नामजप आणि इतर योगमार्ग यांची तुलना (भाग १)

Article also available in :


‘नामजप’ या लेखमालिकेतील विविध लेखांतूने आपण नामाचे महत्त्व, त्याचे लाभ आणि अन्य महत्त्वपूर्ण सूत्रे वाचली. या लेखात आपण ‘हठयोग’, ‘भक्तीयोग’, ‘कर्मयोग’, ‘ज्ञानयोग’, ‘ध्यानयोग’ इत्यादी विविध योगमार्गांची नामजपाशी केलेली स्वतंत्र तुलना पहाणार आहोत. हा लेख वाचून नामसाधनेला आरंभ करण्याचा वाचकांच्या बुद्धीचा निश्चय होवो, ही श्रीगुरुचरणी प्रार्थना !

 

१. आसने, त्राटक, प्राणायाम आणि नामजप

आसने आणि प्राणायाम ही स्थूलदेहाने करावयाची साधना आहे, तर नामजप ही सूक्ष्मदेहाने करावयाची साधना आहे. स्थूलदेहाने सूक्ष्मदेहाची साधना चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही. याउलट सूक्ष्मदेहाने स्थूलदेहाची होऊ शकते; म्हणून प्राणायाम आणि आसने यांच्या तुलनेत नामजप ही अधिक श्रेष्ठ साधना आहे. एक घंटा अखंड नामजप म्हणजे १० घंटे अखंड त्राटक किंवा प्राणायाम करणे होय. पुढे दिलेल्या अनुभूतीवरून आसने, प्राणायाम इत्यादींच्या तुलनेत नामजप ही किती श्रेष्ठ प्रतीची साधना आहे, हे लक्षात येते.

१ अ. योगासने न करतासुद्धा केवळ नामजपाने शरिरात हलकेपणा अनुभवणे आणि आनंदाची अनुभूतीयेणे

‘पूर्वी आसने, प्राणायाम केल्याविना माझा दिवस जात नसे. एकदा सनातन संस्थेच्या सत्संगात देहाच्या शुद्धीविषयीची सारणी शिकवण्यात आली. तेव्हा मला कळले की, नामजप ही सर्वांत श्रेष्ठ उपासना आहे. नामसाधना चालू केल्यापासून योगासने न करतासुद्धा केवळ नामजपाने शरिरात हलकेपणा येतो, असे अनुभवायला येऊ लागले आणि हठयोग संपून पूर्णवेळ नामसाधना चालू झाली. तेव्हापासून आनंदाची अनुभूतीदेखील येत आहे.’

– सौ. सुधा सुधाकर मांज्रेकर, बोरीवली, मुंबई.

 

२. कर्मयोग आणि नाम

२ अ. कर्मफल आणि नाम

नामजप चालू असतांना ‘अहं’ नसतो. जे कर्म होते, त्यात हेतू नसल्याने ती केवळ क्रिया असते, म्हणजे अकर्म कर्म होते; म्हणून त्या कर्माचे फळ भोगावे लागत नाही. नामजप बंद झाला की ‘अहं’ असतो आणि त्यामुळे कर्मफलन्याय लागू होतो.

२ आ. कर्म करणे आणि नाम घेणे यांपेक्षा ‘कर्म देवच करत आहे’, असे समजणे सर्वोत्तम

‘कर्म करून देवाला अर्पण करणे, यापेक्षा ‘नामजप करत कर्म करणे’, हे जास्त योग्य. मात्र ‘कर्म देवच करत आहे’, म्हणजे ईश्वरेच्छेनेच, यदृच्छाप्रारब्धानेच सर्वकाही होत आहे असे समजणे, हे सर्वोत्तम.’ – प.पू. भक्तराज महाराज

 

