आगामी भीषण आपत्काळात आरोग्यरक्षणासाठी उपयुक्त ठरतील अशा औषधी वनस्पतींची लागवड आतापासूनच करा !

अनुक्रमणिका

आगामी काळात तिसरे महायुद्धहोऊन त्यात कोट्यवधी लोक अणूसंहारामुळे मृत्यू पावतील, तसेच भीषण नैसर्गिक आपत्तीही ओढवतील, असे संतांचे भाकीत आहे. आपत्काळात दळणवळणाची साधने, डॉक्टर, तयार औषधे इत्यादी उपलब्ध होतील, याची शाश्‍वती नसते. अशा वेळी आयुर्वेदीय औषधी वनस्पतींचा वापर करून आपल्याला आरोग्यरक्षण करावे लागेल. योग्य वेळी योग्य ती औषधी वनस्पती उपलब्ध होण्यासाठी ती आपल्या सभोवताली असायला हवी. यासाठी अशा औषधी वनस्पतींची लागवड आताच करून ठेवणे, ही काळाची नितांत आवश्यकता आहे. नैसर्गिक, तसेच मानवनिर्मित विविध कारणांमुळे अनेक औषधी वनस्पती दुर्मिळ झाल्या आहेत. त्यांच्या लागवडीमुळे त्यांच्या संवर्धनासह आपले आरोग्य टिकवण्यासही साहाय्य होणार आहे. भावी हिंदुराष्ट्रात आयुर्वेद हीच मुख्य उपचारपद्धत असणार आहे. यादृष्टीनेही आयुर्वेदाच्या संवर्धनासाठी वनौषधींची लागवड करणे आवश्यक ठरते. आयुर्वेद हे भारतीय शास्त्र आहे. त्याच्या संवर्धनासाठी औषधी वनस्पतींची लागवड करणे, हे प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाचे कर्तव्य आहे.

भावी हिंदुराष्ट्रात आयुर्वेद हीच मुख्य उपचारपद्धत असणार आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.३.२०१५)

 

१. औषधी वनस्पतींविषयी आवश्यक ती माहिती जाणून घेऊन नियोजनपूर्ण लागवड करा !

या लेखात आरोग्यरक्षणासाठी आवश्यक अशा आणि भारताच्या बहुतेक भागांत सहजपणे होऊ शकतील अशा निवडक औषधी वनस्पतींची माहिती दिली आहे. औषधी वनस्पतींच्या नावांमध्ये प्रदेशांनुसार भेद असू शकतो, हे जाणून प्रत्येक वनस्पतीचे शास्त्रीय नावही कंसात दिलेले आहे. शास्त्रीय नावांच्या आधारे इंटरनेटवरून त्या त्या वनस्पतीची छायाचित्रे, तसेच अन्य माहिती जाणून घेता येईल. औषधी वनस्पतींची लागवड पावसाळ्याच्या आरंभी, म्हणजेच १५ जून ते १५ जुलै या कालावधीत केल्यास त्यांची वाढ चांगली होते. लागवड करण्यापूर्वी बियाणे, रोपे, कुंड्या इत्यादी सामान जमवणे, खड्डे खोदणे यांसारखी पूर्वसिद्धता करावी लागेल. विस्तारभयास्तव लागवडीसंबंधी लहान लहान पैलूंची माहिती येथे देणे शक्य होणार नसले, तरीही या लेखात आवश्यक तेवढी सर्वसामान्य माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. औषधी वनस्पतींची संख्या अगणित आहे. सर्वच वनस्पती सर्वांनी लावणे अशक्य आणि अव्यवहार्य आहे. यासाठी जागेची उपलब्धता आणि त्या त्या औषधी वनस्पतीची विविध रोग दूर करण्याची क्षमता यांनुसार औषधी वनस्पती लावण्याचा एक ढोबळ प्राधान्यक्रम येथे दिला आहे. याला अनुसरून प्रत्येकानेच आपापल्या क्षमतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड करावी. एखादी वनस्पती किती संख्येमध्ये लावावी, हे प्रत्येकाने स्वतःच्या आवश्यकतेनुसार तारतम्याने ठरवावे. यंदाच्या वर्षी लागवड करण्याचे ठरवलेल्या वनस्पतींचे प्रत्येकी न्यूनतम १ रोपटे लावण्याचा संकल्प प्रत्येकानेच करावा.

