नामजपाचे लाभ (सर्वसाधारण, शरीरशास्त्र आणि मानसशास्त्रदृष्ट्या)

अनुक्रमणिका

१. सर्वसाधारण लाभ

१ अ. मद्याचे दुष्परिणाम आणि नामाचे सुपरिणाम

२. शरीरशास्त्रदृष्ट्या लाभ

२ अ. व्याधीचे स्वरूप प्रकट होण्यापूर्वीच त्याची लक्षणे नामजपामुळे समजू लागणे

२ आ. मनःशांतीमुळे होणारे शारीरिक लाभ

२ इ. काही विकारांवर नामजप उपयुक्त

२ उ. नामजप हाच सर्व रोगांवरील उपचार !

२ ऊ. वासना आणि दुःख संपण्यासाठी नामजप करा !

३. मानसशास्त्रदृष्ट्या लाभ

३ अ. मनोविकारांवरील उपचार

३ आ. अंतर्मुखता आणि अंतर्निरीक्षण

३ इ. मनाची एकाग्रता वाढणे

३ ई. मौनाप्रमाणे होणारे लाभ


 

ईश्वराचे नाम हा साधनेचा पाया आहे. या लेखात आपण नामाचे सर्वसाधारण, शरीरशास्त्र आणि मानसशास्त्रदृष्ट्या काय लाभ आहेत हे पहाणार आहोत. यांत नामाने जीवन कसे सुधारू शकते; तसेच मनाची एकाग्रता साध्य करण्यात आणि मनोविकारांवरील उपचार म्हणून नाम कसे उपयुक्त ठरते इत्यादी सूत्रेही पहाणार आहोत.

 

१. सर्वसाधारण लाभ

१ अ. मद्याचे दुष्परिणाम आणि नामाचे सुपरिणाम

सध्या अनेकजण दुःख विसरण्यासाठी मद्यप्राशन करतात. मात्र मद्यप्राशन हे दुःख विसरण्याचे साधन नव्हे. दुःख परिहारासाठी नामजप करणे उपयुक्त आहे, हे पुढील तुलनेवरून स्पष्ट होईल.

१. ‘मद्य संकटाला आमंत्रण देते, तर नाम संकटाचे निरसन करते.
२. मद्याने रोग निर्माण होतात, तर नामाने रोग बरे होतात. नाम भवरोग बरे करते.
३. मद्याने दीनता येते, तर नामाने लीनता येते.
४. मद्याने दुःख, तर नामाने चिरंतन सुख (आनंद) प्राप्त होते.
५. मद्याने अधोगती, तर नामाने ऊर्ध्वगती प्राप्त होते.
६. मद्य माणसाला माणसातून उठवते, तर नामाने माणूस देवरूप होतो.

१ आ. नामजपाचे पुण्य दुसर्‍याला अर्पिल्यावर त्याचे कार्य होणे

एकाने आपल्या मित्राचे महत्त्वाचे कार्य सिद्ध होण्यासाठी आपला एक कोटी नामजप त्याच्या हातावर पाणी सोडून अर्पण केला. त्यामुळे त्याचे कार्य झाले.’

 

२. शरीरशास्त्रदृष्ट्या लाभ

२ अ. व्याधीचे स्वरूप प्रकट होण्यापूर्वीच त्याची लक्षणे नामजपामुळे समजू लागणे

शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक त्रास ३० टक्के निर्माण झाल्यावरच त्याची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे दिसू लागतात. याउलट नामजपामुळे व्याधीचे स्वरूप प्रकट होण्यापूर्वीच त्याची लक्षणे समजू शकतात, म्हणजे नामजप करतांना पुढे त्रास होणार असल्यास किंवा सध्या अप्रकट स्वरूपात त्रास असल्यास शारीरिक अथवा मानसिक स्तरांवर वेगवेगळ्या प्रकारचे त्रास चालू होतात. याचे कारण असे की, व्याधीग्रस्त अवयवांवर नामजपामुळे चांगल्या शक्तीचे किरणोत्सर्जन (रेडिएशन) दिल्याप्रमाणे होते. ३० टक्के त्रास असल्याविना आधुनिक वैद्यांना (डॉक्टरांना) त्याचे निदान होत नाही, उदा. ३० टक्के मनोविकार झाल्यानंतर डॉक्टरांना कळते. याउलट १० ते ३० टक्क्यांपर्यंत त्रास असल्यास, उदा. मनोविकार झाला असल्यास नामजपामुळे लक्षात येते.

