गोपीभावातील कु. तृप्ती गावडे यांनी कृष्णभक्ती वाढवण्याविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन

ध्येयप्राप्तीसाठी चिकाटीने, प्रामाणिकपणे
आणि देवावर श्रद्धा ठेवून सातत्याने प्रयत्न करा !

१. प्रत्येकाचा साधनामार्ग आणि कौशल्य
निराळे असूनही सर्वांचे ध्येय ‘ईश्‍वरप्राप्ती’ हेच असणे

trupti_gavade
कु. तृप्ती गावडे

प्रत्येकाचा साधनामार्ग निरनिराळा असल्याने त्या त्या मार्गाने त्याची प्रगती होत असते. अनेक साधक म्हणतात, ‘आम्हाला गोपीभावाने साधना करायची आहे’. प्रत्येकाचे कौशल्य निराळे असते. त्या गुणांनुसार त्यांची उन्नती होत असते. एखाद्या साधकाला एखाद्या मार्गाने साधना करायला सांगितल्यावर लगेच निराशा येते. ‘मला त्या मार्गानुसार साधना नको. मला गोपीभावानुसार साधना करायची आहे’, असे तो सर्वांना सांगतो. आपली उन्नती कुठल्या मार्गाने होणार आहे, हे आपल्यापेक्षा गुरु आणि श्रीकृष्ण यांनाच अधिक ठाऊक असते. आपल्या मनाने विशिष्ट मार्गानुसार जाण्यासाठी हट्ट केला, तर आपण देवाजवळ जलद गतीने जाऊ शकत नाही. मार्ग निरनिराळे असले, तरी आपल्याला कृष्णाशी एकरूप व्हायचे असून ईश्‍वरप्राप्तीच करायची आहे, हे लक्षात ठेवावे.

२. ध्येयप्राप्तीसाठी मोठा कालावधी निश्‍चित करून
‘ध्येयप्राप्तीसाठी किती दिवस राहिले ?’, हे मोजण्यापेक्षा
ते साध्य करण्यासाठी श्रीकृष्णाचे साहाय्य घेणे आवश्यक !

काही साधक उन्नती होण्यासाठी विशिष्ट ध्येय ठेवतात. एका साधिकेने साधनेतील प्रयत्न पूर्णत्वाला नेण्याचे ध्येय वर्ष २०१३ च्या गुरुपौर्णिमेपर्यंत, म्हणजे वर्षभरात साध्य करण्याचे ठरवले होते. त्याविषयी विचारल्यावर तिने मला सांगितले, माझ्या मनात नकारात्मक विचारांचे प्रमाण अधिक आहे; म्हणून मी ध्येय साध्य करण्याचा कालावधी इतका मोठा ठेवला आहे. मला दोष घालवायला पुष्कळ वेळ लागेल. प्रयत्न करतांना आपण ध्येय गाठण्यासाठी किती दिवस राहिले, हे मोजतो. स्वतःकडून प्रयत्न झाले नाहीत; म्हणून निराश होतो. आपण स्वतःकडे कर्तेपण घेतो; पण शेवटी आपल्याला देवालाच शरण जायचे आहे, हे लक्षात ठेवायला हवे.

३. ध्येय ठरवल्यावर देवावर पूर्ण श्रद्धा ठेवणे
आवश्यक असणे, तसेच प्रयत्न करतांना देवाचे
साहाय्य घेतल्यास आणि आज्ञापालन करून कृतीच्या
स्तरावर प्रयत्न केल्यास ध्येय अल्प कालावधीत पूर्ण होणे

Gopi_trupti-500

आपण ध्येय ठेवतो, तेव्हा ‘ध्येय ठरवणारा देव आहे आणि ते पूर्ण करवून घेणाराही तोच आहे’, अशी आपली श्रद्धाही असायला पाहिजे. त्यामुळे कर्तेपण स्वतःकडे घ्यायला नको. ध्येय ठरवले, तरी देवाला सांगायचे, ‘हे ध्येय लवकरात लवकर पूर्ण होऊ दे’. मग देव आपले दोष घालवण्यासाठी प्रसंग निर्माण करतो. आपण तितक्याच तळमळीने योग्य क्रियमाण वापरून प्रयत्न केले पाहिजेत. चिकाटी, आज्ञापालन, भाव, तळमळ, निरपेक्ष प्रेम आणि शरणागत भाव यांचे तंतोतंत पालन केले पाहिजे. हे गुण स्वतःमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करतांना प्रत्येक वेळी देवाचे साहाय्य घेतले पाहिजे. आपण (मीपणाने) करायला गेल्यास ते आपल्याकडून पूर्ण होणार नाही. प्रत्येक वेळी देवाचे आज्ञापालन करून कृतीच्या स्तरावर प्रयत्न केले, तरच अल्प कालावधीत ध्येय पूर्ण होते. देव सांगेल, तसे प्रयत्न करत रहावे. आपण ध्येय ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न करतो; पण ठरवलेल्या कालावधीत ते पूर्ण झाले नाही, तर निराश न होता ‘देवाने माझ्यात किती गुणांची वाढ केली ? पूर्वीपेक्षा बोलण्यात आणि वागण्यात किती पालट केले ?’ यांकडे लक्ष द्यायला पाहिजे. देव मला निश्‍चित पुढे नेत आहे, अशी श्रद्धा असायला हवी. देव उन्नती करून घेणारच आहे.