पुढे नमूद केलेल्या काही औषधी वनस्पतींचे गुणधर्म आणि उपयोग सनातन-प्रकाशित आयुर्वेदीय औषधी या मराठी भाषेतील ग्रंथात दिले आहेत. या ग्रंथांच्या आधारे या औषधी वनस्पतींचा विविध रोगांमध्ये उपयोग करता येईल.

 

२. प्रत्येकाच्या घरात असाव्यात अशा, तसेच
सदनिकेतही (फ्लॅटमध्येही) लावता येण्याजोग्या वनस्पती

शहरातील बहुतेक लोक सदनिकांमध्ये किंवा भाड्याच्या खोल्यांमध्ये रहात असल्याने त्यांना औषधी वनस्पतींची लागवड करणे शक्य होत नाही. अशा स्थितीत पुढील वनस्पतींची कुंड्यांमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लागवड करून त्या वनस्पती घराच्या सज्जामध्ये (बाल्कनीत) ठेवता येतील. त्यांतील वेली सज्जाच्या किंवा खिडक्यांच्या गजांवर सोडता येतील. झाडाला दिलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी कुंडीत किंवा पिशवीमध्ये झाड लावण्यापूर्वी कुंडी किंवा पिशवी यांच्या तळाशी छिद्रे असणे आवश्यक आहे. वनस्पतींना शक्य तेवढा अधिक वेळ सूर्यप्रकाश मिळेल, अशा जागी त्या ठेवाव्यात. ज्यांच्याकडे जागा उपलब्ध आहे, त्यांनी अशा वनस्पती घरात न लावता घराभोवती लावाव्यात. या वनस्पती नेहमीच्या विकारांमध्ये अत्यंत उपयोगी असल्याने प्रत्येकाने सूत्र क्र. २ मधील शक्य तेवढ्या प्रकारच्या वनस्पती लावाव्यात.

२ अ. लहान वनस्पती

क्र. औषधी वनस्पतीचे नाव कोणत्या
विकारांत उपयुक्त ?
औषधासाठी
उपयुक्त अंग
लागवडीसाठी
उपयुक्त अंग
१. तुळस (Ocimum tenuiflorum) बहुतेक विकार पाने बी
२. दूर्वा (Cynodon dactylon) उष्णतेचे आणि पित्ताचे सर्व विकार पंचांग (टीप) रोप
३. झेंडू (Tagetes erecta) कोणत्याही प्रकारचा व्रण, भाजणे-पोळणे आणि डोळ्यांचे विकार पान किंवा फूल बी
४. काळमेघ (Andrographis paniculata) ताप, पोटदुखी आणि पित्ताचे विकार पंचांग (टीप) बी
५. पानफुटी (Bryophyllum pinnatum) मूत्रवहनसंस्थेचे विकार पान पान
६. कोरफड (Aloe vera) भाजणे-पोळणे, मासिक पाळीशी संबंधित विकार, खोकला, डोळ्यांचे आणि यकृताचे विकार पानांतील गर रोप
७. नागरमोथा (Cyperus rotundus) ताप, पित्ताचे, पचनसंस्थेचे विकार कंद कंद
८. परिपाठ (Fumaria officinalis) उष्णतेचे विकार आणि ताप पंचांग बी
९. पिठवण (Uraria picta) ताप,  सूज , श्‍वसनसंस्थेचे विकार पंचांग बी किंवा फांदी
१०. सर्पगंधा (Rauvolfia serpentina) रक्तदाब, निद्रानाश आणिपोटाचे विकार मूळ बी किंवा फांदी
११. सालवण (Desmodium gangeticum) ताप आणि हृदयाचे विकार पंचांग बी

टीप – पंच म्हणजे पाच आणि अंग म्हणजे वनस्पतीचा भाग. वनस्पतीचे मूळ, खोड, पान, फूल आणि फळ या पाचही भागांना एकत्रितपणे पंचांग असे म्हणतात. येथे पंचांग म्हणजे मुळासकट संपूर्ण वनस्पती.