२ आ. मनःशांतीमुळे होणारे शारीरिक लाभ

नामजपाने मन शांत राहिले की, मानसिक ताणामुळे होणारे शारीरिक (सायकोसोमॅटिक) विकार होत नाहीत आणि शरीरस्वास्थ्य चांगले रहाते.

२ इ. काही विकारांवर नामजप उपयुक्त

पुढे शरिराचे काही विकार आणि त्यांच्यावर उपाय म्हणून कोणता नामजप उपयुक्त ठरू शकतो, हे दिले आहे.

१. शरिरात द्रव्य साठल्यामुळे मूत्राशयाचा विकार, खोकला किंवा शरिराला सूज आली असेल, तर सूर्यदेवाचा जप करू शकतो. या जपामुळे मनामध्ये जी उष्णता निर्माण होते, ती त्या अवयवाकडे वळवली जाते आणि साठलेले द्रव्य ती सुकवून टाकते.

२. एखाद्याच्या शरिरात जळजळ किंवा अतीक्रोधायमान किंवा तणावग्रस्त मनःस्थिती असल्यास शीतलता प्रदान करणारा ‘श्री चंद्राय नमः ।’ हा चंद्रदेवाचा जप करू शकतो.

३. रक्तस्त्रावाचा विकार असल्यास ‘श्री मंगलाय नमः ।’ हा मंगळदेवाचा किंवा चंद्रदेवाचा जप उपयुक्त ठरू शकतो.

४. संधीवातासाठी गायत्रीमंत्राचा जप करणे उपयुक्त होऊ शकते. एखादा रुग्ण जर जप करण्यास असमर्थ असेल, तर त्याचे नातेवाईक, उपाध्याय किंवा पुरोहित तो जप करू शकतात.

२ ई. नामजपाचे पुण्य अर्पण केल्यावर मरणोन्मुख रुग्ण बरा होणे

‘एका श्रीमंत माणसाची पत्नी अत्यवस्थ होती. तज्ञ आधुनिक वैद्यांनी (डॉक्टरांनी) तिला बरे करण्याची शिकस्त केली. तिला महाग औषधे दिली, रक्त दिले, सलाईन दिले, प्राणवायूवर (ऑक्सिजनवर) ठेवले, तरी तिच्यात थोडीही सुधारणा झाली नाही. आधुनिक वैद्यांनी तिच्या जीविताची आशा सोडली. तेव्हा तो श्रीमंत माणूस आपल्या एका धार्मिक मित्राकडे गेला आणि आधुनिक वैद्यांनी केलेल्या सर्व उपायांचे त्याला निवेदन केले. आता उपाय संपले; म्हणून तो निराश झाला होता. तेव्हा तो धार्मिक मित्र त्याला म्हणाला, `‘असा निराश होऊ नकोस.’’ नंतर त्या मित्राने आपल्या एक कोटी नामजपाचे पुण्य त्या श्रीमंत माणसाच्या हातावर पाणी सोडून त्याला अर्पण केले. एका आठवड्यातच आधुनिक वैद्यांना त्या श्रीमंत माणसाच्या पत्नीच्या प्रकृतीत विलक्षण परिवर्तन दिसून आले आणि नंतर ती लवकर बरी झाली. या गोष्टीने आधुनिक वैद्य आश्चर्यचकित झाले. दाम आणि आधुनिक वैद्यांचे ज्ञान करू शकले नाही, ते नामदान करू शकले.’

२ उ. नामजप हाच सर्व रोगांवरील उपचार !

एका व्यक्तीने प.पू. काणे महाराजांना विचारले, ‘मला पुष्कळ शारीरिक त्रास होतात, तर मी काय करू ?’ त्यावर प.पू. महाराज म्हणाले, ‘नामस्मरणच सर्व रोगांवर उपचार आहे. नामस्मरण पुष्कळ वाढवा आणि नामस्मरणातच मरा !’

२ ऊ. वासना आणि दुःख संपण्यासाठी नामजप करा !

‘वासनासुख म्हणजे पाप. जोपर्यंत सुखाची इच्छा आहे, तोपर्यंत दुःख आहे. आपण आनंदरूप आहोत; म्हणून वासना (सुखाची इच्छा) संपते, तेथे दुःख संपते आणि आनंद मिळतो. हे होण्यासाठी नामस्मरण करावे.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे.

