साधनेतील प्रयत्नांमधून श्रीकृष्णाने साधिकेला दिलेल्या अनुभूती दर्शवणारी कृष्णमय चित्रे (भाग ६)

१५. ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठल्यानिमित्त पू. सत्यवानदादा
(सनातनचे पाचवे संत पू. सत्यवान कदम) यांच्या हस्ते झालेल्या सत्काराचे चित्र

balak_bhav_1_C23_b

‘३.९.२०१२ या दिवशी माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा क्षण, म्हणजेच ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठल्याच्या निमित्ताने सनातनचे संत पू. सत्यवानदादा यांच्या हस्ते माझा सत्कार झाला. ‘त्या वेळी एका अभिमानी पित्याप्रमाणे श्रीकृष्ण माझ्या मागे उभा आहे’, अशा अर्थाचे हे चित्र आहे. प.पू. डॉक्टर आणि साधक यांचा आनंद पाहून मलाही आनंद जाणवत होता.’ – सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (४.९.२०१२, पहाटे ४)

१५ अ. श्रीकृष्ण आणि पू. सत्यवानदादा यांसह काढलेल्या
सत्काराच्या प्रसंगाचे चित्र अपूर्ण वाटून साधनेतील प्रवासात
साहाय्य केलेल्या चेन्नईतील साधकांविना ते पूर्ण होणार नसल्याने त्यांचेही चित्र काढणे

‘माझ्या सत्काराच्या प्रसंगाचे चित्र काढतांना पूर्वी माझ्यासमवेत केवळ श्रीकृष्ण आणि पू. सत्यवानदादा एवढेच काढले होते; परंतु माझ्या साधनेतील आतापर्यंतच्या प्रवासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार्‍या चेन्नई येथील साधकांविना हे चित्र पूर्ण होणार नसल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे दुसर्‍या दिवशी आगगाडीने रामनाथी (गोवा) येथे जातांना चेन्नई येथील सक्रीय साधक श्री. काशीनाथ शेट्टी, सौ. रूपा शेट्टी, श्री. प्रभाकरन्मामा, सौ. सुगंधी, सौ. कोमला, श्री. प्रेमनाथ आणि सौ. रागिणी यांचीही चित्रे काढली’ – सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई

१५ आ. चित्राचे वैशिष्ट्य – श्रीकृष्णाच्या मुकुटातून
लोंबणार्‍या कुंडलातून साधिकेची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचा
सर्वाधिक आनंद श्रीकृष्णतत्त्वाला झाला असल्याचे साधिकेने स्पष्ट करून दाखवणे

‘साधिकेची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्यानंतर पू. सत्यवानदादा यांच्याकडून भेटवस्तू स्वीकारतांना बालकभावातील साधिकेच्या पाठीमागे पित्यासमान उभा असणारा श्रीकृष्ण दाखवला आहे आणि केवळ याच छायाचित्रात श्रीकृष्णाच्या मुकुटातून लोंबणारे कुंडल दाखवले आहे. यातून या प्रसंगी श्रीकृष्णतत्त्वाला झालेला सर्वाधिक आनंदच साधिकेने व्यक्त करून दाखवला आहे. अन्य कुठल्याही चित्रात मुकुटातून कानशीलाकडे रुळणारा अलंकार दाखवलेला नाही; कारण आनंद झाल्यावरच सर्वोच्च आनंदाचे दर्शक म्हणून मुकुटात शिरपेच खोवला जातो, याचेच ते प्रतीक असल्याचे जाणवले.’ – सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.९.२०१२)

१६. सौ. उमा रविचंद्रन् यांनी साधनेला आरंभ करण्यापूर्वी
आणि साधनेला आरंभ केल्यानंतर त्यांच्या स्थिती दर्शवणारे चित्र

balak_bhav_1_C24_b

१६ अ. चित्राचे विवरण

‘२०.१.२०१३ या दिवशी साधनेविषयी बोलतांना ‘भाववृद्धी आणि स्वभावदोष अल्प करणे यांसाठी कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे ?’, असा प्रश्न आम्हाला (मी आणि चेन्नई येथील अन्य दोन साधिका सौ. कोमला अन् सौ. विनुता) पडला होता. त्या वेळी भगवान श्रीकृष्णाने मला ९ प्रकारचे भाव दर्शवून टप्प्यांची जाणीव करून दिली.

१६ अ १. साधनेला आरंभ करण्यापूर्वी

अ. ‘माझेच योग्य आहे’, असे वाटणे : साधनेत येण्यापूर्वी ‘माझेच योग्य आहे’, असे वाटत असल्याने राग आणि प्रतिक्रिया येतात. ‘स्वतःतील तीव्र अहंभावामुळे आपण तसा विचार करत आहोत’, हे कधी लक्षातच येत नाही.

१६ अ २. साधनेला आरंभ केल्यानंतर

अ. दोष आणि अहं यांची जाणीव होणे : साधनेला आरंभ केल्यानंतर ‘राग’ हा आपले स्वभावदोष आणि अहं यांचे प्रकटीकरण असल्याचे लक्षात येते. राग आल्यावर त्यावर नियंत्रण मिळवू शकत नसलो, तरी ‘मला राग येत आहे’ आणि ‘राग येणे’ हा दोष माझ्यात आहे’, याची जाणीव होते. त्या क्षणी ‘माझेच योग्य आहे’, या भ्रमाला धक्का बसतो.

आ. अंतर्मुखतेला आरंभ होणे : रागाची जाणीव झाली की, अंतर्मुखतेला आरंभ होतो. रागाचे मूळ कारण काय, तो दोष किती खोलवर रुजला आहे आणि त्यावर मात करण्यासाठी कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे, याविषयी चिंतन होऊ लागते.

