॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ११ – विश्‍वरूपदर्शनयोग

अर्जुनाला गीता लगेच कळली !

श्री. अनंत आठवले
श्री. अनंत आठवल

आपल्याला गीता अनेकदा वाचूनही कळत नाही. काही काळाने आपण गीतेचा अभ्यास करणे सोडून देतो; मात्र श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता एकदाच सांगितली. त्याला ती कळली आणि त्याने तिच्यातील शिकवणीनुसार आचरण केले. यावरून हे लक्षात येते की, आपण अर्जुनासारखा भाव ठेवला, तरच आपल्याला गीता कळेल. – (प.पू.) डॉ. आठवले

गीतेतील शिकवणीच्या संदर्भात श्री. अनंत आठवले यांनी स्वतः केलेले विवेचन येथे दिले आहे. – संकलक

 

॥ श्रीकृष्णाय नमः ॥

१. श्रीकृष्णाने अर्जुनाला दिव्य दृष्टी देणे

दहाव्या अध्यायात श्रीकृष्णांनी आपल्या वेगवेगळ्या विभूती सांगितल्या. अर्जुनाने श्रीकृष्णांना त्यांचे ते विराट रूप दाखवण्याची विनंती केली. प्राकृत डोळ्यांनी ते रूप बघणे शक्य नसल्याने श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली आणि मग आपले विश्‍वरूप दाखवले.

 

२. अर्जुनाला घडलेले भगवंताच्या अवर्णनीय अशा विश्‍वरूपाचे दर्शन !

सहस्र सूर्य एकाच वेळी उगवले, तर त्यांचा प्रकाश कदाचित् त्या महात्मन् विश्‍वरूपाच्या प्रकाशाएवढा असू शकेल. त्या रूपाला सर्वत्र अनेक हात, पोट आणि डोळे होते अन् त्याचे आदि, मध्य आणि अंत हे दिसतच नव्हते; कारण ते रूप अनंत होते. पृथ्वीपासून स्वर्गापर्यंतचे अंतर आणि सर्व दिशा त्यांनी व्यापल्या होत्या. सर्व देव त्यांच्यात प्रवेश करत होते. महर्षी आणि सिद्ध यांचे संघ त्यांची स्तुती करत होते. विक्राळ दात आणि प्रलयकालाग्नीसारखी प्रज्वलित तोंडे पाहून अर्जुनाला दिशा कळेनाशा झाल्या. धृतराष्ट्राचे सर्व पुत्र, त्यांच्या पक्षांतील राजे, भीष्म, द्रोण, कर्ण आणि पांडवांकडील मुख्य योद्धे या भयंकर दाढा असलेल्या प्रज्वलित तोंडांमध्ये शिरतांना अर्जुनाला दिसले.

२ अ. श्रीकृष्णार्जुनांचा संवाद !

अर्जुनाने विचारले, असे उग्र रूप असणारे आपण कोण आहात ? श्रीकृष्णांनी सांगितले, मी लोकांचा नाश करण्यास प्रवृत्त झालेला काळ आहे. प्रतिपक्षी योद्धे तुझ्याविनाही मारले जाणारच आहेत; म्हणून तू युद्ध करून विजय मिळव. या सर्वांचे मरण मी निश्‍चित केलेलेच आहे.

विवेचन – श्रीकृष्णांनी उग्र रूप दाखवण्यामागचे कारण

हा युद्धाचा प्रसंग होता. युद्धात फार मोठा संहार होणार होता. शिवाय अर्जुनाला अन्यायी कौरवांविरुद्ध लढायला प्रवृत्त करायचे होते. तेव्हा प्रसंगानुरूप श्रीकृष्णांनी उग्र रूप दाखवले, अन्यथा ईश्‍वराचे एक निश्‍चित असे रूप नाही आणि ते अनंत रूपांनी व्यक्त होऊ शकतात.

 

३. तत्त्वज्ञान

३ अ. आधी सांगितलेल्या ज्ञानाचे विज्ञान, म्हणजे अनुभूत ज्ञान होणे

श्रीकृष्णांनी एकांशेन स्थितो जगत् । (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १०, श्‍लोक ४२), म्हणजे माझ्या एका अंशाने (मी) सर्व जग आहे, असे जे सांगितले, त्याची एक चुणूक प्रत्यक्ष दाखवली. श्रीकृष्णांच्या आदि-मध्य-अंतरहित देहात सर्व जग दिसले. आधी सांगितलेल्या ज्ञानाचे विज्ञान, म्हणजे अनुभूत ज्ञान झाले. दहाव्या अध्यायात ज्या विभूती सांगितल्या, त्या अर्जुनाने प्रत्यक्ष पाहिल्या आणि अनुभवल्या.

३ आ. सर्व कृती ईश्‍वरी नियोजनानुसार होणे

मी युद्ध करणार किंवा करणार नाही, असा अहंकार व्यर्थ असून सर्व ईश्‍वरी नियोजनानुसारच होते; म्हणून अहंकार सोडावा.

३ इ. ईश्‍वराने स्वतःलाच प्रकट करणे

प्रसंगानुसार आवश्यक रूपाने ईश्‍वर स्वतःला प्रकट करतो, पण ईश्‍वराचे ते केवळ एकच रूप नसते.

३ ई. अनन्य भक्तीनेच परमेश्‍वराशी एकरूप होणे शक्य !

वेदाध्ययन, तपश्‍चर्या, दान आणि यज्ञ यांनी ईश्‍वराच्या अशा रूपाचे दर्शन होणे संभव नाही. अनन्य भक्तीने, म्हणजे एका ईश्‍वराविना अन्य काही नाहीच, अशा भावानेच परमेश्‍वराला तत्त्वाने जाणणे, साक्षात् करणे आणि त्याच्याशी एकरूप होणे शक्य आहे. (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ११, श्‍लोक ५४)

 

४. साधना

सर्व कर्मे ईश्‍वरासाठी करणे, ईश्‍वराला परम आश्रय मानून आसक्तीरहित होऊन आणि कोणाविषयीही वैरभाव न बाळगता ईश्‍वराची भक्ती करणे.

 

५. फळ

अशी भक्ती करतो, तो ईश्‍वराला प्राप्त होतो. (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ११, श्‍लोक ५५)

विवेचन

इंद्रिये, मन आणि बुद्धी यांनी अनन्यभक्ती होऊ शकत नाही. त्यासाठी स्वमध्ये, अहंमध्ये आणि आपल्या अस्तित्वातच व्याकुळतापूर्वक उत्कंठा हवी.

 

६. अध्यायाचे नाव विश्‍वरूपदर्शनयोग असे देण्याचे कारण

ईश्‍वराच्या विश्‍वरूपाचे वर्णन वाचून त्याची व्याप्ती लक्षात येते. सर्वत्र आणि सर्वकाही ईश्‍वरच आहे, हे जाणल्याने ईश्‍वराशी योगाचा अनुभव येतो; म्हणून अध्यायाचे नाव विश्‍वरूपदर्शनयोग असे आहे.

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

– अनंत बाळाजी आठवले, बी.ई. (सिव्हिल), शीव, मुंबई. (१६.१२.२०१३)

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘गीताज्ञानदर्शन’

 

Leave a Comment