भारतियांच्या संशोधनाकडे पहाण्याचा
भारतियांचा न्यूनगंडात्मक दृष्टीकोन

प.पू. डॉ. आठवले

प.पू. डॉ. आठवले

प.पू. डॉक्टरांचा साप्ताहिक सह्याद्रीमध्ये १९८६ या वर्षी प्रसिद्ध झालेल्या पुढील लेखात स्पष्ट केलेला भारतियांचा न्यूनगंडात्मक दृष्टीकोन आज आणखी वाढलेला दिसतो. ही आहे आपली स्वातंत्र्यानंतरच्या ६६ वर्षांनंतरची प्रगती ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही ! – संपादक

कॅलिफोर्निया लॉस एंजलिस विश्वविद्यालयातून आमच्याकडे संमोहन उपचाराचे एक अभ्याससत्र घ्यायला आपल्याला आवडेल का ? अशा अर्थाचे एक पत्र आम्हाला आले. त्या संबंधात सुचलेले काही विचार वाचकांना उपयुक्त वाटतील.

१. आमच्या संशोधनाविषयी परदेशातील तज्ञांच्या काही प्रतिक्रिया

भारतीय वैद्यकीय संमोहन आणि संशोधन संस्था या नियतकालिकाचा पहिला अंक अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या इंग्रजी भाषा बोलणार्‍या देशातील प्रमुख संशोधन उपचारतज्ञांना आम्ही भेटपत्र म्हणून पाठवला होता. आमचे प्रसिद्ध झालेले लिखाण व्यक्तीमत्त्वातील दोषांमुळे मानसिक विकार कसे होतात, व्यक्तीमत्त्व पालटण्याच्या आम्ही शोधून काढलेल्या नव्या संमोहन उपचारपद्धती याविषयी होते. त्याचे जगातील बरेच मानसोपचारतज्ञ आणि संमोहन उपचारतज्ञ यांनी चांगले कौतुक केले. वानगीदाखल काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

अ. आपले नियतकालिक अतिशय उत्कृष्ट आहे. आपल्या अंकात संशोधनात्मक भरपूर माहिती आहे. – डॉ. जॅक्सन (कार्यकारी संपादक), ऑस्ट्रेलियन उपचार आणि प्रायोगिक संमोहन शास्त्रविषयक नियतकालिक (मॅनेजिंग एडिटर, ऑस्ट्रेलियन जर्नल ऑफ क्लिनिकल अॅन्ड एक्स्पेरिमेंटल हिप्नोसिस)

आ. आपल्या अंकात बरेच नवीन शास्त्रीय शब्द पहायला मिळाले. आपण शोधून काढलेली अयोग्य गोष्टीची जाणीव आणि तीवर नियंत्रण ही उपचारपद्धत विशेष आवडली. आपल्या लिखाणातून अनुभवांवर आधारलेली आपली नवीन विचारसरणी दिसून येते. एक सुंदर अंक पहाण्याची संधी दिली; म्हणून आपले अनेक आभार.
– डॉ. रॉबर्टसन (पहिले अध्यक्ष), स्कॉटलँड शाखा, ब्रिटिश प्रायोगिक आणि उपचारविषयक संमोहन संस्था. (द इनॉगरल चेअरमन, स्कॉटिश ब्रांच, ब्रिटीश सोसायटी ऑफ एक्स्पेरिमेंटल अॅन्ड क्लिनिकल हिप्नोसिस)

इ. एक सुंदर अंक प्रसिद्ध केल्यामुळे आपले हार्दिक अभिनंदन ! आपल्याला स्वतःला या विषयाचे प्रगाढ ज्ञान आहे. आपले लेख वाचून मला बरेच काही शिकायला मिळाले. आमच्या विद्यार्थ्यांना आपला अंक वाचायला देईन. – प्रा. चेस्टर एम्. पीअर्स, शिक्षण आणि मानसोपचार या शास्त्राचे प्राध्यापक (प्रोफेसर ऑफ् एज्युकेशन अॅलन्ड सायकिअॅसट्रि), फॅकल्टी ऑफ मेडिसिन, हारवर्ड मेडिकल स्कूल, अमेरिका.

ई. हे पुस्तक सदरच्या विषयाची सांगोपांग माहिती देते आणि ती माहिती प्रत्यक्षात आणणे सोपे आहे. सदरच्या विषयाच्या प्रश्नाचा आणि कार्यप्रणालीचा लेखकांनी योग्य प्रकारे विचार केला आहे. – प्रा. कॅथरीन वेल्ड्स, मानसशास्त्र, मानसोपचारशास्त्र, जीवशास्त्रीयवर्तनविषयक शास्त्र आणि स्त्रियांचे कार्यक्रम यांच्या प्रमुख, लॉस एंजेलिस विस्तारित विभाग, कॅलिफोर्निया विद्यापीठ, अमेरिका. Psychiatry, Head, Psychology, Psychiatry, Biobehavioural Science and Womens Programs

उ. आपले प्रकाशन आवडीने वाचले. आपले पुढील अंक अवश्य पाठवा. आपल्या संशोधनाची माहिती आम्हाला कृपया कळवत रहा. – डॉ. झीग, संचालक, मिल्टन एरिक्सन फाऊंडेशन, अमेरिका.

ऊ. संमोहनशास्त्रातील अनेक अनुभव या पुस्तकामध्ये सविस्तरपणे सांगण्यात आलेले असून संमोहनशास्त्राचा प्रत्यक्ष वापर करणार्‍याना ते उपयोगाचे ठरतील. – प्रो. अर्नेस्ट हिलगार्ड, मानसशास्त्र प्राध्यापक एमेरीटस, स्टॅनफोर्ड विद्यापीठ, अमेरिका. आंतरराष्ट्रीय संमोहनशास्त्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष.

ए. हे पुस्तक सदरच्या विषयाची मौल्यवान माहिती देते. वाचकाला त्या माहितीचा चांगला उपयोग होईल, असा मला विश्वास वाटतो. – डॉ. एल्.पी. शहा, मानसोपचारशास्त्राचे मानद प्राध्यापक, के.ई.एम् रुग्णालय आणि जी.एस्. वैद्यक महाविद्यालय, मुंबई आणि इंडियन सायकिअॅमट्रिक सोसायटीचे मानद महासचिव

अशी आणखी बरीच पत्रे आली आहेत. पोलंडसारख्या इंग्रजी भाषिक नसलेल्या देशांतूनही पत्रे आली आहेत, म्हणजे कुठे ना कुठे आमच्या नियतकालिकांचा, आमच्या संशोधनाचा कोठेतरी उल्लेख केला आहे.

२. आमच्या संशोधनाविषयी
भारतियांच्या नकारात्मक प्रतिक्रियांचे कारण

आपल्याकडच्या मुंबई विश्वविद्यालयाचा मानसशास्त्र विभाग सोडला, तर इतर कोणीही आमच्या संशोधनाची नोंदही घेतली नाही. आपल्या देशातील १०० वैद्यकीय महाविद्यालयांतील मानसोपचारतज्ञांना आम्ही आमच्या अंकांच्या भेटप्रती पाठवल्या; पण कोणाकडून साधी पोचही आली नाही. असे होण्याची पुढील कारणे संभवतात.

२ अ. भारतीय मानसोपचारतज्ञांना संमोहन
उपचारशास्त्र या विषयाची तोंडओळखही नसणे

संमोहन उपचारशास्त्र या विषयाची आपल्याकडच्या मानसोपचारतज्ञांना अजून तोंडओळखही नसल्याने आमच्या संशोधनाचे महत्त्व आपल्या आधुनिक वैद्यांना (डॉक्टरांना) समजले नाही; पण परदेशातील आधुनिक वैद्यांना समजले.

