सुखदु:ख

मानवाचे जीवन म्हणजे सुखदु:खाचा खेळ आहे, असे आपण एकलेले असते. सुख आणि दु:ख यांचा नेमका अर्थ, त्यांचे महत्त्व काय आणि सर्व सुखदुःखांचा अनुभव मनावरच कसा अवलंबून असतो याविषयीचे अतिशय उद्बोधक विवेचन या लेखात करण्यात आले आहे.

 

१. सुखदु:ख : व्याख्या

अ. सर्वेषाम् अनुकूलतया वेदनीयं सुखम् । सर्वेषां प्रतिकूलतया वेदनीयं दुःखम् । – तर्कसङ्ग्रह, कारिका ५५, ५६

अर्थ : सुख म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि / किंवा बुद्धी यांच्याद्वारे जिवाला अनुभवास येणारी अनुकूल संवेदना. दुःख म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि / किंवा बुद्धी यांच्याद्वारे जिवाला अनुभवास येणारी प्रतिकूल संवेदना.

आ. यदिष्टं तत्सुखं प्राहुः द्वेष्यं दुःखमिहेष्यते । – पाराशरगीता, अध्याय ६, श्लोक २७

अर्थ : इहलोकी जे इष्ट वाटते, ते सुख आणि जे द्वेष्य (द्वेष करण्याजोगे) वाटते ते दुःख, असे मानले जाते.

यद्यति्प्रयं यस्य सुखं तदाहुः तदेव दुःखं प्रवदन्त्यनिष्टम् । – महाभारत, शान्तिपर्व, अध्याय १९४, श्लोक १०

अर्थ : ज्याला जे प्रिय वाटते, त्याला तो सुख म्हणतो, तेच अप्रिय झाले की, त्यालाच दुःख म्हणतो.

इ. ‘बाधनालक्षणं दुःखम् । – न्यायसूत्र, अध्याय १, आहि्नक १, सूत्र २१’ बाधना म्हणजे पीडा. पीडा हे ज्याचे स्वरूप आहे, ते दुःख होय.

ई. ‘अधर्मजन्यं सचेतसां प्रतिकूलम् ।’, म्हणजे अधर्मापासून उत्पत्ती असल्यामुळे प्राणीमात्रांना प्रतिकूल ठरते, ते दुःख होय. – भाषापरिच्छेद

उ. ‘आधिभौतिक सुखदुःखे उत्पन्न होण्यासाठी बाह्य पदार्थांचा इंद्रियांशी संयोग होणे, हे जरी प्रथमतः आवश्यक असले, तरी या सुखदुःखांचा अनुभव मनुष्य स्वतःच्या मनानेच घेत असतो. आध्यात्मिक सुखदुःखे तर मानसिकच असतात. शेवटी सर्व सुखदुःखांचा अनुभव मनावरच अवलंबून असतो; म्हणून मनोनिग्रहाने सुखदुःखाच्या अनुभवांचाही निग्रह होणे अशक्य नाही. हाच अभिप्राय मनात आणून मनूने सुखदुःखांचे लक्षण नैयायिकांच्या (न्यायशास्त्राचे अनुयायी) लक्षणांहून निराळ्या प्रकारे सांगितले आहे, ते असे –

सर्वं परवशं दुःखं सर्वमात्मवशं सुखम् ।
एतद्विद्यात्समासेन लक्षणं सुखदुःखयोः ।। – मनुस्मृति, अध्याय ४, श्लोक १६०

अर्थ : जे परवश म्हणजे बाह्य वस्तूंच्या नियंत्रणात असते, ते सर्व दुःख अन् स्वतःच्या (मनाच्या) नियंत्रणात असते, ते सर्व सुख. हे सुखदुःखाचे संक्षिप्त लक्षण होय.’

‘जे दुसर्‍यावर अवलंबून असते, ते सुखसुद्धा दुःखरूपच असते. सदा आपल्या स्वाधीन असलेले आत्मसुख हेच खरे सुख होय.’ – डॉ. वसंत बाळाजी आठवले (खिस्ताब्द १९९१) (आताचे सनातनचे संत पू. डॉ. वसंत बाळाजी आठवले )

 

२. सुखदु:ख : महत्त्व

अ. जीवित रहाण्यासाठी आणि मूलभूत ज्ञान संपादन करण्यासाठी सुख आणि दुःख या मूळ संवेदना जास्त महत्त्वाच्या आहेत. अमीबासुद्धा आम्लाचा एखादा थेंब जरी सभोवती असला, तरी तो अप्रिय वाटल्याने तेथून दूर जातो आणि सुख मिळवण्यासाठी अन्नकण असलेल्या ठिकाणी पोहोचतो. तान्हे मूलही आईच्या दुधाचा आस्वाद घेण्यासाठी तोंड तिच्या स्तनाकडे नेते. लहान मूल आग पाहिल्यावर तेथून दूर पळते आणि पायात काटा रुतल्यास पाय चटकन मागे घेते. यावरून असे लक्षात येते की, सुख मिळवण्यासाठी धडपडणे आणि दुःख किंवा अप्रिय गोष्टींपासून सुटका करून घेणे, या दिशेने प्राणीमात्रांच्या सर्व क्रिया घडत असतात.

आ. सुख आणि दुःख हे आपले महान शिक्षक आहेत. सुखापेक्षा हालअपेष्टा आणि ऐश्वर्यापेक्षा दारिद्र्यच आपल्याला अधिक शिकवते. माणसाच्या प्रगतीसाठी सुख आणि दुःख हे दोन्ही निसर्गाने दिलेले अनुक्रमे पारितोषिक आणि दंड होत.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अध्यात्म – शाश्वत आनंदप्राप्तीचे, म्हणजे ईश्वरप्राप्तीचे शास्त्र’

Leave a Comment