि ते तेथे खळखळून हसत आहेत, असे दिसले.

२. भावसत्संगात सर्व साधक उत्स्फूर्तपणे कुठे कुठे दीप लावायचे, हे सांगत होते. भावाच्या सत्संगाच्या शेवटी गोपी तृप्तीताईने सर्वांना डोळे उघडे ठेवून मनात नकारात्मक विचार आणा, असे सांगितले. तेव्हा कोणीही तसे विचार करण्यास सिद्ध नव्हते. त्या वेळी प्रयोगासाठी आपण तसा विचार करूया, असे ताईंनी सांगितले. भावसत्संग काही सेकंदासाठी थांबवून सर्वांना विचारले असता, कोणाच्याही मनाला किंचितसाही नकारात्मक विचार शिवला नाही. विचार करायचा म्हटले, तरी ग्लानी येत होती. त्या वेळी आपण मनात न हा शब्द उच्चारला, तरी देवाचे साहाय्य मिळणे थांबते, तर या नकारात्मकतेचा म्हणजेत नरकासुराचा वध करूया. आपल्या मनात आनंदाचे आणि निरपेक्षतेचे दीप लावूया.

आपण असे दीप लावणार आणि दीप लावतांना हवाही येईल, म्हणजे मनात अयोग्य विचार येऊन तो दीप विझवण्याचा प्रयत्न करील, तेव्हा देवाला शरण जाऊन दृढनिश्‍चय मनी ठेवून संघर्ष करत का होईना दीप लावूया. आपण आश्रमात रहातो आणि येथे आपण आनंद मिळवण्यासाठी आलो आहोत, तर आनंदी रहा. आपण आनंदी राहिलो नाही, तर आपले गुरु कधीतरी आनंदी रहातील का ? त्यांना आपले साधक हिरे-मोती वाटतात; म्हणूनच सतत आनंदी रहा. आपण १० घंटे सेवा करतो. तेव्हा त्या कृतीची फलनिष्पत्ती आणि आनंद आपण १० मिनिटे भावपूर्ण केलेल्या सेवेतून मिळते.

या सत्संगातून गोपी तृप्तीताईची साधकांनी प्रगती करून घेण्याची तीव्र तळमळ जाणवत होती. ती पुष्कळ तळमळीने सांगत होती. तेव्हा देवच तिच्या माध्यमातून सांगत आहे, असे जाणवत होते.

– श्री. संजय माने, कोल्हापूर (९.११.२०१५)