२ आ. भारतियांमधील शास्त्रीय दृष्टीकोनाचा
अभाव आणि न्यूनगंड असण्यामागील कारणे

आपल्याकडच्या लोकांत शास्त्रीय दृष्टीकोनाचा अभाव आणि एक प्रकारचा न्यूनगंड आहे. या न्यूनगंडामुळे भारतीय काही नवीन संशोधन करू शकतो, ही कल्पना आपल्या लोकांना पटकन मानवत नसल्याची उदाहरणे सांगतो.

२ आ १. भारतीय आधुनिक वैद्यांनी लक्षात आलेल्या एका रुग्णाच्या रोगाला प्रसिद्धी न देणे, तोच रोग जपानमधील एका आधुनिक वैद्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी वैद्यकीय नियतकालिकात त्या रोगाविषयी माहिती प्रसिद्ध करणे आणि पुढे तो रोग त्या वैद्यांच्या नावाने ओळखला जाणे

जवळजवळ तीस-चाळीस वर्षांपूर्वी मुंबईत जी.टी. रुग्णालयातील एका मानद वैद्यांना एका चालत्या-फिरत्या रुग्णाची नाडी संपूर्ण शरिरात कोठेही लागली नाही. त्या गोष्टीला शास्त्रीय महत्त्व आहे, हे लक्षात न आल्यामुळे ते ही गोष्ट विसरून गेले. नंतर जपानमधील आधुनिक वैद्य (डॉ.) टाकायासू यांना तसाच एक रुग्ण आढळला. त्यांनी त्याची माहिती लगेच वैद्यकीय नियतकालिकात लिहिली. तेव्हापासून तो रोग टाकायासू यांच्या नावाने ओळखला जातो. आपल्या वैद्यांनी त्यांच्या रुग्णाची माहिती आधी प्रसिद्ध केली असती, तर एका भारतीय वैद्याच्या नावे तो रोग आज जगभर ओळखला गेला असता.

३. आमच्या संशोधनाविषयी
भारतियांच्या नकारात्मक प्रतिक्रियांची उदाहरणे

३ अ. उपचारपद्धतीविषयी आम्ही मांडलेले सिद्धांत वैद्यांना
पटत नसल्याने गंमतीत ते विदेशी वैद्यांचे असल्याचेसांगिल्यावर
मान्य होणे; परंतु पुन्हा ते आमचे म्हणून सांगितल्यावर मान्य न होणे

आम्ही शोधून काढलेल्या उपचारपद्धतीविषयी चर्चा करतांना एखादी गोष्ट आमचा सिद्धांत म्हणून सांगितली की, ज्यांच्यासोबत आम्ही चर्चा करत असू ते मुंबईतील काही मानसोपचारतज्ञ आक्षेप घ्यायचे आणि टीका करायचे. पुढे दोन-तीन वेळा गंमत म्हणून आमचे सिद्धांत किंवा आमचे विचार वैद्य (डॉक्टर) जेकबसन, अॅडली इत्यादींचे सिद्धांत किंवा मत आहे, असे सांगितल्यावर काही एक चर्चा न करता ती सूत्रे त्या मानसोपचारतज्ञांनी मान्य केली. नंतर ज्या वेळी हळूच सांगितले की, हे आमचेच सिद्धांत आहेत, त्या वेळी ते पार गडबडून गेले. गोरा साहेब एखादा सिद्धांत मांडू शकतो; पण डॉ. जयंत आठवले यांनी, म्हणजे भारतियांनी सिद्धांत मांडणे चूक आहे. त्यांना फार तर त्यांचे मत असेल (आणि ते ही चुकीचे असेल), असे समजण्याची आपल्याकडची वृत्ती न्यूनगंडत्वातून निर्माण झाली आहे.

