बिंदूदाबनाचे उपाय करतांना बिंदूंवर दाब देण्याचे प्रमाण

या लेखात आपण प्रत्यक्ष बिंदूदाबन करतांना करायच्या कृती आणि त्याचे परिणाम यांविषयी जाणून घेऊ.

 

१. उपाय करतांना बिंदूंवर दाब देण्याचे प्रमाण

acupressure-hand

  • बिंदूदाबनाचे उपाय करतांना बिंदूंवर दाब देण्याचे प्रमाण पुढील गोष्टींवर अवलंबून असते.
  • रोगाचा प्रकार
  • रुग्णाचे वय
  • रुग्णाची शारीरिक स्थिती
  • रुग्णाच्या शरिराचा बांधा
  • दाब देण्याच्या बिंदूचे स्थान

 

२. उपाय करतांना दाबबिंदूवर दाब किती द्यावा ?

रोग (आजार) कशा प्रकारचा आहे, त्यानुसार उपाय करतांना दाबबिंदूवर हलका, मध्यम किंवा जास्त दाब द्यावा.

अ. बिंदूवर हलका किंवा मध्यम प्रकारचा दाब केव्हा द्यावा ?

  • व्यक्ती प्रथमच उपाय करून घेत असल्यास
  • बिंदूमध्ये तीव्र वेदना होत असल्यास
  • बिंदूवर आणि त्याच्या आजूबाजूला सूज आली असल्यास
  • स्नायू अगदी दुर्बळ आणि सैल झालेले असल्यास
  • संबंधित अवयवाची, उदा. हृदयाची अवस्था पुष्कळ नाजूक झाली असल्यास

आ. बिंदूवर जास्त दाब केव्हा द्यावा ?

  • रोग पुष्कळ जुनाट असल्यास
  • रोगाच्या अन्य गुंतागुंतींमुळे (complications मुळे) उपाय घेणारी व्यक्ती हैराण झाली नसल्यास
  • उपायांच्या वेळेस उपाय करून घेणारी व्यक्ती पुष्कळ थकलेली नसल्यास

 

३. बिंदूदाबनातील दाब आणि उपायांचा सगुण-निर्गुण स्तर यांचे सूक्ष्म-परीक्षण

अ. हळूवार दाब देणे

हळूवार दाब दिल्याने होणारा परिणाम हा निर्गुण स्तरावर कार्य करणारा आणि मनाला आनंद देणारा असतो. याचा स्तर तारक असूनही परिणाम अधिक होतो.

आ. थोडे अधिक बळ (जोर) देऊन दाब देणे

थोडे अधिक बळ देऊन दाब दिल्याने सगुण-निर्गुण अशा दोन्ही स्तरांवर अल्प-अधिक प्रमाणात परिणाम होतो.

इ. अधिक बळाने (जोरात) दाब देणे

अधिक बळाने दाब दिल्याने मारकता धारण होत असल्यामुळे शक्तीच्या लहरी कार्यरत होतात.

संदर्भ : सनातन प्रकाशित ग्रंथ ‘शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदूदाबन’