वैशिष्ट्यपूर्ण यज्ञ करणारे संत प.पू. रामभाऊ स्वामी यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला चरणस्पर्श !

वैशिष्ट्यपूर्ण यज्ञ करणारे आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या परंपरेतील तमिळनाडू येथील महान योगी संत प.पू. रामभाऊ स्वामी यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला चरणस्पर्श !

प.पू. रामभाऊ स्वामी आणि परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांची मंगल भेट 

    रामनाथी (गोवा), १४ जानेवारी (वार्ता.) – सर्वांचे कल्याण व्हावे, साधकांचे रक्षण व्हावे आणि जगात शांतता नांदावी, यांसाठी यज्ञ करणारे, समर्थ रामदास स्वामी यांच्या परंपरेतील तंजावूर, तमिळनाडू येथील महान योगी आणि गणपतीचे उपासक संत प.पू. रामभाऊ स्वामी यांचे पुत्र अन् शिष्य श्री. गणेश स्वामी यांच्यासह १३ जानेवारी या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले. या वेळी त्यांना सनातनचे डॉ. दुर्गेश सामंत यांनी आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयी माहिती दिली. या भेटीत त्यांचा सन्मान सनातनचे पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन करण्यात आला. याप्रसंगी परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले उपस्थित होते.   p.p.rambhauswami

     प.पू. रामभाऊ स्वामी यांचा सन्मान करतांना
पू. डॉ. मुकुल गाडगीळ आणि शेजारी श्री. गणेश गोस्वामी

आश्रमभेटीच्या वेळी प.पू. रामभाऊ स्वामी यांनी परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांच्याशी संवाद साधला. या संवादाच्या वेळी उपस्थित साधकांना मार्गदर्शन करतांना प.पू. महाराज म्हणाले, गुरूंचे महत्त्व फार आहे. गुरु पाहतां पाहतां लक्ष कोटी । बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी । जेव्हा आपण गुरुमंत्राचा जप करतो, तेव्हा आपल्याला आध्यात्मिक बळ प्राप्त होते. ज्याप्रमाणे योग्य प्रकारे बीज रोवल्यावर त्याचे रूपांतर मोठ्या वृक्षामध्ये होते, त्याप्रमाणे बीजाक्षरांचा व्यापक प्रभाव तयार होत असतो.

प.पू. रामभाऊ स्वामी यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन

प्रभाते मनीं राम चिंतीत जावा…
      प्रात:काळी उपासना करण्याचे महत्त्व सांगतांना प.पू. स्वामी म्हणाले, प्रभाते मनी राम चिंतित जावा । पुढे वैखरी राम आधी वदावा ॥ या समर्थ रामदास स्वामी यांच्या श्‍लोकानुसार सकाळी उठून रामाचे चिंतन केेले पाहिजे, त्याला प्रार्थना केली पाहिजे; कारण उष:कालात सर्व योग घडतो. आपण देवापासून घेत असतो; पण देवाला काही देत नाही. आपल्याजवळ देवाला देण्यासारखे काही नसते, तर आपण देवाला काय देणार !
     मात्र आपण त्याची उपासना करू शकतो. जेवढे आपण त्याचे चिंतन करू, तेवढा आपल्याला त्याचा अनुग्रह प्राप्त होतो. प्रार्थना केल्यावर आपल्या डोळ्यांतून अश्रूधारा आल्या पाहिजे. जेव्हा गुरु आणि पुजारी प्रार्थना करतात, त्याचा परिणाम आकाशाच्या माध्यमातून आपल्यावर होतो आणि आपल्यावरील प्रारब्धरूपी संकट टळते. मंदिरात केलेल्या प्रार्थनेचा प्रभाव अधिक पडतो. त्यामुळे मंदिरात केलेल्या प्रार्थना अधिक फलद्रूप होतात. एवढे मंदिराचे महत्त्व आहे.

p.p.rambhauswami_2

नियतकालिकांची माहिती सांगतांना उजवीकडून डॉ. दुर्गेश सामंत, 
प.पू. रामभाऊ स्वामी, श्री. गणेश गोस्वामी, श्री. विनायक शानबाग
 