‘देवा, मला कलियुगातही तुझी भक्ती करण्याची संधी दिलीस. आता माझे मन इकडे तिकडे न भरकटता तुझ्याच भक्तीत रममाण होऊ दे आणि तुझ्याच विचारांत विलीन होऊ दे, ही प्रार्थना !’

– कु. तृप्ती गावडे (३.११.२०१२)

 मन निर्मळ ठेवून कृष्णाला
अर्पण करा आणि त्याच्या विचारांचे माध्यम बना !

आपले मन कृष्णमय करण्यासाठी करावयाचे प्रयत्न आणि होणारे लाभ

आपले मन केवळ कृष्णासाठी असते. आपण सतत कृष्णाविषयी विचार करत रहायचे. आपण स्वयंपाक बनवतो, तो कृष्णासाठी आणि त्याच्या गोपगोपींसाठी. आपले मन नामजप करू शकते, कृष्णाला आळवू शकते. कृष्णाने सेवा दिली; म्हणून सारखी कृतज्ञता व्यक्त करावी. ‘जी काही सेवा करतो, ती कृष्णाजवळ जाण्यासाठी आहे’, असा विचार करावा. काही चुकले, ‘तर कृष्णाने सुधारण्यासाठी संधी दिली आहे’, असा विचार करावा.

1377263618_gokulasthami

कृष्णाला शरण जाऊन सेवा करायचा विचार करावा. नामजप करत राहिल्याने मन स्थिर रहाते, तसेच अंतर्मुखता वाढते. आपण शरिराने सेवा करतो, तशी मनालाही सेवा द्यायला पाहिजे. आपण सतत देवाविषयी बोलायचे आणि कार्य करायचे. त्यामुळे आपले मन प्रसन्न आणि आनंदी रहाते. मन नामाविना ठेवले, तर त्यात अयोग्य विचार येतात. मनात नकारात्मक विचार आले की, अनावश्यक बोलणे चालू होते. त्यामुळे आपल्या मनावर आवरण येते आणि आपण देवाच्या विचारांपासून दुरावतो. आपल्यातील नकारात्मक विचार आणि स्वभावदोष यांमुळे वाईट शक्तींना आपल्यावर आक्रमण करणे सोपे जाते. त्यांनी आक्रमण करून त्रासदायक शक्ती प्रक्षेपित केल्यामुळे व्यक्तीचे मन आणि बुद्धी यांच्याभोवती त्रासदायक स्पंदनांचे सूक्ष्म-आच्छादन निर्माण होते, त्याला ‘त्रासदायक शक्तीचे आवरण’ असे म्हणतात. व्यक्तीचे मन आणि बुद्धी यांवर नियंत्रण मिळवणे, हा या आक्रमणामागील वाईट शक्तींचा उद्देश असतो. मनुष्याला त्रास देणारे भुवलोक आणि सप्तपाताळ येथील अदृश्य जीव (लिंगदेह) म्हणजे अनिष्ट शक्ती. यांना वाईट शक्ती असेही म्हटले जाते. वाईट शक्तींचे भूत, पिशाच, हडळ, मांत्रिक यांसारखे वेगवेगळे प्रकार आहेत. अनिष्ट शक्ती मनुष्याच्या शरिराबाहेर राहून किंवा त्याच्या शरिरात राहून (शरिरात स्थाने निर्माण करून) त्याला शारीरिक, मानसिक, कौटुंबिक असे विविध स्वरूपाचे त्रास देतात.

मनात चांगले विचार आणल्यास ते आनंदी असणे आणि वाईट
विचारांमुळे ते भरकटत असल्याने मन निर्मळ ठेवून कृष्णाला अर्पण करणे आवश्यक !

आपल्या कुटुंबातील व्यक्तींवर चांगले संस्कार केल्यास त्या सतत आनंदी राहू शकतात; मात्र वाईट संस्कार झाल्यास कुटुंबातील व्यक्ती आपल्यापासून दुरावतात. तसे आपले मन आहे. चांगले विचार केले की, ते सतत आनंदी, उत्साही असते; मात्र वाईट विचार मनात आणले की, ते निराशेने भरकटत असते; म्हणून आपल्या मनात सतत कृष्णाचेच विचार असायला पाहिजेत आणि त्यासाठीच हा देह अन् हे मन आहे. आपले मन निर्मळ ठेवले की, तिथे देवाचे विचार असतात. देवाचे चैतन्य असते. त्यासाठी आतापासूनच, अगदी या क्षणापासूनच मन निर्मळ ठेवून कृष्णाला अर्पण करा आणि कृष्णाच्या विचारांचे माध्यम बना !

– कु. तृप्ती गावडे