कर्मयोगानुसार नामजपाचे लाभ

अनुक्रमणिका

१. सकाम-निष्काम नामजप आणि पाप-पुण्य
२. पापांचा नाश
३. अकर्म कर्म
४. प्रारब्धावर मात


 

कर्मे मनुष्याला संसाराच्या (मायेच्या) बंधनात अडकवतात; परंतु नामासहित कर्म केल्याने कर्मफलन्याय लागू न होता मनुष्य जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून सुटू शकतो. प्रस्तूत लेखात आपण सकाम नामजपापेक्षा निष्काम नामजप श्रेष्ठ कसा, पापक्षालनात वेदांहून नाम श्रेष्ठ कसे, नामाच्या पापदाहकत्वाचे वैशिष्ट्य काय, ‘अकर्म कर्मा’चे महत्त्व काय, नामाने प्रारब्धावर मात कशी होते इत्यादी सूत्रांचे सविस्तर विवेचन पहाणार आहोत.

 

१. सकाम-निष्काम नामजप आणि पाप-पुण्य

१ अ. सकाम भक्तीने नाम घेणे सत्कर्म असल्याने त्याने पुण्य मिळते.

१ आ. हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।। – संत ज्ञानेश्वर (हरिपाठ, अभंग पहिला)

१ इ. निष्काम भक्तीने नामजप करणे म्हणजे शुद्ध पुण्य आणि सकाम भक्तीने नामजप करणे म्हणजे अशुद्ध पुण्य होय.

१ ई. स्वर्गा पुण्यात्मकें पापें येइजे ।
पापात्मकें पापें नरका जाइजे ।
मग मातें जेणें पाविजे ।
तें शुद्ध पुण्य ।। – ज्ञानेश्वरी, अध्याय ९, ओवी ३१६

अर्थ : पुण्यात्मक पापाने स्वर्गप्राप्ती होते. पापात्मक पापाने व्यक्ती नरकाला जाते. शुद्ध पुण्याने म्हणजे निष्काम भक्तीने माझी (भगवंताची) प्राप्ती होते.

१ उ. नामजपामुळे पाप आणि पुण्य संपणे

जोपर्यंत पाप आणि पुण्य शिल्लक आहेत, तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. ‘ज्याला याच एका जन्मात भगवंताची प्राप्ती करून घ्यावयाची आहे, त्याने आपली इंद्रिये, मन आणि बुद्धी यांचे पूर्ण नियमन करून कोणतेही पाप होऊ न देता, नामाचे कोणतेही अपराध होऊ न देता, अविरत नामजप केला पाहिजे. त्यासह त्याला भगवंताच्या सगुण रूपाचे ध्यानही घडले पाहिजे. जोपर्यंत मनात किंचित जरी सकामभाव आहे, तोपर्यंत नामापराध होणारच; पण निष्ठेने तसाच नामजप चालू ठेवल्यास हळूहळू मनाचा निष्काम भाव होतो आणि नामावरच्या प्रेमामुळे भगवंताची प्राप्ती होते. त्यात गंमत अशी की, हे करत असतांना जसजसे भगवंताच्या दर्शनाच्या वियोगाचे दुःख होते, तसतसे पाप संपत जाते आणि दर्शनामुळे होणार्‍या अपार आनंदाने सर्व पुण्य संपते. तेव्हाच खराखुरा गोपीभाव प्राप्त होऊन तो भक्त होतो आणि दुसर्‍याचा उद्धार करतो.’

– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

१ ऊ. सकाम नामजपाने इच्छित कार्य होते किंवा त्या देवतेची कृपा होते; पण निष्काम नामजपाने नामधारक ईश्वराशीच एकरूप होतो.

 

२. पापांचा नाश

२ अ. ‘नामसंकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ।’, असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.

२ आ. अज्ञानादथवा ज्ञानादुत्तमश्लोकनाम यत् ।
सङ्कीर्तितमघं पुंसः दहेदेधो यथानलः ।। – श्रीमद्भागवत, स्कन्ध ६, अध्याय २, श्लोक १८

अर्थ : ज्याप्रमाणे जाणूनबुजून टाकलेला किंवा नकळत पडलेला अग्नी काष्ठे जाळून टाकतो, त्याप्रमाणे पवित्र कीर्ती असलेल्या परमेश्वराचे नाव समजून उच्चार किंवा त्याचा सहज उच्चार झाला, तरी ते नाव मनुष्याचे पातक नाहीसे करून टाकते.