३. भक्तीयोग आणि नामजप

३ अ. कर्मकांड आणि नामजप

ब्राह्ममुहुर्तावर उठणे, आंघोळ करून शुचिर्भूत होणे, सात्त्विक आहार घेणे, उपवास करणे, सोवळे-ओवळे पाळणे, देवळात जाणे इत्यादी साधनेसाठी आवश्यक आहे का ? याचे उत्तर असे की, कर्मकांडानुसार साधना करणार्‍याला या गोष्टी आवश्यक आहेत; पण त्याहून वरच्या पातळीच्या उपासनाकांडानुसार नामजप करणार्‍याला या गोष्टींची किंचितही आवश्यकता नाही; कारण या गोष्टींनी फार थोड्या प्रमाणात आणि थोडा वेळ टिकणारा लाभ होतो, उदा. देवळात जाण्याने केवळ १५ मिनिटे ०.०००१ टक्का एवढीच सात्त्विकता वाढते, रजस्वलेला शिवल्यास शिवणार्‍यातील रजोभाव केवळ १५ मिनिटे ०.०००१ टक्का एवढा वाढलेला असतो. याउलट एकाग्रतेने आणि भावपूर्ण नामजप २ मिनिटे केला, तरी तो करणार्‍याची सात्त्विकता नाम घेतांना ५ टक्क्यांनी वाढते; म्हणूनच उपासनाकांडानुसार साधना करणार्‍याच्या, म्हणजे सतत नामजप करणार्‍याच्या दृष्टीने या सूत्रांना काही महत्त्व नाही.

३ आ. यज्ञ आणि जपयज्ञ (नामजप)

३ आ १. यज्ञात जिवाची हत्या केल्याने जे पाप लागते, ते बारा वर्षे भोगावे लागते. त्यासाठी प्रायश्चित्त सांगितलेले आहे. प्रायश्चित्त म्हणून जप इत्यादी करावा लागतो. तसे पाप जपयज्ञात (नामजपात) नाही; कारण जपयज्ञाला सात्त्विक आणि अहिंसक यज्ञ मानले आहे; म्हणूनच कर्मकांडातील विधीयज्ञांपेक्षा जपयज्ञ श्रेष्ठ आहे.

ये पाकयज्ञाश्चत्वारो विधियज्ञसमन्विताः ।
सर्वे ते जपयज्ञस्य कलां नार्हन्ति षोडशीम् ।। – मनुस्मृति, अध्याय २, श्लोक ८६

अर्थ : चार विधीयज्ञयुक्त पाकयज्ञांना (वैश्वदेव, बलिकर्म, नित्यश्राद्ध आणि अतिथीभोजन) जपयज्ञाच्या सोळाव्या कलेचीही योग्यता नाही; म्हणूनच अशा कर्मकांडापेक्षा जपयज्ञच श्रेष्ठ होय.

या संदर्भात भगवान श्रीकृष्ण म्हणतात (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १०, श्लोक २५), ‘‘यज्ञानां जपयज्ञोऽस्मि ।’’ म्हणजे ‘यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे, म्हणजेच निरनिराळ्या प्रकारच्या यज्ञांमध्ये जपयज्ञ सर्वश्रेष्ठ आहे.’

३ आ २. ‘सर्व यज्ञांची परिणती नामयज्ञात होत असते. यज्ञाची नामयज्ञात परिणती होणे म्हणजे आत्मरत होणे. आत्मरत झालेल्या साधकाने यज्ञ केला नाही तरी चालते. नामयज्ञ ही ईश्वराची विभूती असल्यामुळे तिला ‘पराभक्ती’ असे म्हणतात. पराभक्ती म्हणजे ‘प्रेमलक्षणाभक्ती’. गोपींची भक्ती अशीच होती. त्याला ‘वैधी प्रेमसाधना’ म्हणतात. या साधनेत भक्ताच्या कायिक, वाचिक आणि मानसिक क्रिया या सर्व भगवंतासाठीच असतात, म्हणजे भगवंताला स्नान घालण्यासाठी भक्त स्नान करतो, भगवंताला जेवू घालण्यासाठी तो जेवतो इत्यादी. भक्ताचे इंद्रियांचे सगळे व्यापार भगवंताच्या प्रेमात वेडे झाल्यामुळे होत असतात. त्यालाच ‘परापूजा’ म्हणतात. तो स्तरच असा असतो की, त्या ठिकाणी अपराभक्तीची साधना म्हणजे यज्ञ विघ्न ठरते, कलंकरूप असते आणि भक्तीने वेडा झाल्यामुळे त्याला देहाचीही शुद्ध असत नाही. तो अंतःस्थ मार्गस्थ असतो.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