इ. शिकण्याची उत्सुकता वाढणे : स्वतःत अंतर्मुखता आल्यानंतर प्रसंग, परिस्थिती, व्यक्ती आणि निर्जीव वस्तू यांच्याकडून शिकण्याची उत्सुकता वाढते. प्रत्येक प्रसंग, मग तो कितीही कठीण असला, तरी ‘ईश्वराने मला शिकण्यासाठी निर्माण केला आहे’, असे वाटू लागते. राग न येता, हळूहळू शिकण्याची वृत्ती वाढते.

ई. चुकांविषयी खंत वाटणे आणि चुका दाखवणार्‍यांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णच कार्य करत असल्याची जाणीव होणे : दोषांच्या मुळाशी जाता आले की, आतापर्यंत केलेल्या चुकांविषयी खंत वाटू लागते. ‘तीव्र अहंभाव आणि दोष यांमुळे त्याच त्याच चुका वारंवार केल्या, तरी भगवान श्रीकृष्ण माझा हात कधीच सोडत नाही. तो ‘परम दयासागर’, ‘अपार करुणासिंधू’ आणि ‘दयाघन’ आहे. नवीन परिस्थिती निर्माण करून, कठीण परिस्थितीला सामोरे जायला लावून आणि त्यामधून अलगद बाहेर काढून तो मला न कंटाळता पुनःपुन्हा शिकवतो. रागावणारे, भांडणारे आणि चुका दाखवून देणारे या सर्वांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णच कार्य करतो’, याची जाणीव होऊ लागते. तोच परीक्षा घेतो आणि त्यात मी उत्तीर्ण होत आहे कि नाही, हे शांतपणे पहातो.

उ. क्षमायाचना केल्याने अहंभाव उणावण्यास आरंभ होणे : या टप्प्याला अहंभाव उणावण्यास आरंभ होतो. चुकांविषयी खंत वाटल्यामुळे पुढे क्षमाही मागितली जाते. स्वतःकडून होणार्‍या चुका स्वीकारून त्यासाठी इतरांची क्षमा मागितली जाते.

ऊ. कृतज्ञताभाव जागृत होणे : त्यानंतर मनाची सिद्धता एवढी होते की, चुका दाखवून देणार्‍यांप्रती कृतज्ञताभाव जागृत होतो. त्यांच्या साहाय्यामुळेच अहंची जाणीव होत असल्याने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.

ए. मन सतत भावावस्थेत रहाणे : आतापर्यंत भगवंताने प.पू. डॉक्टरांच्या माध्यमातून केलेल्या कृपेच्या वर्षावाची जाणीव होऊन मन सतत भावावस्थेत रहाते. गुरुमाऊलींचा (प.पू. डॉक्टरांचा) अपार वात्सल्यभाव आणि प्रीती यांमुळे मन उचंबळून येते. या प्रीतीच्या वर्षावास पात्र होण्यासाठी मन धडपडू लागते. त्यानंतर ‘मी कितीही प्रयत्न केले, तरी त्यांचे ऋण फेडू शकत नाही’, याची जाणीव होते.

ऐ. ईश्वरचरणी स्वतःला संपूर्णपणे समर्पित करणे : त्यानंतर भगवंताच्या चरणकमलांशी संपूर्णपणे शरणागती अवलंबण्याविना दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. त्याला देण्यासारखे स्वतःजवळ काहीही नसल्यामुळे स्वतःला संपूर्णपणे समर्पित करण्याची प्रार्थना करते, ‘कृपया माझा स्वीकार करून माझा उद्धार कर आणि तुझ्या कृपेस पात्र होण्यासाठी माझ्यात योग्यता निर्माण कर. तूच माझ्याकडून सर्व करवून घे. हे भगवंता, तुझ्याकडे काय मागावे, काय करावे, कसे बोलावे आणि कसा विचार करावा, ते मला कळत नाही. माझे अस्तित्व संपूर्णपणे नष्ट होऊन त्या ठिकाणी तुझे दैवी अस्तित्व असू दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना !’

१६ आ. चित्राचे विश्लेषण

या चित्रामध्ये पुढील ९ प्रकारचे भाव दर्शवले आहेत.

१. दोष आणि अहं यांमुळे राग येणे
२. दोषांची जाणीव झाल्यानंतर धक्का बसणे
३. अंतर्मुखता
४. शिकण्याची स्थिती
५. खंत वाटणे
६. क्षमायाचना करणे
७. कृतज्ञताभाव
८. अखंड भावावस्था अनुभवणे
९. परिपूर्ण शरणागत भाव निर्माण होणे

१६ इ. अनुभूती

हे चित्र काढतांना ‘मी काय काढत आहे’, हे मला ठाऊक नसतांनाही प्रत्येक टप्प्याचे चित्र एका फुलात काढले आणि प्रत्येक फूल पुढच्या फुलाला जोडले असल्याचे दाखवले. नंतर ते ‘सनातन संस्थेचे रक्षाबंधन’ दर्शवत असल्याचे माझ्या लक्षात आले. ‘आपण सर्व भगवंताशी बांधले गेल्यामुळे आपली मायेतील नाती हळूहळू नष्ट होत जातात आणि सर्व गोष्टींपासून तोच आपले रक्षण करतो’, हेही लक्षात आले.’- सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई. (२२.१.२०१३, मध्यरात्री १२.४५)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘‘बालकभावा’तील चित्रे (भाग १) (कृष्णभक्तीचा आनंद देणारी चित्रे त्यांच्या गुणवैशिष्ट्यांसह)’

Leave a Comment