२ आ. वेली

 

 

क्र. औषधी वनस्पतीचे नाव कोणत्या
विकारांत उपयुक्त ?
औषधासाठी उपयुक्त अंग लागवडीसाठी उपयुक्त अंग
१. गुळवेल (Tinospora cordifolia) बहुतेक विकार कांड (वेलीचा तुकडा) कांड (वेलीचा तुकडा)
२. जाई (Jasminum officinale) तोंड येणे आणि व्रण (जखम) पान बी
३. विड्याच्या पानांची वेल (Piper betle) अपचन, शुक्राणूंची संख्या अल्प असणे आणि कफाचे सर्व विकार पान रोप
४. कांडवेल (हाडसांधी) (Cissus quadrangularis) सूज, सांधेदुखी, अस्थिभग्न (फ्रॅक्चर) आणि वेदना कांड कांड

 

३. विविध वर्गांतील वनस्पतींची लागवड करण्याच्या पद्धती

ज्यांच्याकडे भूमी उपलब्ध आहे, त्यांनी त्यांच्याकडील भूमीच्या उपलब्धतेनुसार कोणत्या वनस्पती लावाव्यात, हे पुढे दिले आहे. सूत्र क्र. २ मध्ये दिलेल्या वनस्पती लावून जागा शिल्लक असल्यास सूत्र क्र. ४ मधील वनस्पतींची लागवड करावी. तरीही जागा शेष असल्यास सूत्र क्र. ५ मधील वनस्पतींची लागवड करावी. या वनस्पतींची लहान वनस्पती, वेली, झुडुपे आणि वृक्ष अशा वर्गांमध्ये विभागणी केलेली आहे. वृक्ष वगळता अन्य वर्गांतील वनस्पती कुंड्यांमध्येही लावता येतात. त्यांतील एकेका वर्गातील वनस्पतींची लागवड पुढीलप्रमाणे करावी.

३ अ. लहान वनस्पती

लागवड करण्यापूर्वी भूमी खणून-नांगरून भुसभुशीत करून घ्यावी आणि वाफे बनवून लागवड करावी. जास्त पाऊस पडणार्‍या प्रदेशांत जमिनीपासून उंच असे, म्हणजे गादीवाफे करावेत. मध्यम पाऊस पडणार्‍या जागी जमिनीला समांतर, तर अल्प पाऊस पडणार्‍या ठिकाणी जमिनीपेक्षा खालच्या पातळीला वाफे बनवावेत. वाफे बनवतांना भूमी किती सुपीक आहे त्यानुसार शेणखताचे प्रमाण ठरवून ते भूमीत मिसळून घ्यावे.

३ आ. वेली

वेलींना आधार लागत असल्याने त्या कोणत्याही मोठ्या झाडाच्या शेजारी किंवा कुंपणाशेजारी आवश्यकतेनुसार चर किंवा खड्डा खणून लावून त्या झाडावर किंवा कुंपणावर सोडाव्यात.

३ इ. झुडुपे

अडूळसा, निर्गुडी, मेंदी, शिकेकाई, सागरगोटा (गजगा) यांसारख्या वनस्पती कुंपणाला लावल्या जातात. जमिनीत लागवड करायची असल्यास आवश्यकतेनुसार खड्डा खणावा. यांतील काही वनस्पतींची लागवड मोठ्या कुंड्यांमध्येही करता येऊ शकते.

३ ई. वृक्ष

या वनस्पतींची लागवड करण्यासाठी झाडाच्या होणार्‍या वाढीनुसार १ ते २ मीटर लांबी, रुंदी आणि खोली असलेला खड्डा खणावा. खड्डा खणतांना आरंभी निघणार्‍या मातीमध्ये शेणखत मिसळून त्यातील थोडी माती खड्ड्यामध्ये पसरावी. त्यावर वनस्पतीचे १ ते २ वर्षांचे चांगले वाढलेले रोप ठेवून खड्डा नीट भरून घ्यावा. झाडाच्या भोवती पाण्यासाठी आळे करावे. दोन वृक्षवर्गीय झाडांमध्ये त्यांची पूर्ण वाढ झाल्यावर त्यांच्या फांद्या एकमेकांना लागणार नाहीत, एवढे अंतर असावे.

