॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १५ – पुरुषोत्तमयोग

श्री. अनंत आठवले
श्री. अनंत आठवले

गीतेतील शिकवणीच्या संदर्भात श्री. अनंत आठवले यांनी स्वतः केलेले विवेचन खाली दिले आहे. – संकलक

अर्जुनाला गीता लगेच कळली !

आपल्याला गीता अनेकदा वाचूनही कळत नाही. काही काळाने आपण गीतेचा अभ्यास करणे सोडून देतो; मात्र श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता एकदाच सांगितली. त्याला ती कळली आणि त्याने तिच्यातील शिकवणीनुसार आचरण केले. यावरून हे लक्षात येते की, आपण अर्जुनासारखा भाव ठेवला, तरच आपल्याला गीता कळेल. – (प.पू.) डॉ. आठवले

 

॥ श्रीकृष्णाय नमः ॥

१. तत्त्वज्ञान

१ अ. संसाराला अश्‍वत्थ (पिंपळ) वृक्षाची दिलेली सार्थ उपमा !

संसाराला पिंपळाच्या झाडाची उपमा दिली आहे. झाडामध्ये मुळापासून वाढ चालू होऊन पुढे फांद्या वर पसरतात; पण अव्यक्त ब्रह्मापासून उत्पत्ती होऊन गुणांमध्ये गुंतत जाणे, हे अधोगामित्व असल्याने मूळ वर आणि फांद्या खाली, असे म्हटले आहे. यज्ञ इत्यादी कर्मांद्वारे वेद संसारवृक्षाचे रक्षण आणि वृद्धी करतात, तसेच त्याला सुशोभित करतात; म्हणून त्यांना पाने म्हटले आहे. गुणांमुळे प्रबळ झालेल्या विषयभोगरूपी फांद्या पसरलेल्या आहेत. त्या कर्मानुसार मनुष्याला (संसारात) बांधतात.

१ आ. जीवात्मा शरीर सोडतांना मन
आणि इंद्रिये यांना बरोबर घेऊन जात असणे

जीवसृष्टीत (देहामध्ये) जीवात्मा हा ईश्‍वराचाच सनातन अंश आहे. तो मन आणि पाच इंद्रिये यांना (आपल्यामध्ये) आकर्षित करतो. सुगंधित स्थानाजवळून वहाणारा वारा जसा आपल्याबरोबर सुगंध नेतो, तसे जीवात्मा जेव्हा शरीर सोडून जातो किंवा दुसरे शरीर धारण करतो, तेव्हा मन (चित्तावर रुजलेले संस्कार, मनाच्या प्रवृत्ती, मनाचा कल) आणि इंद्रिये (इंद्रियांच्या त्यांच्या विषयांमधील रुची-अरुची) यांना समवेत घेऊन जातो. मन आणि पाच ज्ञानेंद्रिये यांच्या आश्रयाने जीवात्मा विषयांचा उपभोग घेतो.

१ इ. सर्व प्राण्यांना धारण करणारा ईश्‍वर !

ईश्‍वर पृथ्वीत प्रवेश करून आपल्या शक्तीने सर्व प्राण्यांना धारण करतो.
१. ईश्‍वर शरिरातील वैश्‍वानर अग्नी होऊन भक्ष्य (चावून खाता येण्याजोगे अन्न), भोज्य (गिळण्याजोगे अन्न), लेह्य (चाटून खाता येणारे) आणि चोष्य (चोखून खाता येणारे) असे चारही प्रकारचे अन्न पचवतो.
२. स्मरण, ज्ञान, संशयांचे निराकरण, वेदांनी जाणण्यायोग्य आणि वेदांताचा कर्ता, हे सर्व ईश्‍वरच आहे.

१ ई. क्षर, अक्षर आणि परमात्मा

जगात क्षर (नाशवान्) आणि अक्षर (अविनाशी) असे दोन पुरुष आहेत. सर्व प्राणीमात्रांची शरीरे क्षर आहेत आणि कूटस्थ जीवात्मा अक्षर आहे. क्षर आणि अक्षर यांहूनही उत्तम पुरुष परमात्मा तिन्ही लोकांत प्रवेश करून त्यांना धारण करतो, त्या ईश्‍वराला पुरुषोत्तम म्हणतात.

 

२. साधना

२ अ. तीव्र वैराग्य अंगी बाणणे

संसारात वैराग्य, म्हणजे सत्ता, सुख, प्रीती आणि रमणीयता न भासेल, इतके तीव्र वैराग्य अंगी बाणणे; मनाने संसारापासून विलग होणे आणि मग परम पदावर विचार करून त्याला जाणणे. (अध्याय १५, श्‍लोक ३ आणि ४)

२ आ. संसारापासून अलिप्त होणे

विनाशशील प्रकृतीच्या गुणांमुळे संसारात जीवात्मा गुंततो, हे जाणून आणि त्यांच्यापासून अलिप्त होऊन सर्वव्यापी अन् सर्वांतरात्मा पुरुषोत्तमालाच भजणे.

२ इ. आसक्तीरूपी दोषाला जिंकणे

मान आणि मोह सोडणे, आसक्तीरूपी दोषाला जिंकणे, परमात्म्यात निरंतर मन लावणे. सर्व कामना सोडणे अन् सर्व द्वंद्वांपासून विमुक्त होणे. (अध्याय १५, श्‍लोक ५)

विवेचन

श्रीकृष्णांनी सांगितलेल्या तीन पुरुषांत
जीवात्मा दोहोंच्या मध्ये मध्ये असल्याने अधोगतीला जाणे
किंवा उन्नती साधणे, हे प्रत्येकाच्या प्रयत्नांवर अवलंबून असणे

श्रीकृष्णांनी तीन पुरुष सांगितले आहेत. क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष. यातील क्षर पुरुष नाशवान् आहे आणि विषयोपभोगांमध्ये गुंतलेला आहे. उत्तम पुरुष परमात्मा आहे आणि तिन्ही लोकांना धारण करूनही त्यांच्यापासून निर्लिप्त आहे. आपण, म्हणजे अक्षर पुरुष जीवात्मा, क्षर पुरुष आणि उत्तम पुरुष या दोघांच्या मध्ये आहोत. आता क्षर पुरुषामध्ये गुंतून आपली अधोगती करायची, सुखोपभोग घेऊन जन्मत-मरत राहायचे कि उत्तम पुरुषाची कास धरून आपली उन्नती करून घ्यायची आणि जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून मुक्त व्हायचे, हे आपल्या हातात आहे.

 

३. फळ

परम पुरुषाच्या मार्गावर चालून परम पुरुषापर्यंत पोहोचल्याने पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही.

 

४. अध्यायाचे नाव पुरुषोत्तमयोग असण्याचे कारण

या अध्यायातील विषय नीट समजून घेऊन क्षराशी मनाने संबंध तोडून उत्तम पुरुषाशी जुडल्याने पुरुषोत्तमाशी योग होतो.

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

– अनंत बाळाजी आठवले, बी.ई. (सिव्हिल), शीव, मुंबई. (१०.१२.२०१३)

संदर्भ : सनातन-निर्मित आगामी ग्रंथ ‘गीताज्ञानदर्शन’

Leave a Comment