सनातन पंचांगचे आध्यात्मिक स्तरावरील महत्त्व

सनातन पंचांग या सनातन-निर्मित दिनदर्शिकेचे वैज्ञानिक चाचणीतून लक्षात आलेले
आध्यात्मिक स्तरावरील महत्त्व आणि यापुढील संशोधनास साहाय्य करण्याचे वैज्ञानिकांना आवाहन

अध्यात्माचा विज्ञानाद्वारे कस न लावताच अध्यात्माला खोटे ठरवणारे असतात तथाकथित पुरोगामी, तर अध्यात्म विज्ञानाच्या पद्धतीने मांडणारी सनातन संस्था आहे खरी पुरोगामी !

१. सनातन पंचांग या सनातन-निर्मित दिनदर्शिकेचा उद्देश

सनातन पंचांग या दिनदर्शिकेचे पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)
या वैज्ञानिक प्रणालीद्वारे प्राप्त झालेले प्रभावळीचे छायाचित्र

सनातन-निर्मित सनातन पंचांग ही दिनदर्शिका वर्ष २००६ पासून लोकांना प्रतीवर्षी उपलब्ध होत आहे. सनातनचा दिनदर्शिका बनवण्याचा उद्देश केवळ लोकांना पंचांग कळावे, हा नसून धर्मशिक्षण मिळावे, हा आहे. दिनदर्शिका घराघरात पोहोचत असल्याने तो उद्देश साध्य करता येतो. साधना आणि राष्ट्ररक्षण यांविषयीही थोडीफार जागृती लोकांमध्ये व्हावी, या उद्देशानेही काही मजकूर त्यामध्ये असतो. तसेच सनातन पंचांगामधून सात्त्विक स्पंदने पसरावीत, या दृष्टीने त्यातील मजकूर, चित्रे आणि कलाकृती सात्त्विक असतात अन् त्यांची मांडणीही सात्त्विक होईल, असे पाहिले जाते.

२. सनातन पंचांगाची वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश

एखाद्या वस्तूत किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत, ती वस्तू सात्त्विक आहे कि नाही किंवा ती वस्तू आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील ज्ञान असणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक वस्तूतील स्पंदनांचे निदान अचूक लावू शकतात. भक्त, साधक संतांनी सांगितलेले शब्दप्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध केली असेल, तरच ती खरी वाटते.

सनातन पंचांग सात्त्विक असावे, हे ध्येय समोर ठेवून ते बनवण्यात आले. ते खरोखरच सात्त्विक आहे कि नाही हे पडताळण्याच्या उद्देशाने पिप तंत्रज्ञानाद्वारे त्याची चाचणी करण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

३. पिप तंत्रज्ञानाची ओळख

पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) तंत्रज्ञानाद्वारे आपण एखाद्या वस्तूभोवती असणार्‍या स्पंदनांची गती, तसेच त्या वस्तूची रंगीत प्रभावळ (ऑरा) पाहू शकतो. पिप या संगणकीय उपकरणाला व्हिडीओ कॅमेर्‍याशी जोडून त्यात असलेल्या वेगवेगळ्या फिल्टरद्वारे वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती यांची ऊर्जावलये पहाता येतात. हे उपकरण रंगांचे विभाजन करते. यात सकारात्मक आणि नकारात्मक रंग त्यांच्या क्षमतेनुसार दिसण्याची सोय आहे. पिप प्रणालीनुसार नारिंगी आणि जांभळा रंग तणावाची किंवा त्रासदायक स्पंदने यांचे प्रतीक आहे. गुलाबी रंग राजसिकतेचे प्रतीक आहे. हिरवा रंग आध्यात्मिक उपायांशी संबंधित सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. निळा रंग सात्त्विकता किंवा शांती यांचे प्रतीक आहे, तर सोनेरी छटा असलेला पिवळा रंग उच्च स्तरीय वैश्‍विक स्पंदने दर्शवतो.


४. निरीक्षणे आणि त्यांचे विवरण

अ. सनातन पंचांग याची प्रभावळ मुख्यत्वे सोनेरी छटा असलेला पिवळा रंग दर्शवते. याचा अर्थ सनातन पंचांगामधून उच्च स्तरीय वैश्‍विक स्पंदने प्रक्षेपित होत आहेत.

आ. सनातन पंचांगामधून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जाही प्रक्षेपित होत असल्याचे हिरव्या रंगाच्या प्रभावळीवरून दिसून येते, तसेच या प्रभावळीमध्ये नारिंगी किंवा जांभळ्या रंगाची भावनिकता, जडत्व किंवा त्रासदायकता दर्शवणारी स्पंदने नाहीत.

इ. हिरव्या रंगाच्या प्रभावळीच्या पुढे असलेली निळ्या रंगाची प्रभावळ सनातन पंचांगाची सात्त्विकता दर्शवते.