 

४. घराभोवती असलेल्या थोड्याफार जागेत किंवा परसबागेत लावण्याजोग्या वनस्पती

४ अ. लहान वनस्पती

 

क्र. औषधी
वनस्पतीचे नाव
कोणत्या
विकारांत उपयुक्त ?
औषधासाठी
उपयुक्त अंग
लागवडीसाठी
उपयुक्त अंग
१. माका (Eclipta alba) डोळे, केस आणि पचनसंस्था यांचे विकार पंचांग बी किंवा रोप
२. अळू (Colocasia esculenta) पित्ताचे विकार पाने आणि कंद कंद
३. पुनर्नवा (Boerhavia diffusa) सूज, तसेच रक्ताभिसरण आणि मूत्रवहन संस्था यांचे विकार पंचांग बी किंवा रोप
४. गवती चहा (Cymbopogon citratus) सर्दी, खोकला, ताप आणि मूत्रवहनसंस्थेचे विकार पाने रोप
५. ब्राह्मी (Centella asiatica) उष्णतेचे आणि पित्ताचे सर्व विकार, तसेच म्हातारपणातील सर्व विकार पंचांग रोप
६. हळद (Curcuma longa) सर्दी, खोकला, कफ अन् मेद यांचे विकार, मधुमेह आणि स्तनाचे विकार कंद कंद
७. वेखंड (Acorus calamus) तोतरेपणा, बोबडेपणा, स्मृतीशी संबंधित, तसेच श्‍वसनसंस्थेचे विकार कंद कंद
८. सदाफुली (Catharanthus roseus) मधुमेह आणि कर्करोग पंचांग बी किंवा रोप
९. शेवंती (Chrysanthemum morifolium) श्‍वसन आणि पचन संस्थांचे विकार पाने आणि फुले बी किंवा रोप
१०. भुईआवळा (Phyllanthus urinaria) यकृताचे विकार पंचांग बी किंवा रोप
११. आघाडा (Achyranthes aspera) प्लीहेचे विकार, मूत्रवहनसंस्थेचे विकार आणि मूळव्याध पंचांग बी किंवा रोप
१२. दर्भ (Desmostachya bipinnata) स्त्रियांचे, तसेच मूत्रवहनसंस्थेचे विकार मूळ बी किंवा रोप

४ आ. झुडुपवर्गीय वनस्पती

 

क्र. औषधी
वनस्पतीचे नाव
कोणत्या
विकारांत उपयुक्त ?
औषधासाठी
उपयुक्त अंग
लागवडीसाठी
उपयुक्त अंग
१. जास्वंद (Hibiscus rosa sinensis) केसांचे विकार फुले आणि पाने फांदी
२. डिकेमाली (Gardenia gummifera) पोटदुखी आणि जंत होणे डिंक फांदी
३. अडुळसा (Justicia adhatoda) उष्णतेचे आणि पित्ताचे सर्व विकार, श्‍वसनसंस्थेचे विकार पंचांग फांदी
४. निर्गुडी (Vitex negundo) सूज, सांधेदुखी, वाताचे आणि कानाचे विकार बिया आणि पाने फांदी
५. मांदार (Calotropis procera) कफाचे विकार आणि सूज पंचांग बी किंवा फांदी
६. मोगरा (Jasminum sambac) पित्ताचे विकार फुले आणि पाने फांदी
७. मेंदी (Lawsonia inermis) केसांचे विकार पाने फांदी

४ इ. वृक्ष

 