मातृदेवो भव । पितृदेवो भव ।

     मातृ-पितृभक्ती ही श्रेष्ठ भक्ती आहे. आई-वडिलांच्या चरणी नमस्कार करायला पाहिजे. आपल्या मनात त्यांच्याविषयी जी कृतज्ञता असेल, ती बाहेर दिसली पाहिजे. आई-वडिलांची सेवा केल्यामुळे गुरूंच्या सेवेचा लाभ आपल्याला होतो. आई-वडिलांमध्ये आईचे महत्त्व अधिक आहे. त्यानंतर वडील आणि नंतर गुरूंना महत्त्व आहे. आईचा आशीर्वाद मोलाचा आहे. तो अधिक फलद्रूप होतो.

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती

     धर्मो रक्षति रक्षितः ।, म्हणजे जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे रक्षण धर्म करतो. लोकांना जे त्रास असतात, त्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यामुळे ते त्रास आम्हाला भोगावे लागतात. अग्निप्रवेश केल्यावर हे सर्व त्रास भस्म होतात, असे प.पू. रामभाऊ गोस्वामी यांनी सांगितले. त्यांनी ४८ वर्षांपासून पाणी वर्ज्य केले आहे. ते म्हणाले, डॉक्टर माझ्याकडे येतात; पण मी ४८ वर्षे डॉक्टरांकडे गेलो नाही; कारण गोळी घेतली, तर पाणी प्यावे लागेल; परंतु अजून मला कोणताही आजार नाही.
     मनोहि जन्मांतर संगतितम् या वचनाप्रमाणे तुमची जन्मजन्मांतरीचा परिचय असल्याने ही भेट घडून आली, असे प.पू. गोस्वामी या भेटीच्या संदर्भात म्हणाले.

त्रासांची परिणती हिंदु राष्ट्रात होईल !

     हिंदु राष्ट्राविषयी बोलतांना प.पू. रामभाऊ स्वामी म्हणाले, वाल्मीकि ऋषींनी रामायण लिहिले आणि त्यानंतर रामायण घडले. आई बाळासाठी नऊ मास ९ दिवस सर्व सहन करते. आई या ९ मासात जेवढा त्याग करते, तेवढे ते मूल सक्षम होते, तसेच तुम्ही हिंदु राष्ट्रासाठी जो त्याग करत आहात, त्यामुळे पुढील हिंदु राष्ट्रही चांगले असणार आहे. हिंदु राष्ट्रासाठीही काही काळ जाणे आवश्यक आहे. त्यामुळे अजून थोडे सोसावे लागणार आहे. ज्याप्रमाणे नकारात्मकतेची परिणती सकारात्मकतेत होते, त्याप्रमाणे आता जे त्रास होत आहेत, त्याची परिणती हिंदु राष्ट्रात होईल.

प.पू. रामभाऊ स्वामी यांचे काही मौलिक विचारधन

१. तुम्ही जेव्हा त्याग करता, तेव्हा देव प्रसन्न होतो.
२. मंत्र मनातून म्हटले, तर त्याचा प्रभाव पडतो.
३. गुरूंनी घेतलेल्या परीक्षेमुळे शिष्याचा उद्धार होतो.
४. प्रार्थना, मंदिर, होमहवन आणि गोपूजन केले, तर मासात ३ वेळा पाऊस पडतो. पूर्वीचे राजे याप्रकारे वागत होते; म्हणून त्या काळात पाणी साठवण्यासाठी धरणे नव्हती.
५. जेव्हा आपण संपत्ती उपभोगतो, तेव्हा आपल्याला प्रारब्ध लागू होते.
६. एका अग्नीच्या उपासनेमुळे अन्य पृथ्वी, आप, वायू आणि आकाश या चार तत्त्वांचा आपल्याला लाभ होतो.
७. जोपर्यंत तुम्ही विज्ञान समजू शकत नाही, तोपर्यंत ते तत्त्वज्ञान असते आणि जेव्हा आपल्याला तत्त्वज्ञान कृतीत आणता येते, तेव्हा ते विज्ञान असते.
८. जर विज्ञान नसेल, तर जगाचे अस्तित्व नाही.