३ आ ३. ‘नामस्मरण ही भगवंताची खरी-खुरी विभूती होय. त्यामुळे ‘यज्ञानां जपयज्ञोऽस्मि’ असे भगवंताने सांगितले आहे; म्हणून नामयज्ञ हाच सर्वांत सूक्ष्म आणि व्यापक आहे आणि त्याला काहीच बंधन नसल्यामुळे तो सर्वात सूक्ष्म अन् व्यापक आहे. आकाशाचा गुण शब्द. आकाशाएवढे मन सूक्ष्म आणि व्यापक झाल्याविना नाम ग्रहण करू शकत नाही. तेव्हा उर्वरित यज्ञ करत करत मन सात्त्विक होऊन ते आकाशासारखे सूक्ष्म अन् व्यापक होते आणि मगच तो नामस्मरणयज्ञाचा अधिकारी होतो. त्याला इतर सहकारी साधनेही लागत नाहीत. नाम ईश्वराची विभूती असल्यामुळे इतर सर्व यज्ञांची पूर्तता नामाविना होत नाही; म्हणून ‘प्रमादात् कुर्वतां कर्म प्रच्यवेताध्वरेषु यत् । स्मरणादेव तद्विष्णोः संपूर्णं स्यादिति स्मृतिः ।।’ अशी प्रार्थना दिली आहे. तिचा अर्थ असा आहे – प्रमादामुळे संध्या चुकीच्या पद्धतीने झाली अथवा प्रवास इत्यादींमुळे संध्या करता आली नाही, तरी विष्णूच्या स्मरणाने (नामस्मरणाने) तिला पूर्णता येते.’

– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे.

३ इ. भजन आणि नामजप

सिनेमाची गाणी, भावगीते इत्यादींपेक्षा भजन म्हणणे उत्तम; कारण भजनात चैतन्य असते. भजनांतही संतांनी लिहिलेली भजने म्हणणे महत्त्वाचे असते; कारण त्यांत जास्त चैतन्य असते. असे असले, तरी त्यामध्येही अनेक शब्द आणि ध्वनी असतात. साधकाला साधना करून ‘अनेकातून एकात’ आणि ‘एकातून शून्यात’ जायचे असते. नामात अल्प शब्द आणि अल्प ध्वनी असल्याने ते जास्त चैतन्यमय आहे; म्हणून भजन म्हणण्यापेक्षा नामजप करणे योग्य होय. भजन या शब्दाची व्युत्पत्ती ‘भज + न’ अशी आहे. ‘भज’ म्हणजे भक्ती आणि ‘न’ म्हणजे सतत. ‘सतत भक्ती करणे’ हा त्याचा खरा अर्थ आहे.

३ ई. स्तोत्र आणि नामजप

भजनाप्रमाणे स्तोत्रातही अनेक शब्द असतात; म्हणून वरील सूत्रात दिल्याप्रमाणे स्तोत्रापेक्षा नामजपच अधिक श्रेष्ठ आहे. असे असले तरी स्तोत्र प्रभावकारी ठरण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

१. बहुतांशी स्तोत्रे ही ऋषीमुनींनी रचलेली आहेत. त्या स्तोत्रांमागे त्यांची संकल्पशक्ती आहे. स्तोत्र म्हणणार्‍याला त्या संकल्पशक्तीचा लाभ होतो.
२. ५० टक्क्यांहून अल्प आध्यात्मिक पातळीच्या साधकाला देवतेप्रती भाव वाढवण्यासाठी स्तोत्र उपयुक्त ठरते.
३. मन अस्वस्थ असेल तेव्हा देवतेच्या नामापेक्षा स्तोत्र म्हणणे सोपे जाते; कारण स्तोत्रातील जास्त शब्दांमुळे त्यावर मन थोडेतरी एकाग्र होऊ शकते.

या लेखाचा दुसरा भाग वाचण्यासाठी ‘नामजप आणि इतर योगमार्ग यांची तुलना (भाग २)’ यावर ‘क्लिक’ करा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘नामजपाचे महत्त्व आणि लाभ’

Leave a Comment