आयुर्वेदानुसार तांब्या-पितळ्याच्या भांड्यांचे महत्त्व

१. ताम्रजलाचे आयुर्वेदोक्त लाभ

‘तांब्याच्या स्वच्छ भांड्यात २ घंट्यांपेक्षा (तासांपेक्षा) जास्त काळ ठेवलेल्या पाण्याला ‘ताम्रजल’ असे म्हणतात. ‘रसरत्नसमुच्चय’ हा आयुर्वेदातील रसशास्त्र या विषयावरील एक प्रमाणभूत संस्कृत ग्रंथ आहे. याच्या पाचव्या अध्यायातील ४६ व्या श्लोकात तांबे या धातूचे पुढील गुणधर्म दिलेले आहेत.

‘तांबे पित्त आणि कफ नाशक आहे. तांब्यामुळे पोटदुखी, त्वचाविकार, जंत होणे, लठ्ठपणा, मूळव्याध, क्षय (टी.बी.), पंडुरोग (रक्तातील हिमोग्लोबिन अल्प असणे, अ‍ॅ्नीमिया) हे विकार दूर होण्यास साहाय्य होते. तांबे शरिराची शुद्धी करणारे, भूक वाढवणारे आणि डोळ्यांना अतिशय हितकारक आहे.’ तांब्यामुळे रक्ताभिसरणातील अडथळे दूर होऊन रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयाचे स्वास्थ्य उत्तम रहाते. कांती सतेज होते. हे सर्व लाभ स्वच्छ चकचकीत तांब्याच्या भांड्यात साठवलेल्या पाण्याच्या नियमित उपयोगानेही प्राप्त होतात.

ताम्रजलाप्रमाणेच पितळीच्या भांड्यात ठेवलेले पाणीही शरिराला लाभदायक आहे. पितळ हा तांबे आणि यशद (झिंक) यांचा मिश्रधातू आहे. यशद शरिरातील अनेक क्रियांसाठी आवश्यक असते. यशदाच्या न्यूनतेमुळे मुलांची सर्वांगीण वाढ मंदावते. दूध पाजणार्‍या मातांना यशदाची आवश्यकता अधिक प्रमाणात असते.

 

२. तांब्या-पितळ्याच्या भांड्यांत ठेवलेल्या पाण्यावर झालेले आधुनिक संशोधन

अ. पितांबरी प्रॉडक्टस् प्रा. लि. या आस्थापनाने तांब्याच्या औषधी गुणधर्मांचा सखोल अभ्यास करण्यासाठी विविध चाचण्या घेतल्या. त्यात ई. कोलाय (E. coli) हा जुलाबाला कारणीभूत असणारा जिवाणू तांब्याच्या संपर्कात राहिल्यास अडीच घंट्यांतच नष्ट होतो, असे आढळून आले.

आ. इंग्लंडमधील नेचर या विज्ञान आणि संशोधन या विषयावरील मासिकाने नॉर्थम्ब्रिया विद्यापिठातील डॉ. रीड या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या संशोधनाची माहिती प्रसिद्धी केली आहे. डॉ. रीड यांनी पितळ्याच्या आणि मातीच्या भांड्यातील पाण्यात ई. कोलाय हे जुलाबाचे जंतू सोडले आणि दोन्ही भांड्यांतील पाण्याची ६, २४ आणि ४८ घंट्यांनी चाचणी केली. त्या चाचणीत पितळ्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यात ई. कोलायच्या जंतूचे प्रमाण झपाट्याने अल्प होते, असे निदर्शनास आले.

इ. वर्ष २०१५ मध्ये ‘युनिव्हर्सिटी ऑफ साऊथहॅम्पटन’ने केलेल्या एका संशोधनानुसार ‘रेस्पिरेटरी वायरस’पासून (फुप्फुसांमध्ये संक्रमित होणार्‍या विषाणूंपासून) तांबे वाचवू शकतो. ‘रेस्पिरेटरी वायरस’मध्ये ‘सार्स’ (सीवियर एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम) आणि ‘मर्स’ (मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम) हे २ विषाणू आढळून येतात. अशा प्रकारचे विषाणू अन्य वस्तूंवर अनेक दिवस जिवंत रहातात; मात्र तांबे यांना त्वरित नष्ट करतो.

ई. ‘अमेरिकन सोसायटी ऑफ मायक्रोबॉयलॉजी’मध्ये प्रकाशित एका लेखानुसार ‘युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड’मधील संशोधक रीटा कॉरवेल यांनी विविध विषाणूंचा अभ्यास केला. त्यात त्यांच्या लक्षात आले की, खुप जुने विषाणू तांब्यावर आले की, ते लगेच नष्ट होतात किंवा ते निष्क्रीय होतात. यामुळे काही जण अंघोळीसाठी तांब्याच्या टबचा वापर करतात.