क्र. औषधी
वनस्पतीचे नाव
कोणत्या
विकारांत उपयुक्त ?
औषधासाठी
उपयुक्त अंग
लागवडीसाठी
उपयुक्त अंग
१. हिरडा (Terminalia chebula) बहुतेक सर्वच विकार फळ बी
२. कडूनिंब (Azadirachta indica) व्रण (जखम), मधुमेह आणि त्वचेचे विकार साल, पाने आणि फळे बी
३. लिंबू (Citrus limon) पचनाशी संबंधित विकार फळे कलम
४. प्राजक्त (Nyctanthes arbor-tristis) संधिवात आणि पित्ताचे विकार साल, पाने आणि फुले फांदी
५. शेवगा (Moringa oleifera) गळू होणे आणि कफाचे विकार साल, पाने, फुले आणि शेंगा बी किंवा फांदी

 

५. अधिक भूमी उपलब्ध असलेल्यांसाठी अतिरिक्त जागेत लावता येण्याजोग्या वनस्पती

५ अ. लहान वनस्पती

 

क्र. औषधी
वनस्पतीचे नाव
कोणत्या
विकारांत उपयुक्त ?
औषधासाठी उपयुक्त अंग लागवडीसाठी
उपयुक्त अंग
१. अननस (Ananas comosus) पचनाशी संबंधित विकार फळ फळावरील शेंडा
२. सुरण (Amorphophallus campanulatus) मूळव्याध कंद कंद
३. वाळा (खस) (Vetiveria zizanioides) उष्णतेचे, पित्ताचे, तसेच मूत्रवहनसंस्थेचे विकार मूळ रोप
४. रिंगणी (Solanum surattense) खोकला आणि वाताचे विकार पंचांग बी किंवा रोप

५ आ. वेली

 

क्र. औषधी
वनस्पतीचे नाव
कोणत्या
विकारांत उपयुक्त ?
औषधासाठी
उपयुक्त अंग
लागवडीसाठी
उपयुक्त अंग
१. कारले (Momordica charantia) रक्त आणि त्वचा यांचे विकार आणि मधुमेह फळे बी
२. कडू पडवळ (Trichosanthes dioica) पित्ताचे आणि त्वचेचे विकार पंचांग बी
३. शिरदोडी (Leptadenia reticulata) डोळ्यांचे विकार पंचांग बी
४. अनंतमूळ (Hemidesmus indicus) रक्त आणि त्वचा यांचे विकार मूळ रोप
५. पहाडमूळ (Cissampelos pareira) जुलाब आणि संधीवात मूळ बी किंवा रोप
६. वावडिंग (Embelia ribes)
(हे फार दुर्मिळ असल्याने पर्याय म्हणून Embelia basaal वापरावे.)
जंत होणे फळे बी
७. सागरगोटा (Caesalpinia crista) सूज, वेदना आणि मूळव्याध बी बी
८. कोहळा (Benincasa hispida) पित्त, मेंदू, मूत्रवहनसंस्थेचे विकार फळ बी
९. पाडावेल (Cyclea peltata) डोळ्यांचे विकार पंचांग बी किंवा रोप

५ इ. वृक्ष

 