२ इ. संसारमूलभूतानां पातकानां महामुने ।
शिवनामकुठारेण विनाशो जायते ध्रुवम् ।। – शिवपुराण, खण्ड १, अध्याय २३, श्लोक ३०

अर्थ : संसारास कारणीभूत होणार्‍या पातकांचा नाश शिवनामरूपी कुर्‍हाडीने नक्कीच होतो.

स्पष्टीकरण : आपण संसारात मग्न असतांना आपल्या हातून जी पापे घडतात, त्या पापांचा नाश करणारी ‘नाम’ ही कुर्‍हाड आहे.

२ ई. शिवनामतरीं प्राप्य संसाराब्धिं तरन्ति ये ।
संसारमूलपापानि तानि नश्यत्यसंशयम् ।।- शिवपुराण, खण्ड १, अध्याय २३, श्लोक २९

अर्थ : शिवनामरूपी नौकेने संसाररूपी सागर ते तरून जातात आणि त्यांची संसारास कारणीभूत होणारी पातके निश्चितच नष्ट होतात.

स्पष्टीकरण : ‘नाम’ ही संसाररूपी सागर तरून जाण्याची नाव आहे. ती मधले पापरूपी अडथळे ओलांडून जाते.

२ उ. अजाणता केलेल्या पापाचे क्षालन नामजपाने होऊ शकते; पण जाणूनबुजून केलेल्या पापांचे मात्र होत नाही. (मनुस्मृति, अध्याय ११, श्लोक ४६)

२ ऊ. पापक्षालनात वेदांहून नाम श्रेष्ठ

‘वेदांचा अभ्यास करणार्‍याला आचारांचे बंधन असते. वेदपठण करणारा जर आचारहीन असेल, तर वेद त्याला पावन करत नाहीत. या संदर्भात ‘आचारहीनं न पुनन्ति वेदाः । – वसिष्ठस्मृती, अध्याय ६, श्लोक ३’, म्हणजे ‘आचारहीन मनुष्याला वेद पावन करीत नाहीत’, असे एक वचन आहे; पण नामजप हा दुराचारी माणसांचाही उद्धार करू शकतो. केवळ वेदाधिकारी लोकांनाच नव्हे, तर वेदबाह्य लोकांनाही पावन करण्याचे सामर्थ्य नामात आहे.’

या सूत्रात ‘नामजप हा दुराचारी माणसांचाही उद्धार करू शकतो’, असे म्हटले आहे. याउलट पुढे सूत्र ‘सद्वर्तनासह नाम घेणे’ यात ‘पापाचरण करू नये’, असे म्हटले आहे; परंतु या दोन वाक्यांत विरोधाभास नाही. केलेले पाप नामजपाने नाहीसे होईल; पण सतत पापे करत राहिल्यास त्यांना नष्ट करण्याएवढा नामजप होणे कठीण होईल, तसेच नामाचा मुख्य उद्देश, म्हणजे आध्यात्मिक उन्नती, तीही होणार नाही.

२ ए. नामाच्या पापदाहकत्वाचे वैशिष्ट्य

‘परमेश्वराच्या नामात अनंत कोटी पापे जाळण्याचे सामर्थ्य आहे, एवढे ते अगाध प्रायश्चित्तरूप आहे. ‘नामाने जळणार नाही, असे पाप मनुष्य करूच शकत नाही’, अशी वचने आहेत. अर्थात नामजपाच्या प्रायश्चित्ताने प्रायश्चित्त घेण्यापूर्वीचे पाप नाहीसे होते. हरिनामही प्रायश्चित्त असल्यामुळे हरिनाम घेण्यापूर्वीची संपूर्ण संचित पापे जळतात. नाम घेऊन नंतर पुन्हा पाप केल्यास ते नाम घेईपर्यंत तसेच राहील आणि पाप केल्यानंतर नाम घेण्यात आलेच नाही, तर ते पाप भोगावे लागते. नामाचा पापदाहक महिमा एवढा थोर आहे की, एकदा जरी नाम घेतले गेले आणि त्या नामानंतर पाप करण्यात आलेच नाही, म्हणजे अगदी मरतेवेळी नाम घेतले गेले, तरी तो मनुष्य तेवढ्या एका वेळेच्या नामस्मरणानेदेखील भगवंताचे ध्यान होऊन वैकुंठाला जातो. अजामिळ नामक ब्राह्मणाने मरतेवेळी ‘नारायण’ या नावाचा उच्चार केला; पण त्याला आठवण त्याच्या पुत्राची होती, परमेश्वराचे नव्हती, तरीही तेवढ्याच एका नामाने भगवंताचे ध्यान नसतांनाही त्याच्या कृतपापांचा नाश होऊन तो यमपाशातून सुटला. भाव असो वा नसो, कसेही नाम घेतले तरी नामाने पाप नाहीसे होते.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जि. पुणे, महाराष्ट्र. (श्रीमद्भागवतातील अजामिळाच्या आख्यानावरून, स्कंध ६, अध्याय १ ते ३)

