महान भारतीय संस्कृतीचे आचरण सर्वांनी करायला हवे ! – श्री श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य श्रीविद्यारण्य भारती स्वामीजी

श्री श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य
श्रीविद्यारण्य भारती स्वामीजी यांचे सनातनच्या देवद आश्रमामध्ये आगमन

पनवेल – इंग्रजांच्या वैचारिक गुलामगिरीमुळे १८० वर्षांपूर्वी असणारा सुजलाम् सुफलाम् भारत आज विपत्तीमध्ये आहे. लॉर्ड मेकॉले याने भारताचा आणि भारतियांच्या मानसिकतेचा संपूर्ण अभ्यास करून ती मानसिकता मोडून काढण्यासाठी भारतीय संस्कृती नष्ट करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे शिक्षणप्रणाली बनवली. इंग्रजांच्या शिक्षणप्रणालीचे आचरण करत असल्यामुळे समृद्ध भारत विनाशाकडे जात आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या महान भारतीय संस्कृतीचे आचरण करायला हवे, असे मत श्री श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य श्रीविद्यारण्य भारती स्वामीजी यांनी मांडले. ते पनवेल येथील सनातनच्या आश्रमात साधकांना उद्बोधन करतांना बोलत होते. ८ फेेब्रुवारीला त्यांनी सनातनच्या आश्रमाला भेट दिली आणि साधकांना आशीर्वाद दिला.
     सनातनचे साधक श्री. शशांक जोशी यांनी श्री श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य श्रीविद्यारण्य भारती स्वामीजी यांचे पाद्यपूजन केले. श्री. ओंकार कापशीकर यांनी त्यांना आश्रम दाखवला. त्यांच्यासोबत त्यांचे शिष्य श्री. रघुनाथ शर्मा हेही होते. सनातन आश्रमाचे व्यवस्थापक श्री. नंदू मूळ्ये यांनी श्री श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य श्रीविद्यारण्य भारती स्वामीजी यांचा सन्मान केला. या वेळी त्यांना कन्नड भाषेतील ग्रंथ भेट देण्यात आले.

     शंकराचार्य यांच्यासोबत नवी मुंबई येथील हिंदु महासभेचे अध्यक्ष श्री. मंगेश म्हात्रे आणि वेदशास्त्र संपन्न श्री. शिवाजी पारटे गुरुजी हेही उपस्थित होते. यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार श्री. नंदू मुळ्ये यांनी केला.

श्री श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य
श्रीविद्यारण्य भारती स्वामीजी यांच्या मार्गदर्शनातील महत्त्वाची सूत्रे !

१. इंग्रजांनी विद्या, वैदिक, क्रिया, न्याय, संस्कृती आणि कला या सर्व क्षेत्रांमध्ये विषाचे बीज पेरले. त्यामुळे सर्वच क्षेत्रे भ्रष्ट झाली आहेत.
२. भारतियांची समृद्ध स्थिती तीन माता म्हणजे भारतमाता, गोमाता आणि गायत्रीमाता यांच्यामुळे आहे. त्यांचा नाश करण्याचे षड्यंत्र इंग्रजांनी रचले.
३. भारतामध्ये लहान मुलांना शिकवल्या जाणार्‍या कविता मानवाला जन्मापासून मरेपर्यंत उपयोगी पडणार्‍या अशा होत्या. उदा. ये रे ये रे पावसा… इंग्रजी शाळांमध्ये शिकवल्या जाणार्‍या कवितांचा अर्थ उलट आहे. उदा. रेन रेन गो अवे… अशा कवितांच्या परिणामस्वरूप पाऊस पडण्याचे प्रमाण अल्प झाले आहे.
४. संपत्ती गेल्यास आपण मिळवू शकतो, शारीरिक स्थिती बिघडल्यास तीही दुरुस्त करू शकतो; परंतु आपले चारित्र्य भ्रष्ट झाल्यास आपण पुन्हा दुरुस्त करू शकत नाही. हे लक्षात घेऊन इंग्रजांनी भारतीय लोक चारित्र्यहीन कसे होतील, या दृष्टीने प्रयत्न केले आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले.
५. विद्या, क्रीडा, वैद्यकिय आणि न्यायालयीन ही सर्व क्षेत्रे भ्रष्ट होतील, अशी कार्यपद्धत घातली अन् आता पाहिल्यास त्यामध्ये ते यशस्वी झालेले दिसत आहे. त्यामुळे हे सर्व पालटण्यासाठी आपण सर्वांनी भारतीय संस्कृतीचे आचरण करायला हवे.
६. पूर्वी स्वाक्षरीच्या ऐवजी व्यक्तीच्या हाताच्या अंगठ्याचे ठसे घेतले जात असत. अंगठ्याचे ठसे म्हणजे अशिक्षित असे भारतियांच्या मनावर बिंबवून त्यांना स्वाक्षरी करायला सांगितले. आजकाल कोणीही कोणाचीही स्वाक्षरी करून फसवणूक करत आहे. याउलट अंगठ्याच्या ठश्यांमध्ये कोणी फसवेगिरी करू शकत नाही.

     अशा प्रकारे भारतीय संस्कृतीतील प्रत्येक गोष्ट परिपूर्ण होती. दुर्दैवाने आपण या सर्व गोष्टींपासून दूर गेलो आहोत.

श्री श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य श्रीविद्यारण्य भारती स्वामीजी यांचा परिचय

     कर्नाटक राज्यातील श्रीहंपी विरुपाक्ष विद्यारण्य महासंस्थानचे ते पीठाधीश्‍वर आहेत. त्यांचा कर्नाटक राज्यातील बल्लारी जिल्ह्यातील हंपी, होस्पेट येथे आश्रम आहे. आश्रमामध्ये गोशाळाही आहे. श्री श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य श्रीविद्यारण्य भारती स्वामीजी केवळ चार मास या आश्रमामध्ये असतात. अन्य वेळी ते दक्षिण भारतामधील गोवा, तमिळनाडू, पाँडिचेरी, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये धर्मप्रसारासाठी जातात. त्या ठिकाणी सुवासिनींना श्री यंत्र देऊन सामूहिकरित्या कुंकुमार्चन करून घेतात. तसेच नर्मदा बाण देऊन जोडप्यांकडून नर्मदा बाणलिंगार्चन करून घेतात. लहान मुलांसाठी सामूहिक कार्यक्रमातून प्रत्येक मुलाकडून गणपति आणि सरस्वतीदेवी यांना अभिषेक घालून घेतात. हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी धर्मज्योती प्रज्वलन पदयात्रा काढतात. त्यांनी आतापर्यंत धर्मप्रसारासाठी संपूर्ण भारतभ्रमणही केलेले आहे.
क्षणचित्र : श्री श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य यांच्या सन्मानानंतर त्यांनी नारळ, हार आणि त्यांच्याकडील भगवे वस्त्र श्री. मुळ्ये यांना दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात