साधनेच्या संदर्भात नामजपाचे लाभ

अनुक्रमणिका

१. साधनेच्या संदर्भात
१ अ. स्मरण आणि ध्यान घडणे
१ आ. वृत्ती अंतर्मुख होणे
२. चित्तशुद्धी होणे
२ अ. नामाने निर्माण झालेले तेज चित्तावरील संस्कारांचा नाश करते
२ आ. नामजपाची आवड निर्माण होणे आणि चित्तशुद्धी होणे
२ इ. जुने संस्कार न्यून होणे
२ ई. नवीन संस्कार न होणे
२ उ. नामजपाने वासनाक्षय होण्याची प्रक्रिया
३. वाणीशुद्धी


‘नामजपाने असाध्य असे काहीच नाही’, हे आतापर्यंत आपण जाणलेच असेल. या लेखात आपण ध्यानधारणेसाठी नाम कसे उपयुक्त आहे, नामजपामुळे होणार्‍या चित्तशुद्धीची प्रक्रिया इत्यादी सूत्रे पहाणार आहोत. हा लेख वाचून आपणही नामजपाला आरंभ करावा, हीच गुरुचरणी प्रार्थना.

 

१. साधनेच्या संदर्भात

१ अ. स्मरण आणि ध्यान घडणे

स्मरण आणि ध्यान या गोष्टी नामजपाने घडू शकतात. श्री शंकराचार्य याविषयी आपल्या ‘विष्णुसहस्त्रनामभाष्य’ या ग्रंथात लिहितात –

मनसा वाग्रे सङ्कल्पयत्यथ वाचा व्याहरति ।

यद्धि मनसा ध्यायति तद्वाचा वदति ।

इति श्रुतिभ्यां स्मरणं ध्यानं च नामसङ्कीर्तनेऽन्तर्भूतम् ।

अर्थ : (मनुष्य) मनाने प्रथम संकल्प करतो आणि मग वाणीने तो उच्चारतो. जे मनाने ध्यानात आणतो ते वाणीने बोलतो. या दोन श्रुतीवचनांवरून स्मरण आणि ध्यान या गोष्टी नामसंकीर्तनात अंतर्भूत आहेत.
स्पष्टीकरण : मनात देवाची आठवण असते, म्हणजे देव ध्यानात असतो; म्हणूनच आपण नामजप करतो. तसेच नामजप करतांना देवाचे स्मरण विनासायास घडते.

१ आ. वृत्ती अंतर्मुख होणे

बहिर्मुख वृत्ती हळूहळू अंतर्मुख होऊ लागणे, हे साधनेतील प्रगतीचे लक्षण आहे. नामामुळे बाह्य गोष्टींची ओढ अल्प झाल्याने साहजिकच वृत्ती अंतर्मुख होण्यास साहाय्य होते.

 

२. चित्तशुद्धी होणे

२ अ. नामाने निर्माण झालेले तेज चित्तावरील संस्कारांचा नाश करते

‘सूर्य विष्ठेचा नाश करतो आणि त्यातील वासाचाही नाश करतो. नामाने निर्माण झालेले तेज अंतर्घाणीचा (चित्तावरील संस्कारांचा) नाश करते.’ – प.पू. भक्तराज महाराज

२ आ. नामजपाची आवड निर्माण होणे आणि चित्तशुद्धी होणे

ईश्वराचा नामजप आणि प्रपंचातील गोष्टींचा ‘नामजप’ यांत मानसशास्त्राच्या दृष्टीने बरेच साम्य आहे. एखाद्या मातेने आपल्या मुलाचे नाव उच्चारताच किंवा ऐकताच त्या पुत्राविषयी प्रेम, वात्सल्य, आनंद, चिंता, आकांक्षा अशा अनेक भावना तिच्या अंतःकरणात जागृत होतात. याचे कारण असे की, नामी जो पुत्र, त्याच्याविषयीच्या तिच्या सर्व भावना नामाला चिकटलेल्या असतात आणि श्रवण किंवा स्मरण होताच त्या जागृत होतात. पुत्राचे स्मरण प्रयत्नाने करावे लागत नाही. ते सदासर्वकाळ आपोआप होत असते. ते स्मरण ही तिच्या जीवनातली एक प्रभावी शक्ती बनते. एखादी माता पुत्रासाठी सर्वस्वाचा त्याग करायला सिद्ध होते, ती या प्रभावी शक्तीमुळेच होय.