वर्ष १९८० पूर्वी भारतात तांब्याच्या भांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता; मात्र नंतर अ‍ॅल्युमिनियम, स्टील आदी धातूंच्या भांंड्यांचा वापर होऊ लागला आणि तांब्याच्या भांड्यांचा वापर अल्प झाला. भारतात पूर्वीपासून तांब्याच्या भांड्यांचा वापर केला जातो. आयुर्वेेदानुसार तांब्यामध्ये विषाणूविरोधी गुण आहेत. तसेच त्याच्यामुळे रोगप्रतिकार क्षमताही वाढते.

 

३. तांब्या-पितळ्याच्या भांड्यांत पाणी ठेवण्यापूर्वी ती भांडी स्वच्छ घासणे आवश्यक !

आपण ज्या तांब्या-पितळ्याच्या भांड्यांत पाणी ठेवणार असू, ती भांडी प्रतिदिन स्वच्छ घासणे आवश्यक आहे. भांडी स्वच्छ न घासल्यास हवेतील प्राणवायूच्या संपर्कामुळे तांब्याचे ऑक्साईड बनते आणि त्याच्या थरामुळे तांब्याचे गुणधर्म पाण्यात उतरत नाहीत. शिवाय पाणी वापरण्यास अयोग्य होते.

 

४. पिण्याचे पाणी शिळे नसावे !

२४ घंट्यांच्या वर एका भांड्यात ठेवलेले पाणी शिळे होते. असे पाणी प्यायल्यास वात, पित्त आणि कफ हे तीनही दोष वाढतात. यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणीही २४ घंटे झाल्यावर पालटावे.

– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

 

५. आरोग्यासाठी उपकारक असलेले तांब्याच्या भांड्यातील पाणी !

पूर्वी आपल्याकडे तांब्याच्या भांड्यांमध्ये पाणी साठवले जायचे. तांब्याच्या भांड्यांमधून पाणी पिणेे आपल्या शरिराला लाभदायक असते. याला शास्त्रीय कारणेही आहेत. गुणकारी असलेली तांब्याची भांडी मात्र आता लोप पावू लागली आहेत. शहरांमध्ये तर अशी भांडी मिळणे दुरापास्तच झाले आहे. आधुनिकतेच्या नावाखाली आपण स्वत:चेच अहित करून घेत आहोत. आपल्याला मिळालेल्या या गुणकारी तांब्याच्या भांड्याची उपयुक्तता पाहूया,

. तांब्याच्या भांड्यामधून पाणी प्यायल्यामुळे शरिरातील रक्त वाढते. त्यामुळे अ‍ॅनिमियाचा धोका संभवत नाही.

आ. तसेच तांब्याच्या भांड्यातून सकाळी आणि संध्याकाळी पाणी प्यायल्यामुळे सांधेदुखी दूर होते.

इ. तांब्याच्या भांड्यात ८-१० घंटे ठेवलेले पाणी प्यायल्याने कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात रहाते आणि हृदयाची क्षमता वाढून हृदयविकार दूर रहातात.

ई. तांब्यामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असल्याने जखम लवकर बरी होण्यास साहाय्य होते. त्यामुळे एखादी जखम झाली असल्यास प्रतिदिन तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.

उ. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे शरिरातील संप्रेरके (हार्मोन्स) संतुलित रहातात. यामुळे थायरॉइडचा धोका दूर होतो.

ऊ. तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये पर्याप्त प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट्स असतात, जे कर्करोगाशी लढण्यात साहाय्यक ठरतात. यामुळे कर्करोगाचा धोका अल्प रहातो.

ए. पित्त, गॅस किंवा पोटाची दुसरी समस्या असेल, तर तांब्याच्या भांड्यातील पाणी उपयुक्त ठरते. तांब्याच्या भांड्यात न्यूनतम ८ घंटे ठेवलेले पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ उत्सर्जित होऊन पचनक्रिया सुधारते.

ऐ. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास त्वचेतील लुळेपणा दूर होतो. मृत त्वचा (डेड स्किन) निघून जाते आणि चेहरा सतत उजळ दिसतो.

शास्त्रसंपन्न असलेल्या आपल्या परंपरांची सखोलताच यातून स्पष्ट होते. सध्याचा मनुष्य सुधारणावादी बनण्याचा अतिशहाणपणा करून पूर्वापार चालत आलेल्या गोष्टींना डावलून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. जुने ते सोने याप्रमाणे आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या प्रथा या खरोखरच आपल्या आरोग्यासाठी स्वास्थकारक आणि उपयुक्त आहेत; मात्र आजचा मानव हे जाणेल तो सुदिन !

संदर्भ : दैनिक लोकमत

Leave a Comment