॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ६ – आत्मसयंमयोग (ध्यानयोग)

 

श्री. अनंत आठवले
श्री. अनंत आठवले

गीतेतील शिकवणीच्या संदर्भात श्री. अनंत आठवले यांनी स्वतः केलेले विवेचन खाली दिले आहे. – संकलक

 

 

अर्जुनाला गीता लगेच कळली !

आपल्याला गीता अनेकदा वाचूनही कळत नाही. काही काळाने आपण गीतेचा अभ्यास करणे सोडून देतो; मात्र श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता एकदाच सांगितली. त्याला ती कळली आणि त्याने तिच्यातील शिकवणीनुसार आचरण केले. यावरून हे लक्षात येते की, आपण अर्जुनासारखा भाव ठेवला, तरच आपल्याला गीता कळेल. – (प.पू.) डॉ. आठवले

 

॥ श्रीकृष्णाय नम: ॥

१. तत्त्वज्ञान

१ अ. निष्काम कर्मात प्रवृत्ती आणि कर्मनिवृत्ती

योगावर आरूढ होण्याची इच्छा असणार्‍यांसाठी निष्काम भावाने कर्म करणे सहायक असते; पण योगारूढ झाल्यावर उपशम, म्हणजे कर्मांपासून निवृत्त होणे सहायक असते. (अध्याय ६, श्‍लोक ३)

१ आ. योगारूढ कोणाला म्हणतात ?

जेव्हा इंद्रियांचे भोग आणि कर्म यांमध्ये आसक्ती रहात नाही, तसेच कामना आणि कर्म यांचे मूळ असलेल्या सर्व संकल्पांचा अभाव होतो, तेव्हा तो योगारूढ म्हटला जातो. (अध्याय ६, श्‍लोक ४)

१ इ. स्वतःचा उद्धार स्वत:च करणे

स्वतःचा उद्धार स्वतःच करावयाचा आहे. स्वतःची अधोगती करू नये. (अध्याय ६, श्‍लोक ५)

१ ई. मनाला अंतर्मुख करणे

मनाला अंतर्मुख करून मनातील सर्व विचार थांबवावेत. चंचल मन जेथे जेथे भटकेल, तेथून त्याला वळवून अंतरात्म्यात लावावे. यामुळे रजोगुण निवृत्त झाल्यावर मन शांत होऊन ब्रह्मात असलेला आनंद मिळतो. (अध्याय ६, श्‍लोक २६ आणि २७)

विवेचन

रजोगुण कर्माकडे प्रवृत्त करतो. ध्यानात बाह्य कर्मे तर थांबतातच, तसेच मन अंतर्मुख करून विचारही थांबल्याने रजोगुण निवृत्त होतो. ब्रह्म निष्क्रीय आणि निर्विचार असते. तीच निर्विचार स्थिती ध्यानात होते; म्हणून ब्रह्मात असलेला आनंद मिळतो.

१ उ. योग्याची समत्वबुद्धी

सर्व प्राणीमात्रांमध्ये आत्मरूपाने एक वासुदेवच आहे, या दृष्टीकोनाने योगी समत्वबुद्धीने वागतो.

१ ऊ. सर्व यथायोग्य करण्याने योग साध्य होणे

अधिक खाणार्‍याचा, जराही न खाणार्‍याचा, पुष्कळ झोपणार्‍याचा आणि अधिक जागरण करणार्‍याचा योग सिद्ध होत नाही. यथायोग्य आहार-विहार करणार्‍याचा, कर्मांमध्ये यथायोग्य प्रयत्न करणार्‍याचा आणि यथायोग्य झोप घेणार्‍याचा, तसेच जागे रहाणार्‍याचा योग सिद्ध होतो.

१ ए. शुभकर्म करणार्‍याला कधीही दुर्गती प्राप्त न होणे

साधनेने पूर्णत्वाला पोहोचण्याआधीच मृत्यू झाला किंवा प्रयासापासून विचलीत झाला, तरी इहलोकी किंवा परलोकी काहीच हानी होत नाही. असा मनुष्य मृत्यूनंतर चांगल्या (स्वर्गादी) लोकात जाऊन (पुण्याचा उपभोग संपल्यावर) नंतर पवित्र अन् श्रीमंत कुळात जन्म घेतो, अथवा ज्ञानवान् योग्यांच्या कुळात जन्म घेतो. असा जन्म अधिक दुर्लभ असतो. आधीच्या जन्मांच्या बुद्धीशी त्याचा संयोग होतो आणि तो मोक्षप्राप्तीसाठी प्रयास करू लागतो. शुभकर्म करणार्‍याची कधीही दुर्गती होत नाही. (अध्याय ६, श्‍लोक ४०)

 

२. साधना

२ अ. ध्यानासाठी आसनसिद्धता

आशारहित आणि संग्रहरहित होऊन लोकांना सहसा सापडणार नाही, अशा जागी एकटे राहून फार उंच किंवा फार खाली नसलेल्या आसनावर कुश (दर्भ), मृगचर्म आणि त्यावर वस्त्र घालून बसावे. चित्त आणि इंद्रिये यांच्या क्रियांना नियंत्रित करून मन एकाग्र करावे. शरीर, मान आणि मस्तक समान अन् अचल ठेवावे.

२ आ. ध्यानाचा एक प्रकार

१. कोणत्याही दिशेकडे न बघता नाकाच्या टोकावर बघितल्यासारखे करून ईश्‍वरावर ध्यान लावावे.

२. ध्यानाचा दुसरा प्रकार असा आहे की, सर्व कामनांचा त्याग करून, मन आणि इंद्रिये यांना आवर घालून निर्विचार व्हावयाचे.

न किञ्चिदपि चिन्तयेत् । (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ६, श्‍लोक २५) म्हणजे कसलेच, ईश्‍वराचेही चिंतन करायचे नाही. सर्व कामनांचा त्याग करून, मन आणि इंद्रिये यांचे नियमन करून मन आत्म्यात लावून विचारशून्य होणे

३. मनाला वश करण्याचे मार्ग मन अतिशय चंचल असते आणि त्याची प्रवृत्ती विषयोपभोगांमध्येच असते. मनाला वश करण्यासाठी सतत प्रयास करणे आणि विषयांमध्ये वैराग्य, म्हणजे विषयांची आवड न ठेवणे हे उपाय करावेत.

 

४. फळ

अ. सदा ध्यानयोगाचे आचरण करून सर्व दोष नाहीसे झालेला (चित्तशुद्धी झालेला) योगी निरतिशय ब्रह्मानंद मिळवतो. (अध्याय ६, श्‍लोक २८)

आ. अनेक जन्मांच्या साधनेने चित्त पूर्णपणे शुद्ध होऊन मोक्ष मिळतो. (अध्याय ६, श्‍लोक ४५)

 

५. आत्मसंयमयोग नाव ठेवण्यामागील कारणमीमांसा !

या अध्यायात ध्यान लावण्याची साधना सांगितली आहे. आत्मसंयम म्हणजे इंद्रियांचा विषयोपभोगांपासून आणि मनाचा विचार अन् संकल्प-विकल्प यांपासून निग्रह केल्यावरच ध्यान लागू शकते; म्हणून या अध्यायाचे नाव आत्मसंयमयोग आहे.

विवेचन

ध्यानयोगाद्वारे ब्राह्मी स्थिती प्राप्त करणे

अ. या मार्गात कर्माचे विधान नाही, केवळ ध्यान लावण्याचेच कर्म आहे.

आ. गुप्त जागी एकटे रहाण्याचे विधान आहे. याचा अर्थ सर्व बाह्य गोष्टींशी संबंध न ठेवणे.

इ. ब्रह्मामध्ये कर्तव्य, कर्मे, विचार इत्यादी नसतात. त्याचप्रमाणे ध्यानयोगातही नसतात; म्हणून मनुष्य ध्यानयोगाने सरळ ब्राह्मी स्थितीत पोहोचू शकतो; पण कितीही निष्क्रीय, निर्विचार समाधी लावली, तरी त्यातून व्युत्थान होतेच आणि पुन्हा संसार मागे लागतो. म्हणून ध्यानाची पराकाष्ठा गाठणे सोपे नाही. म्हणून श्रीकृष्णांनी म्हटले आहे.

अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् । – (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ६, श्‍लोक ४५)

म्हणजे अनेक जन्मांमध्ये केलेल्या साधनेने अंतःकरणाच्या शुद्धीरूपी सिद्धीला प्राप्त होऊन परम गतीला जातो, मोक्ष मिळवतो.

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

– अनंत बाळाजी आठवले, बी.ई. (सिव्हिल), शीव, मुंबई. (१६.१२.२०१३)

संदर्भ : सनातन-निर्मित आगामी ग्रंथ ‘गीताज्ञानदर्शन’

Leave a Comment