३ आ. मांडलेले सिद्धांत खोटे आहेत, असे सांगून
दुसर्‍याचे पाय ओढण्याची वृत्ती; परंतु परदेशात असे सिद्धांत
मांडल्यावर लगेच त्यांनी ब्रिटीश नियतकालिकाकडे पाठवण्यास सांगणे

दुसर्‍याचे पाय ओढण्याची वृत्तीही आपल्याकडे अधिक आहे. गेल्या वर्षी (ख्रिस्ताब्द १९८५ मध्ये) आम्ही औरंगाबादला वैद्यांसाठी व्याख्यान ठेवले. त्या व्याख्यानात संमोहन उपचाराने धाप कशी बरी होऊ शकते, याची माहिती सांगत असतांना तेथील छातीच्या रोगांचे तज्ञ वैद्य उठून अचानक म्हणाले, एक तर तुम्ही बर्यान केलेल्या धापेच्या रुग्णांना धाप लागली नव्हती किंवा तुम्ही खोटे बोलत आहात. शास्त्रीय सभेत अशासारखे आरोप केले जात नाहीत, याचे भानही या वैद्यांना राहिले नाही.

याच्या उलट इंग्लंडमधील आमच्या वास्तव्यात एका वैद्यकीय परिषदेत इओसिनोफिलिआ हा विकार मानसिक ताणामुळे होऊ शकत असावा; कारण संमोहन उपचाराने त्या रोगाचा एक रुग्ण आम्ही बरा केला आहे, अशी माहिती सांगताच आमची कोणीही खोटारडा म्हणून संभावना केली नाही. उलट ती माहिती संमोहनविषयक ब्रिटीश नियतकालिकाकडे लगेच पाठवा, असे आम्हाला सुचवण्यात आले. तो लेख पुढे ब्रिटीश संमोहनविषयक नियतकालिकात ख्रिस्ताब्द १९७२ मध्ये प्रसिद्ध झाला.

आम्हालाच असे अनुभव येतात असे नाही, तर आमच्या मित्रांनाही येतात. आमच्या एका मित्राने (मुंबईतील एक प्रसिद्ध होमिओपॅथीचे वैद्य यांनी) होमिओपॅथीमधील त्यांच्या संशोधनाचा एक लेख कलकत्त्याच्या एका होमिओपॅथीविषयक मासिकाकडे पाठवला. त्याची पोचही त्यांना मिळाली नाही. नंतर एका आंतरराष्ट्रीय परिषदेत तो लेख प्रबंध म्हणून सादर केला. त्याचे बरेच कौतुक झाले. जगातील होमिओपॅथीविषयक बर्‍याच मासिकांत तो छापून आला. त्यानंतर कलकत्त्याच्या त्याच मासिकाने परदेशातील मासिकात छापून आलेला तो लेख छापला.

३ इ. संमोहन उपचारपद्धत आणि महर्षी
पतंजलींनी सांगितलेले योगदर्शन यांच्यातील साम्य
दाखवल्यावर भारतीय आधुनिक वैद्यांनी त्यावर टीका करणे

