परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज !

pp-baba

प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर ऑगस्ट १९८७ मध्ये त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार करण्यापासून ते आजपर्यंत स्थुलातून आणि सूक्ष्मातून कृपादृष्टी आहेच. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विविध प्रसंगांतून दिलेली शिकवण आणि त्यांची अध्यात्मात करवून घेतलेली प्रगती, हा प.पू. बाबांच्या कृपाशीर्वादाचाच परिणाम आहे. याविषयीची सविस्तर माहिती सनातन-निर्मित आदर्श शिष्य, गुरु आणि संत भक्तराज महाराज यांची शिकवण या ग्रंथमालिकांमध्ये दिली आहे.

प.पू. भक्तराज महाराज हेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याचे प्रेरणास्थान आहेत. प.पू. बाबांची संकल्पशक्ती आणि कृपाशीर्वाद यांमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य दिवसेंदिवस वाढत आहे. याविषयी शब्दांत काही व्यक्त करणे अशक्य आहे. तरीही प.पू. बाबांचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर असलेले प्रेम, तसेच त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला दिलेले आशीर्वाद लौकिकार्थाने कळावेत, यासाठी येथे देत आहोत.

pp_pp_baba

 

१. प.पू. भक्तराज महाराज यांनी
साधकांकडे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कौतुक करणे

एकदा प.पू. बाबा म्हणाले, डॉक्टर (प.पू. डॉ. आठवले) जे काय करत आहेत, ती सर्वांत मोठी सेवा ! तुम्ही पहाल, डॉक्टर माझे नाव, माझी भजने सर्व जगात पोहोचवतील. सर्व जगात माझे नाव होईल. – श्री. शशिकांत पंडित, नागपूर (२३.१२.२०१३)

 

२. प.पू. भक्तराज महाराजांनी परात्पर गुरु
डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक अधिकाराविषयी काढलेले गौरवोद्गार !

अ. वर्ष १९८९ मध्ये एकदा मी जेवायला इतरांच्या समवेत पंगतीत बसत असतांना प.पू. बाबा मला म्हणाले, तुम्ही तेथे बसू नका. निराळे बसा. तुम्ही त्यांच्यापेक्षा निराळे आहात !

आ. वर्ष १९९० मध्ये नरसोबाच्या वाडीला गुरुपौर्णिमेच्या आदल्या रात्री परंपरेनुसार प.पू. बाबांचे तेथील एका सभागृहात भजन होते. भजनाला आरंभ करण्यापूर्वी प.पू. बाबांनी आम्हाला पुढे येऊन बसायला सांगितले आणि माझी ओळख करून देतांना म्हणाले, मी पद्यात सांगितलंय, तेच हे गद्यात सांगतात !

इ. वर्ष १९९१ मध्ये माझ्या देखत बर्‍याच वेळा प.पू. बाबा इतरांना म्हणाले, तो तर जीवनमुक्त आहे.

ई. वर्ष १९९२ मध्ये स्थितप्रज्ञाच्या पातळीला राहू इच्छिणार्‍या मला बाबा म्हणाले, स्थितप्रज्ञ म्हणजे शेवट असे नाही. त्याच्या पुढे जायला हवे.

उ. नोव्हेंबर १९९२ मध्ये माझ्याविषयी मुंबईचे श्री. शिवाजी वटकर यांना चार-पाच वेळा बाबांनी सांगितले, Dr. Athavale remembers his real Self. (डॉ. आठवले यांना स्वस्वरूप आठवले.)

ऊ. वर्ष १९९४ मध्ये प.पू. बाबांनी एका शिष्येला सांगितले, केवळ दोघा जणांचा नामजप सतत चालू आहे. एक म्हणजे ज्योती (मूळ नाव इंगे, एक जर्मन साधिका) आणि दुसरा म्हणजे डॉक्टर (डॉ. जयंत आठवले) !

ए. वर्ष १९९५ मध्ये एक ज्योतिषी प.पू. बाबांकडे आले होते. त्यांनी बाबांच्या जन्मकुंडलीचा अभ्यास केला होता. त्यांना माझी ओळख करून देतांना बाबा म्हणाले, त्यांची आणि माझी पत्रिका एकच आहे !

एे. १५.५.१९९५ या दिवशी प.पू. बाबा मला म्हणाले, तुम्ही मेलेलेच आहात (अहंलय झाला आहे). कुठल्याही संतांकडे गेल्यास ते हेच सांगतील !

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

३. प.पू. भक्तराज महाराज यांनी परात्पर गुरु
डॉ. आठवले यांच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याचा आरंभ करणे

वर्ष १९९१ मध्ये नाशिक येथे वास्तव्य असतांना बाबांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितले की, अध्यात्माचे शिक्षण आणि प्रसार यांचे कार्य सनातन भारतीय संस्कृती संस्था या नावाखाली करा. अशा तर्‍हेने बाबांनीच सनातनचे नामकरण केले आणि त्यासह परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याचाही आरंभ केला.

ppdr-puja

 

४. प.पू. भक्तराज महाराज यांनी
अध्यात्मप्रसाराच्या कार्याला दिलेले आशीर्वाद !