क्र. औषधी
वनस्पतीचे नाव
कोणत्या
विकारांत उपयुक्त ?
औषधासाठी
उपयुक्त अंग
लागवडीसाठी
उपयुक्त अंग
१. आवळा (Emblica officinalis) बहुतेक सर्वच विकार फळे बी, रोप किंवा कलम
२. बाहवा (Cassia fistula) त्वचेचे विकार आणि बद्धकोष्ठता साल, पाने आणि शेंग बी
३. नारळ (Cocos nucifera) रक्त आणि पित्त यांचे विकार फळे फळ किंवा रोप
४. दालचिनी (Cinnamomum zeylanicum) पचन आणि श्‍वसन या संस्थांचे, तसेच दातांचे विकार साल, पाने बी किंवा रोप
५. लवंग (Syzygium aromaticum) फुले बी किंवा रोप
६. कुडा (Holarrhena pubescens) जुलाब, आव आणि मूळव्याध मूळ आणि साल बी
७. बेल (Aegle marmelos) मधुमेह आणि पांडुरोग मूळ, साल, पाने आणि फळे बी
८. बिब्बा (Semecarpus anacardium) कफ आणि वात यांचे विकार फळे बी
९. उंबर (Ficus glomerata) रक्त आणि पित्त यांचे विकार साल आणि पाने फांदी
१०. महाळुंग (Citrus medica) हृदय आणि यकृत यांचे विकार फळे बी किंवा फांदी
११. नागचाफा (Mesua ferrea) उष्णतेचे आणि पित्ताचे सर्व विकार, तसेच रक्ती मूळव्याध फुलांतील केशर रोप किंवा कलम
१२. सीता अशोक (Saraca asoca) स्त्रियांचे विकार साल बी
१३. बेहडा (Terminalia bellerica) कफ आणि केस यांचे विकार फळे बी
१४. पिंपळ (Ficus religiosa) स्त्रियांचे विकार आणि बुद्धीशी संबंधित विकार मूळ, साल, पाने आणि फळे बी
१५. वड * (Ficus benghalensis) गर्भधारणेशी संबंधित, तसेच स्त्रियांचे विकार पारंब्या, चीक आणि फळे फांदी
१६. रक्तरोहिडा (Tecomella undulata) रक्त आणि यकृत यांचे विकार साल बी
१७. अर्जुनसादडा (Terminalia cuneata) हृदयाचे विकार आणि अस्थिभग्न (फ्रॅक्चर) साल बी
१८. वायावर्ण (Crataeva nurvala) शरिरावरील गाठी आणि मूत्रवहनसंस्थेचे विकार साल बी
१९. सातवीण / सप्तपर्णी (Alstonia scholaris) हिवताप साल बी
२०. पळस (Butea monosperma) जंत होणे, स्त्रियांचे, तसेच मूत्रवहनसंस्थेचे विकार पाने आणि फुले बी
२१. रक्तचंदन (Pterocarpus santalinus) रक्तदोष, सूज आणि मुका मार लागणे खोड बी

 

६. लागवडीची आवश्यकता नसलेल्या; परंतु
आपल्या भोवतालच्या जागेमधून हेरून ठेवण्याजोग्या वनस्पती

काही वनस्पती निसर्गतःच पुष्कळ मोठ्या प्रमाणात उगवत असतात. अशा वनस्पतींची वेगळी लागवड करण्याची आवश्यकता नसते; परंतु आपल्याला अशा वनस्पतींची ओळख व्हावी आणि त्या आपल्या भोवताली कुठे मिळतात, हे माहीत असणे आवश्यक असते. उदाहरण म्हणून अशा काही वनस्पती पुढील सारणीत दिल्या आहेत. यांसारख्या वनस्पती आपल्या भोवतालच्या जागेत कुठे आहेत, हे हेरून ठेवल्यास आवश्यकता भासेल, तेव्हा आयत्या वेळी त्या शोधण्यातील वेळ वाचवता येईल.

क्र. औषधी वनस्पतीचे नाव कोणत्या विकारांत उपयुक्त ? औषधासाठी उपयुक्त अंग
१. लाजाळू (Mimosa pudica) रक्तस्राव, मूळव्याध आणि अंग (गुदद्वार किंवा योनी) बाहेर येणे पंचांग
२. भांबुरडी (Cyathocline purpurea) व्रण (जखम) पंचांग
३. पित्तपापडा (Fumaria vaillantii) ताप आणि पित्ताचे विकार पंचांग
४. कोरांटी (Barleria prionitis) सांधेदुखी आणि दातांचे विकार पंचांग
५. एरंड (Ricinus communis) वातविकार मूळ आणि बी

 

७. मध्यम आणि मोठे भूधारक यांनी समाजहितासाठी
मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करणे, ही त्यांची समष्टी साधनाच आहे !

ज्या व्यक्तींकडे मध्यम (३ – ४ एकर) किंवा मोठ्या प्रमाणात लागवड करण्यायोग्य भूमी आहे, अशा व्यक्तींनी केवळ स्वतःच्या परिवारापुरताच विचार न करता समाजबांधवांचा विचार करून मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करावी. भावी आपत्काळात या लागवडीमुळे अनेकांना आयुर्वेदीय औषधे उपलब्ध होऊन त्यांचे आरोग्यरक्षण होईल. या निःस्वार्थी समाजसेवेच्या माध्यमातून अशा व्यक्तींची समष्टी साधना होईल !

 

८. लागवडीसाठी औषधी वनस्पती कोठे मिळतात ?

१. खेडेगावांमध्ये, तसेच त्यांच्या शेजारील जंगलात पुष्कळ औषधी वनस्पती उपलब्ध असतात. तेथील जाणत्या रहिवाशांना या वनस्पतींविषयी माहितीही असते. शहरात रहाणारे बहुतांशी लोक सुटीच्या निमित्ताने गावाला जात असतात. अशा वेळी त्यांना लागणार्‍या वनस्पतींचे बियाणे किंवा रोपे त्यांना खेडेगावांतून आणता येतील.

२. प्रत्येक राज्याचे शेतकीखाते, तसेच वनखाते यांमध्ये औषधी वनस्पती किंवा त्या वनस्पती कोठे मिळतात, यांविषयीची माहिती उपलब्ध असते.

३. पुष्कळ आयुर्वेदीय महाविद्यालयांची रोपवाटिका उद्याने असतात. स्थानिक आयुर्वेदीय महाविद्यालयांना संपर्क करूनही औषधी वनस्पती मिळवता येतील.

४. यांव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पती पाहिजे असल्यास त्या पुढील ठिकाणी मिळू शकतात. त्या त्या संस्थेच्या नावापुढे कंसात संपर्क क्रमांक दिला आहे.

– डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र (०२३५८-२८२०६४)

– डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, महाराष्ट्र (०७२४-२२५८३७२)

– महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अ.नगर, महाराष्ट्र (०२४२६-२४३२०८)

– सीएस्आईआर-केन्द्रीय औषधीय एवं सगंध पौधा संस्थान (सीमैप), लखनौ, उ.प्र. (०५२२-२७१८६२९)

– जवाहरलाल नेहरू कृषी विश्‍वविद्यालय, जबलपुर, म.प्र. (०७६१-२६८१७०६)

– डॉ. यशवन्त सिंह परमार बागवानी एवं वानिकी विश्‍वविद्यालय, हिमाचल प्रदेश (०१७९२-२५२३६३)

– सुगंधी व औषधी वनस्पती, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. (०२४५२- २३४९४०८)

– अखिल भारतीय औषधी सुगंधी वनस्पती व पानवेल संशोधन योजना, वनस्पती रोगशास्त्र व कृषी अणुजीवशास्त्र विभाग, महात्मा     फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. (०२४२६-२४३३१५, २४३२९२)

–  कोपरकर नर्सरी, गवे, ता. दापोली, जि. रत्नागिरी. (०२३५८-२८२१६५/२६७५२१, ९४२२४३१२५८)

– इको फ्रेंडली नर्सरी, परंदवाडी, सोवटणे फाट्याजवळ, जि. पुणे.(९४२२२२४३८४, ९२२५१०४३८४)-

-. ए.डी.एस्. नर्सरी, कशेळे, कर्जत-मुरबाड रस्ता, जि. रायगड.

– धन्वन्तरि उद्यान, पिंपळगाव उज्जैनी, जि. नगर. (९६७३७६९६७६)

– औषधी आणि सुगंधी वनस्पती संशोधन संचालनालय, बोरीयावी, गुजरात. (०२६९२-२७१६०२)

– जवाहरलाल नेहरू कृषी विश्‍वविद्यालय, जबलपूर, मध्यप्रदेश (०७६१-२६८१७०६)

– फाउंडेशन फॉर रीव्हायटलायझेशन ऑफ लोकल हेल्थ ट्रेडीशन्स (एफ्आर्एल्एच्टी), बेंगळूरु, कर्नाटक (०८०-२८५६८०००)

लेखक : डॉ. दिगंबर मोकाट, सहाय्यक प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पू. वैद्य विनय भावे, संशोधक, आयुर्वेदशास्त्र, अध्यात्म विश्‍वविद्यालय.

Leave a Comment