दोन वर्षांपूर्वी (ख्रिस्ताब्द १९८२) मुंबईत मानसोपचारतज्ञांची एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. त्यात आम्ही शोधून काढलेली संमोहन उपचारपद्धत आणि महर्षी पतंजलींनी सांगितलेले योगदर्शन यांच्यातील साम्य दाखवले होते. आमचा प्रबंध वाचून झाल्यानंतर बंगलोरच्या राष्ट्रीय मनोविज्ञान संस्थेतील एक प्राध्यापक आणि मुंबईतील एका वैद्यकीय महाविद्यालयातील मानसोपचार विभागाचे माजी प्रमुख यांनी कोणत्याही प्रकारची शास्त्रीय सूत्रे न मांडता डॉ. आठवले काय मूर्खासारखे बोलतात, अशासारखी एक-दोन वाक्यांची विधाने केली. अर्थात तशा विधानांकडे त्या शास्त्रीय परिषदेत आम्ही आणि इतरांनीही दुर्लक्ष केले. गंमत म्हणजे पाश्चात्त्यांच्या आता लक्षात यायला लागले आहे की, आपल्या तत्त्वज्ञानातच मानसशास्त्र आणि मानसोपचारशास्त्र यांचे मूळ आहे आणि गंमत अशी की, पाश्चात्त्यांनी असे म्हटल्यावर आता त्या दोन्ही तज्ञांनी त्यांचे मन पालटले आहे, म्हणजे डॉ. आठवले यांनी (एखाद्या भारतीय आधुनिक वैद्याने) एखादी गोष्ट सांगितली, तर ती चुकीची आणि परदेशातील तज्ञांनी तीच गोष्ट सांगितली, तर ती गोष्ट खरी ही आपल्याकडची वृत्ती आहे आणि ती बदलली पाहिजे. परदेशी बनावटीची घड्याळे, कपडे इत्यादींचे आपल्याकडे जे आकर्षण आहे, त्याचाच हा एक भाग झाला.

३ ई. आमच्या संशोधनाची स्तुती करणारी पत्रे आल्याचे एका प्रसिद्ध आधुनिक वैद्याने (डॉक्टरांनी)
राजकारण्यांना सांगितल्यावर त्यांनी येथे बसून अशी १०० पत्रे आणून दाखवीन, असे सांगणे !

आपापल्या व्यक्तीमत्त्वाप्रमाणे प्रत्येक प्रसंगी प्रत्येकाची प्रतिक्रिया होते. याचे एक उदाहरण आमच्या यशाच्या संदर्भातही पहायला मिळाले. राजकारणात प्रसिद्ध असलेल्या आणि नेहमी खर्‍याचे खोटे अन् खोट्याचे खरे करायची सवय झालेल्या एका प्रसिद्ध वैद्यांना आम्हाला आलेली पत्रे आणि परदेशातील बोलावणे याची माहिती आमच्या एका प्रसिद्ध वैद्य (डॉक्टर) मित्राने त्यांना सांगताच ते वैद्य (डॉक्टर) म्हणाले, त्यात काय ? इथे बसून मी तुम्हाला तशी १०० पत्रे आणून दाखवीन. दादागिरी, मध्यस्थी, लाचलुचपत यांनी सर्व कामे साध्य करणार्‍या राजकारण्यांना शास्त्रीय संशोधन त्याच प्रकाराने साध्य करता येते, असे वाटत असल्यास त्यात आश्चर्य वाटायला नको.

४. भारतीय संशोधकांचे कौतुक न केल्यास ते परदेशात
स्थायिक होणे मान्य करतील, याचे भान सर्वांनी ठेवावे !

हे सर्व लिहिण्याचा उद्देश एवढाच की, आपण संशोधक असलात आणि आपल्याला एखादी चांगली गोष्ट सुचली, तर आपल्या लोकांच्या प्रतिक्रियेचा विचार न करता ती निर्भिडपणे सांगावी. आपण संशोधक नसलात आणि एखाद्याला एखादी चांगली गोष्ट सुचली, तर भारतीय कल्पना अयोग्य असतात, अशा प्रकारे त्या कल्पनेकडे न बघता तिच्यातील तथ्य समजावून घेण्याचा प्रयत्न करा. तथ्य असल्यास आपल्या लोकांचे कौतुक करा. तसे केले, तरच आपल्याकडे जास्त संशोधन होईल. नाहीतर संशोधक परदेशात रहाणेच पसंत करतील.

– (प.पू.) डॉ. जयंत आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदा आठवले, (साप्ताहिक सह्याद्री, अंक ४३) (ख्रिस्ताब्द १९८६)

संदर्भ : दैनिक 'सनातन प्रभात'

Leave a Comment