 

३. मानसशास्त्रदृष्ट्या लाभ

व्यक्तीचे स्थूलदेह आणि लिंगदेह असे दोन देह असतात. स्थूलदेह म्हणजे आपण नेहमी म्हणतो ते शरीर. लिंगदेह हा पंचसूक्ष्मज्ञानेंद्रिये, पंचसूक्ष्मकर्मेंद्रिये, पंचप्राण, मन (बाह्यमन), चित्त (अंतर्मन), बुद्धी आणि अहं (जीव) अशा एकोणीस घटकांचा बनलेला असतो. पंचप्राण या सर्वांच्या कार्याला शक्ती पुरवितात. चित्तात (अंतर्मनात) देवाण-घेवाण, वासना, आवड-नावड, स्वभाव इत्यादी केंद्रे असतात.

३ अ. मनोविकारांवरील उपचार

बहुतेक मनोविकारांत नामजपाने लाभ होतो. ‘निरर्थक विचारध्यास (ऑब्सेशन्)’ या मनोविकारावर तर नामजप हा रामबाण उपाय आहे.

३ आ. अंतर्मुखता आणि अंतर्निरीक्षण

अंतरात सद्गुणांची वृद्धी होण्यासाठी अंतर्मुखता आणि अंतर्निरीक्षण या दोन गोष्टी आवश्यक आहेत. नामजपाच्या प्रक्रियेत त्या दोन्ही वाढीस लागतात. अंतर्मुख झाल्यावाचून खरा नामजप होऊच शकत नाही.
आपले मन नाम घेत आहे कि नाही, हे पहायचे म्हणजे अंतर्मुख झालेच पाहिजे. मन नामावर फार वेळ रहात नाही, ते दुसर्‍या कल्पना करू लागते, हे समजून येताच त्याला नामावर परत आणावे लागते. हे परत आणण्याचे काम करतांना ते कोणत्या विचारविकाराकडे धावले होते, ते समजते. यालाच ‘अंतर्निरीक्षण’ म्हणतात.

३ इ. मनाची एकाग्रता वाढणे

नामजपामुळे चित्तावर ‘नामाचा’ संस्कार होत असल्याने चित्तातील विविध केंद्रांमधील संस्कार न्यून व्हायला साहाय्य होते. चित्तातील केंद्रांमधील संस्कार जेवढे अल्प, तेवढ्या चित्ताकडून मनाकडे येणार्‍या संवेदना अल्प होतात आणि त्यामुळे मनाची एकाग्रता वाढते. सनातन संस्थेद्वारे घेण्यात येणार्‍या बालसंस्कारवर्गातील एका बालसाधिकेला नामजपामुळे एकाग्रता कशी अनुभवता आली, ते पुढे दिले आहे. या उदाहरणावरून या सूत्राचे महत्त्व लक्षात येते.

नामजपामुळे मनाची एकाग्रता वाढून अभ्यास चांगला होणे

‘बालसंस्कारवर्गातील साधकांनी मला नामजप कसा करावा, कोणाचा करावा, त्यामुळे आपणास काय लाभ होतात इत्यादी शिकवले. मी घरी आले आणि नामजप केला. त्यानंतर मी अभ्यासाला बसले. त्याच वेळी माझ्या काकांनी दूरदर्शन संच लावला; पण माझे लक्ष एकदासुद्धा दूरदर्शन संचाकडे गेले नाही. माझे मन अभ्यासातच एकाग्र झाले होते.’

– कु. श्वेता दिलीप पारठे, बालसंस्कारवर्ग, वडाळा, मुंबई.

३ ई. मौनाप्रमाणे होणारे लाभ

नामजप करणे हे एकप्रकारचे मौनच आहे. त्यामुळे मौनाचे पुढील मानसशास्त्रीय लाभ नामजपानेही होतात.

१. प्रापंचिक प्रश्न न्यून होणे : बरेच प्रापंचिक प्रश्न बोलण्याने निर्माण होतात.

२. खोटे बोलणे टाळता येते.

३. षड्रिपूंवर नियंत्रण (ताबा) : रागादी भावना व्यक्त न केल्याने हळूहळू त्यांच्यावर नियंत्रण येते. इ

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘नामजपाचे महत्त्व आणि लाभ’

Leave a Comment