फलाहाराविषयी आयुर्वेदीय दृष्टीकोन

Article also available in :

आजकाल सर्वच आधुनिक वैद्य जेवणानंतर एखादे फळ खा ! असा आग्रह धरतात. परिपूर्ण आहार म्हणून फलाहार करावा, अशीही समजूत आहे. यामागे नेमके सत्य काय आहे ? तसेच फळे खाण्याविषयी आयुर्वेदीय दृष्टीकोन या लेखातून समजून घेऊ.

१. फळे पौष्टिक असली, तरी पचण्यास जड असणे

बहुतेक सर्व फळे रसदार असतात. ती आपल्या शरिरातील रस, रक्त इत्यादी सातही धातूंना पुष्ट करतात. जे अन्नपदार्थ आपल्या शरिराला पुष्ट बनवतात, ते पदार्थ सर्वसाधारणपणे पचायला जड असतात, उदा. उडीद डाळ. फळेही याच वर्गात येतात. जर फळ पचले नाही, तर होणारे अजीर्ण दूर करायला परत औषधे घ्यावी लागतात, उदा. फणस खायला खूप चांगला असला, तरी पचायला अत्यंत जड आहे. तो पौष्टिक असला, तरी पचला नाही, तर मोठ्या प्रमाणात पचनशक्ती मंद करतो. त्यामुळे आळस येणे, झोप येणे, निरुत्साह वाटणे, पोटात गच्चपणा किंवा वेदना जाणवणे, गुडगुड आवाज होणे, अस्वस्थपणा जाणवणे इत्यादी लक्षणे निर्माण होतात.

 

२. फळे शक्यतो सकाळीच खावीत !

सामान्यतः पपई, आवळा, डाळिंब, अननस यांसारखी पाचक फळे सोडून इतर फळे पचायला जड असतात; म्हणून फळे खातांना ती जेवतांनाच खावीत. जेवणानंतर पचायला जड असा पदार्थ खाल्ला की, मुख्य जेवणाच्या पचनावर परिणाम होतो आणि अजीर्ण होते. फळे शक्यतो सकाळीच अल्पाहारासह खावीत, म्हणजे दिवसभरात ती पचली जातात. फळे पचायला जड असल्याने ती कधीही रात्री खाऊ नयेत.

 

३. उपवासाच्या दिवशी एखादे फळ खाऊन रहाण्याचे लाभ

एखाद्या दिवशी नेहमीचे जेवण न घेता केवळ एखादे फळ खाऊन रहावे, म्हणजे शरिराला आवश्यक ते घटक मिळतात आणि पचनसंस्थेवर ताणही येत नाही. यासाठीच आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे उपवास सांगितले आहेत.

 

४. दुधासह फळे खाऊ नयेत !

फळे दुधासह कधीही खाऊ नयेत. कोणतेही फळ दुधात मिसळले की, दूध नासते. केळ्याची दुधात केलेली शिकरण वारंवार खाल्ली की, त्वचेचे विकार आणि पचनाच्या विकृती निर्माण होतात, परिणामी अ‍ॅलर्जी वाढते असे दिसून येते. दूध आणि फळे एकत्र खाणे यासारख्या आहाराला आयुर्वेदात विरुद्धान्न असे म्हटले आहे.

 

५. फळांचा रस न पिता फळे चावून खा !

फळांचा रस काढून पिणे चुकीचे आहे. ज्यांना दात किंवा कवळी नाही त्यांनीच फळांचा रस प्यावा. इतरांनी फळे शक्यतो चावून चावूनच खावीत आणि शक्य असतील तेव्हा ती सालीसकट खावीत. तोंडातील लाळ फळांच्या रसात मिसळली गेली पाहिजे. मुख्य म्हणजे, कोणत्या चवीचे फळ पोटात जात आहे, हे जीभ आणि लाळ यांच्यामुळे मेंदूला समजते आणि त्यानुसार पोटात गेल्यानंतर त्या फळाला पचवणारी यंत्रणा मेंदू आधीच कामाला लावून ठेवतो. यामुळे आवश्यक असलेले पाचक स्राव पोटात एकत्रित होतात. स्ट्रॉचा वापर करून जिभेला फसवून प्यायलेला रसही पचत नाही.

 

६. फळांवर कृत्रिम रसायने फवारल्याने होणारी आरोग्याची हानी

फळे खाण्यापूर्वी ती शुद्ध आहेत का ? हे पडताळावे. आज मिळणारी पेरू, फणस, करवंद यांसारखी फळे वगळता अन्य फळे कार्बाइड सारखी विषारी द्रव्ये वापरून कृत्रिमरित्या पिकवली जातात. सफरचंद, द्राक्षे, आंबा, कलिंगड, केळी इत्यादी नगदी फळांवर हे विषारी रसायन उघड्या डोळ्यांनाही दिसते. कितीही धुतले तरी हे रसायन जात नाही. उत्पादन जास्त येण्यासाठी झाडांवर फवारणी किंवा मुळांमध्ये रासायनिक खते या स्वरूपात युरिया, सल्फेट यांसारखी विषे वापरली जातात. हे सर्व विष आपल्याच पोटात जात असते, याचा विचार कोणीच करत नाही.

 

७. कर्करोगाला आमंत्रण देणारी फळांवरील हानीकारक रसायने

रासायनिक खते आणि फळे पिकवण्यासाठी वापरली जाणारी विषारी रसायने यांच्यामुळे कर्करोगाच्या (कॅन्सरच्या) रुग्णांची संख्या वाढत आहे. आज मोठ्या संस्थांमध्ये संशोधक पदावर काम करणारे तज्ञ आधुनिक वैद्यसुद्धा या मताला पुष्टी देतात. समाजात कर्करोगाचे अनेक रुग्ण असे आढळतात की, ज्यांनी कधीही विडी, सिगारेट, तंबाखू, दारू इत्यादींना स्पर्शही केलेला नसतो; मग त्यांना कर्करोग कोठून होतो ? अशा काही प्रश्‍नांची उत्तरे येथे मिळतात. केळीच्या घडावरील फणा एका मागोमाग
एक असा वर वर पिकत जातो. पेठेत (बाजारात) हातगाडीवर मिळणारी केळी एकादशी किंवा संकष्टी या तिथींना एकाएकी कशी काय पिकतात ? ती एका विशिष्ट रसायनांमध्ये बुडवून काढली जातात. ही रसायने अत्यंत विषारी असतात आणि तीच कर्करोगासारख्या अनेक रोगांचे कारण ठरतात.

 

८. रासायनिक खतांचा सर्वांत जास्त वापर असलेल्या
पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या
जास्त असल्याने शासनाला कॅन्सर स्पशेल या नावाने रेल्वेगाडी चालू करावी लागणे

भारतात सर्वांत जास्त रासायनिक खतांचा वापर पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यात होतो. याच भटिंडा जिल्ह्यात कर्करोगाचे रुग्णही सर्वांत अधिक आहेत. एवढे अधिक आहेत की, या जिल्ह्यातून राजस्थानमधील एका मोठ्या शासकीय कॅन्सर रुग्णालयात जाण्यासाठी आठवड्यातून २ वेळा कॅन्सर स्पेशल या खास नावाने एक रेल्वे गाडी प्रशासनाने सोडली आहे.

– वैद्य सुविनय दामले, कुडाळ

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment