धर्माच्या पायावर उभे असलेले सनातन संस्थेचे कार्य वाढेल ! – स्वामी गंभीरानंद महाराज

DSC04051

डावीकडून स्वामी प्रेम स्वरूपानंद, ब्रह्मचारी सुबोध आणि स्वामी गंभीरानंद महाराज यांना सनातन
प्रभातच्या वाटचालीविषयी सांगतांना श्री. आनंद जाखोटिया, मागे सनातनचे साधक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला भेट

देवद (पनवेल), ८ नोव्हेंबर (वार्ता.) – सनातन संस्थेने हिंदु धर्म आणि अध्यात्म या संबंधीच्या विविध विषयांवर सचित्र आणि सोप्या भाषेत ग्रंथांचे उत्तम सादरीकरण केले आहे. आजच्या युवा पिढीसमोर हिंदु धर्माचे हे ज्ञान वैज्ञानिक भाषेत पोहोचवणे आवश्यक आहे. हेच कार्य सनातन संस्था प्रामाणिकपणाने करत आहे. मुळात संस्थेचे कार्य सनातन धर्माच्या पायावर उभे असल्याने ते वाढेल आणि टिकेल. तुम्ही आमचेच कार्य करत आहात, असे प्रतिपादन भिवंडी येथील स्वामी गंभीरानंद महाराज यांनी केले. येथील सनातन आश्रमाला दिलेल्या सदिच्छा भेटीच्या वेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत स्वामी गंभीरानंद आश्रमाचे व्यवस्थापक स्वामी प्रेम स्वरूपानंद, ब्रह्मचारी सुबोध आणि ११ साधक उपस्थित होते. सनातनचे पू. राजेंद्र शिंदे यांनी पुष्पहार आणि भेटवस्तू देऊन संतगणांचा सन्मान केला, तसेच त्यांच्याशी वार्तालापही केला. या वेळी सनातनचे साधक श्री. आनंद जाखोटिया यांनी त्यांना आश्रमातील दिनचर्या आणि सेवा यांची माहिती दिली.

क्षणचित्रे

१. स्वामी गंभीरानंद महाराज म्हणाले, मी शक्यतो बाहेर कुठे जात नाही. संस्थेविषयी आमच्या साधकांकडून ऐकले होते. त्यांच्याकडून आश्रमात साधक रहातात, हे ऐकल्यावर उत्सुकता वाढली आणि इकडे यायचे ठरवले.
२. डिसेंबरमध्ये भिवंडीत होणार्‍या आश्रमाच्या वार्षिक उत्सवाला येण्याचे आग्रहाचे निमंत्रण स्वामी गंभीरानंद महाराज यांनी संस्थेला दिले.
३. आश्रमातील सेवा करणार्‍या वयस्कर साधकांना उद्देशून महाराज म्हणाले, वानप्रस्थाश्रमाचे कार्य या माध्यमातून येत आहे. वयस्कर साधकांच्या अनुभवातून युवा साधक अधिक योग्य प्रकारे हे कार्य करू शकतात.

स्वामी गंभीरानंद यांचा परिचय

भिवंडी येथील स्वामी गंभीरानंद हे स्वामी चिदानंद सरस्वती यांचे शिष्य आहेत. वेद-उपनिषद यांचे अध्ययन आणि अध्यापन, तसेच संस्कृतचा प्रचार आणि प्रसार हे त्यांचे प्रमुख कार्य आहे. योगासन वर्ग, बालसंस्कार शिबीर आणि धर्मांतर रोखणे, यांसारखे उपक्रमही ते राबवतात.