२ ऐ. पापक्षालनात प्रायश्चित्तापेक्षा नाम श्रेष्ठ

‘प्रायश्चित्त घेतल्यामुळे केवळ पापनाश होतो; पण पाप करण्याची वासना नष्ट होत नाही. मुमुक्षुत्व प्राप्त झाल्यावर नामाने वासनानाश आणि पापनाश अशी दोन्ही कार्ये होतात.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

 

३. अकर्म कर्म

१. कोणत्याही व्यवहारात अगदी काटेकोरपणे विचार केला आणि देवाण-घेवाण राहू नये म्हणून कितीही प्रयत्न केला, तरी अगदी योग्य अशी देवाण-घेवाण होणे अशक्यप्राय आहे, म्हणजेच देवाण-घेवाण थोड्याफार प्रमाणात रहातोच. देवाण-घेवाण थोडा जरी राहिला तरी तो पूर्ण करण्यासाठी जन्म घ्यावा लागतो. हे टाळण्यासाठी अकर्म कर्म होणेच आवश्यक असते. असे अकर्म कर्म होण्यासाठी कोणतेही कर्म करत असतांना नामजप करणे आवश्यक असते.

२. अध्यात्मात ‘कर्मफलन्याय’ महत्त्वाचा आहे. यानुसार प्रत्येक चांगल्या-वाईट कर्माचे फळ हे भोगावेच लागते. जन्माच्या वेळेस एखाद्या व्यक्तीचे १०० एकक (युनिट) संचितकर्म आहे असे धरले, तर सर्वसाधारणपणे एका जन्मात ६ एकक भोगून न्यून होतात. म्हणजे १६ ते १७ जन्मांत माणसाला मुक्ती मिळाली पाहिजे; पण तसे होत नाही; कारण ६ एकक प्रारब्धभोग भोगून संपवित असतांना, क्रियमाणकर्मामुळे संचितात १० एककांची भर पडत असते; म्हणून पहिल्या मृत्यूच्या वेळी ९४ च्या ठिकाणी (ऐवजी) १०४ एकक संचित होते. यामुळे व्यक्ती जन्ममृत्यूच्या फेर्‍यात अधिकाधिक अडकत जाते. याउलट कोणतेही कर्म करत असतांना नामजप केला असता ते कर्म अकर्म कर्म होते; म्हणजेच त्या कर्माला फळ नसते. त्यामुळे पाप-पुण्य लागत नाही आणि म्हणून त्या कर्मामुळे संचित निर्माण होत नाही.नवीन संचित निर्माण न झाल्यामुळे, आपले प्रारब्धभोग संपवून, व्यक्तीची जन्ममृत्यूच्या फेर्‍यातून लवकरच सुटका होते.

 

४. प्रारब्धावर मात

४ अ. नाम तिन्हीत्रिकाळ आपल्या जवळ असेल, तर प्रारब्ध सुसह्य होते, त्याची आंच न्यून होते.

४ आ. नामजपाने प्रारब्ध जळते.

४ इ. नवीन प्रारब्ध निर्माण न होणे

‘घडेल ते कर्म, भोगीन ते प्रारब्ध आणि दिसेल ते कर्तव्य’, या त्रिसूत्रीत नामस्मरण असेल, तर प्रारब्धभोग चुकत नसले, तरी कर्म अन् कर्तव्य यांचे निर्हेतूक पालन होते आणि अशा कर्मामुळे प्रारब्ध निर्माण होत नाही; कारण ते नामाला अर्पण होते. क्रिया आणि कर्म केवळ यांत्रिकपणे होतात; म्हणून त्यांचे प्रारब्ध होत नाही. अर्थात आपले मन आणि चित्त नामाकडेच असायला हवे, ही गोष्ट अभिप्रेतच आहे. ‘हाती काम आणि मुखी राम’, असे हवे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘नामजपाचे महत्त्व आणि लाभ’

Leave a Comment