ई. सनातन पंचांगातून चांगली ऊर्जा प्रक्षेपित होत असल्याने त्या क्षेत्रातील वातावरण आणि मनुष्य, प्राणी अन् वनस्पती आरोग्यदायी आणि सकारात्मक ऊर्जेने भारित होण्यास साहाय्य होते.

– श्री. संतोष शामराव जोशी (वैश्‍विक ऊर्जा संशोधक, सर्वाश्रम वैश्‍विक आध्यात्मिक ऊर्जा संशोधन केंद्र, पुणे) ([email protected])

५. पिप या वैज्ञानिक उपकरणाने केलेल्या चाचणीतून मिळालेल्या
निरीक्षणांशी मिळतेजुळते सनातन पंचांगाच्या संदर्भात आलेले अनुभव

५ अ. सनातन-निर्मित दिनदर्शिका (सनातन पंचांग)
घरात लावल्याने घरात आनंदी वातावरण निर्माण होणे

आमच्या घरामध्ये नेहमी तंग वातावरण असायचे. सनातनच्या साधिका सौ. सुनंदा शेळके यांच्याकडून मी सनातनची दिनदर्शिका घेतली आणि ती घरात लावली. तेव्हापासून घरातील व्यक्तींच्या वागण्यात चांगले पालट झाले आणि घरातील वातावरणही आनंदी झाले आहे. – सौ. मनीषा अजित पाटील, मु.पो. राशिवडे, जिल्हा कोल्हापूर.

५ आ. सनातन पंचांग लावल्यावर चांगली स्पंदने जाणवणे

सनातन पंचांग स्वयंपाकघरात लावल्यावर तेथे प्रवेश करताच त्या ठिकाणी पुष्कळ चांगली स्पंदने जाणवली.

– सौ. शिल्पा कुडतरकर, माऊंट लॉरेल, अमेरिका. (वर्ष २००७)

५ इ. सनातन दिनदर्शिका हातात घेतल्यावर बोटांना चांगल्या संवेदना जाणवणे

१९.८.२००७ या दिवशी कागदाची एक गुंडाळी हातात प्रयोगासाठी दिली होती. ती हातात घेतल्यावर माझ्या बोटांना पुष्कळ चांगल्या संवेदना जाणवू लागल्या. प्रयोगानंतर गुंडाळी उघडली तेव्हा त्यात २००७ ची सनातन दिनदर्शिका होती. – कु. सोनल जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

५ ई. सनातन दिनदर्शिका हातात घेतल्यावर संवेदना जाणवणे आणि नामजप सुरू होणे

१९.८.२००७ या दिवशी २००७ ची सनातन दिनदर्शिका प्रयोगासाठी हातात घेतल्यानंतर माझ्या हातांमध्ये संवेदना जाणवू लागल्या आणि माझा नामजप सुरू झाला. – कु. अनिता मोंडकर (आताच्या सौ. कृपा गोवेकर), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(यातील कोणतेही लिखाण वाचकाला राज्यघटनेच्या कलम ५१ अ नुसार वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवण्याला बाधा आणण्यासाठी लिहिलेले नाही. हे लिखाण घटनात्मक अधिकाराचा वापर करत अध्यात्माचा अभ्यास करण्यासाठी आणि धर्माचरण सांगण्यासाठी लिहिलेले आहे. धर्म आणि श्रद्धा या गोष्टी वैयक्तिक असल्याने येथे दिलेले अनुभवसुद्धा वैयक्तिकच आहेत. त्यामुळे ते सरसकट लागू होतील अथवा सर्वांनाच ते येतील, असे नाही. समाजात अंधश्रद्धा पसरवण्यासाठी किंवा वैद्यकीय उपचारांना किंवा वैज्ञानिक दृष्टीकोनांना विरोध करण्यासाठी हे लिखाण नाही. वाचकाने डोळसपणे याचा अभ्यास करणे अपेक्षित आहे, याची कृपया नोंद घ्यावी. – संपादक)

६. वैज्ञानिकांना आवाहन

या प्रयोगाचे निष्कर्ष आणि व्यक्तीवर होणारे परिणाम यांच्या संदर्भात सनातन संस्था संशोधन करत आहे. या संशोधनातील निरीक्षणांमागची आध्यात्मिक कारणमीमांसा संत सांगू शकतात; पण सामान्यजनांना प्रयोगांचे निष्कर्ष वैज्ञानिक भाषेत कळावेत, यासाठी वैज्ञानिकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनातून अशा प्रकारच्या विषयांवर शास्त्रीय संशोधन करणार्‍यांकडून साहाय्यता मिळाल्यास आम्ही आभारी होऊ.

संपर्क : पू. डॉ. मुकुल गाडगीळ,

इ-मेल : [email protected]

संदर्भ : दैनिक 'सनातन प्रभात'

Leave a Comment