ईश्वराच्या नामजपातली मानसिक प्रक्रियाही हीच आहे. नामजप करणार्‍या व्यक्तीत कळत-नकळत ईश्वराविषयी काही भावना किंवा कल्पना असतात. त्याच्या गुणांचेही थोडेफार ज्ञान असते. ‘ईश्वराच्या कृपेने आपले कल्याण होते आणि नामजप हे त्याची कृपा संपादन करण्याचे साधन होय’, याविषयी त्या व्यक्तीला श्रुतीज्ञान झालेले असते. त्यामुळे ‘एवंगुणविशिष्ट ईश्वराचे नाम आपण स्मरत आहोत’, असा भाव त्या नामाशी निगडित होतो. या भावामुळेच ईश्वराविषयीच्या आदर, प्रेम, भक्ती, दुष्कृत्यांची भीती इत्यादी भावना वाढत जातात. त्यामुळे तद्विरुद्ध असणार्‍या भावना हळूहळू मंद होऊ लागतात. त्यामुळे त्या व्यक्तीच्या चित्ताची हळूहळू शुद्धी होते.’

२ इ. जुने संस्कार न्यून होणे

जप चालू असतांना चित्तातील वासना केंद्र , आवड-नावड केंद्र , स्वभाव केंद्र वगैरे केंद्रे तसेच बुद्धीकेंद्रातील संस्कारांकडून येणार्‍या संवेदना (बाह्य)मन स्वीकारत नाही. असे सातत्याने बराच काळ झाले की, या केंद्रांमधील संस्कार न्यून होऊ लागतात.

२ ई. नवीन संस्कार न होणे

जप चालू असतांना तेवढा वेळ तरी चित्तावर इतर गोष्टींचे नवीन संस्कार होत नाहीत. चित्तावर नवीन संस्कार होऊ नयेत, यासाठी जागृतावस्थेतील सर्वोत्तम मार्ग म्हणजे नामजप होय. (धारणा, ध्यान आणि समाधी या अवस्थांतही चित्तावर इतर गोष्टींचे संस्कार होत नाहीत.)

२ उ. नामजपाने वासनाक्षय होण्याची प्रक्रिया

‘जेथे देहबुद्धी असते तेथेच वासना उत्पन्न होते. ‘देह मीच आहे’, या भावनेने वागणार्‍या माणसाचे मन सारखे इंद्रियांतून बाहेर धावत असते. त्याच्या मनाची तृप्ती कधीच होत नाही. नाम घेऊ लागल्यावर मात्र मन हळूहळू बाहेर धावण्याचे न्यून होते. बाहेरची धाव न्यून झाली की, वासनेची शक्ती आपोआप न्यून होते. पुढे तेच मन नामामध्ये रंगू लागते. जे मन वासना भोगायचे, तेच मन दुसरीकडे रंगू लागल्यावर मनातील वासना आपोआप क्षीण होतात आणि काही दिवसांनी त्या मरून जातात. वासना सूक्ष्म आहे; म्हणून तिचा काटा काढण्यास सूक्ष्म अस्त्रच पाहिजे. ते अस्त्र म्हणजे ‘नाम’ होय.’

 

३. वाणीशुद्धी

‘व्यावहारिक बोलण्यामुळे वाणी चित्तशुद्धीपासून निवृत्त होते, म्हणजे अशुद्ध होते. ती शुद्ध व्हावी म्हणून नामजप करावा.’

– प.पू. भक्तराज महाराज

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘नामजपाचे महत्त्व आणि लाभ’

Leave a Comment