अध्यात्मप्रसाराच्या संदर्भात प.पू. बाबांनी मला पुढे दिलेल्या वर्षी उत्तरोत्तर पुढचे पुढचे आशीर्वाद दिले.

१९९२ : अध्यात्माचा महाराष्ट्रभर प्रसार करा.
१९९३ : अध्यात्माचा भारतभर प्रसार करा.
१९९५ : अध्यात्माचा जगभर प्रसार करा.

४ अ. प.पू. भक्तराज महाराज यांनी परात्पर गुरु
डॉ. आठवले यांना अध्यात्मप्रसारासाठी स्वतःची अ‍ॅम्बॅसेडर गाडी देणे

१९९३ मध्ये माझी गाडी जुनी झाल्यामुळे आणि नवीन गाडी घ्यायला पैसे नसल्यामुळे प्रसारासाठी सर्वत्र जाणे मला कठीण आहे, असे प.पू. बाबांना सांगितल्यानंतर त्यांनी त्यांची अ‍ॅम्बॅसेडर गाडी मला दिली. या कार्यासाठी जणू आशीर्वाद म्हणून बाबांनी १९९३ मध्ये स्वतःच्या मोटारीचा झेंडा मला दिला आणि सांगितले, हा झेंडा लावून सर्वत्र अध्यात्मप्रसारासाठी फिरा ! सध्या ही गाडी देवद, पनवेल येथील सनातन आश्रमात आहे.

४ आ. प.पू. भक्तराज महाराज यांनी परात्पर गुरु
डॉ. आठवले यांना अध्यात्मप्रसारासाठी पैसे नसल्याने पैसेही देणे

गुरुप्राप्तीनंतर वेळोवेळी मी प.पू. भक्तराज महाराज यांना काहीतरी अर्पण करायचो. तरीही सर्व गुरूंचेच आहे, देणारा मी कोण ?, हा भाव निर्माण झाला नाही. पुढे गुरुकृपेने उपचारासाठी येणारे रुग्ण घटल्याने प.पू. बाबांना अर्पण करण्याची आमची क्षमता अल्प झाली. जानेवारी १९९३ मध्ये बाबांना दोन सहस्र रुपये अर्पण केले. बाबांनी ते परत केले आणि म्हणाले, अध्यात्मप्रसारासाठी आम्हीच तुम्हाला द्यायला हवेत. फेब्रुवारी १९९३ मध्ये महाशिवरात्रीसाठी बाबा मोरचोंडीला आले. त्या वेळी आम्ही त्यांना काहीच अर्पण करू शकलो नाही. उलट त्यांनीच वाहनामध्ये (मोटारीमध्ये) पेट्रोल भरून दिले आणि परततांना ५०० रुपये दिले. आम्ही बाबांना काही अर्पण करण्यापेक्षा त्यांनीच आम्हाला पैसे दिले, हे पाहून आम्हाला वाईट वाटले. तसे आम्ही बाबांचे परमशिष्य प.पू. रामजीदादांना (प.पू. रामानंद महाराज यांना) सांगितले. तेव्हा ते म्हणाले, गुरूंवर सर्व भार सोपवल्यावर त्यांनीच पैसे द्यायला हवेत. त्याच मासात प.पू. काणे महाराजांना थोडे पैसे अर्पण केले. त्यांनीही ते परत केले. सर्व संत आतून एक असतात, हे पुन्हा एकदा अनुभवावयास आले.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१९९३)

४ इ. प.पू. भक्तराज महाराज यांनी
परात्पर गुरु डॉ. आठवले यांना श्रीकृष्णार्जुन असलेला रथ देणे

९.२.१९९५ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृतमहोत्सवाच्या वेळी त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले, डॉ. पांडुरंग मराठे आणि मला बोलावून घेतले. श्रीकृष्ण-अर्जुनाचे महत्त्व आणि मोठेपणा सांगितला. त्या वेळी जवळजवळ पाऊण घंटा प.पू. बाबा बोलत होते. नंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हातात श्रीकृष्णार्जुन असलेला चांदीचा एक रथ दिला आणि म्हणाले, गोव्याला आपले कार्यालय होईल. तिकडे ठेवा. – श्री. प्रकाश वासुदेव जोशी, फोंडा, गोवा.

(प.पू. बाबांनी सांगितल्यानुसार सनातन संस्थेचे मुख्य कार्यालयही (आश्रमही) आता गोव्यातच आहे. तेथे प.पू. बाबांनी आशीर्वाद म्हणून दिलेला श्रीकृष्णार्जुनाचा चांदीचा रथ ठेवला आहे. – संकलक)

 

५. सनातन मी चालवीन ! – प.पू. भक्तराज
महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिलेली ग्वाही !

फेब्रुवारी १९९५ मध्ये प.पू. बाबांचा अमृतमहोत्सव झाला. तेव्हा ते एकदा ताडकन उठून बसून विशिष्ट आवाजात श्री. शरद मेहेर यांना म्हणाले, सनातन मी चालवीन !