देवपूजेपूर्वीच्या तयारीची प्रत्यक्ष कृती

प्रस्तुत लेखात आपण पूजेपूर्वी पूजास्थळ आणि उपकरणे यांची शुद्धी कशी करावी; देवतेच्या तत्त्वाशी संबंधित रांगोळी काढणे; देवपूजेला बसण्यासाठी घ्यावयाच्या आसनांचे विविध प्रकार; देवतांवरील निर्माल्य काढण्याची आणि देवतांची चित्रे आणि मूर्ती पुसण्याची योग्य पद्धत यांविषयी माहिती पाहूया.

१. स्तोत्रपठण किंवा नामजप करणे

स्तोत्रपठण किंवा नामजप पूजेची तयारी करत असतांना केव्हाही करता येतो. नामजपाच्या तुलनेत स्तोत्रात सगुण तत्त्व जास्त असते; म्हणून स्तोत्र मोठ्याने म्हणावे आणि नामजप मनात करावा. नामजप मनातल्या मनात होत नसल्यास मोठ्याने करण्यास हरकत नाही.

 

२. पूजास्थळाची शुद्धी आणि उपकरणांची जागृती करणे

२ अ. पूजास्थळाची शुद्धी

१. पूजाघर असलेल्या खोलीचा केर काढावा. शक्यतो पूजा करणार्‍या जिवाने केर काढावा.

२. केर काढल्यावर खोली शेणाने सारवावी. खोलीतील जमीन मातीची असल्यास ती शेणाने सारवणे शक्य असते. जमीन मातीची नसल्यास ती स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी.

३. आंब्याच्या किंवा तुळशीच्या पानाने खोलीत गोमूत्र शिंपडावे. गोमूत्र उपलब्ध नसल्यास विभूतीच्या पाण्याचा वापर करावा.

४. त्यानंतर खोलीत धूप दाखवावा.

२ आ. उपकरणांची जागृती

देवपूजेची उपकरणे स्वच्छ घासूनपुसून घ्यावीत. त्यांच्यावर तुळशीचे पान किंवा दूर्वा यांनी जलप्रोक्षण करावे.

 

३. रांगोळी काढणे

अ. शक्यतो पुरुषांऐवजी स्त्रियांनी रांगोळी काढावी.

आ. रांगोळी शक्यतो मुख्य देवतेचे तत्त्व आकृष्ट करणारी असावी. तसेच एखाद्या विशिष्ट देवतेची पूजा करत असतांना तिच्या तत्त्वाशी संबंधित रांगोळी काढावी.

इ. रांगोळी काढतांना ती देवाच्या नावाची किंवा रूपाची न काढता स्वस्तिक किंवा बिंदू यांनी युक्त असलेली काढावी.

ई. रांगोळी काढल्यावर तिच्यावर हळदी-कुंकू वहावे.

उ. रांगोळीमध्ये देवतेच्या तत्त्वाला पूरक असे रंग वापरावे, उदा. श्री गणपतीच्या रांगोळीत लाल रंग, तर मारुतीच्या रांगोळीत शेंदरी रंग वापरावा.

सात्त्विक रांगोळी लेखमाला पहा !

 

४. शंखनाद करणे

अ. उभे राहून मान वरच्या दिशेने करून आणि थोडी मागच्या बाजूला झुकवून मनाची एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करावा.

आ. श्वास पूर्णतः छातीत भरून घ्यावा.

ई. त्यानंतर शंखध्वनी करण्यास सुरुवात करून ध्वनीची तीव्रता वाढवत न्यावी आणि शेवटपर्यंत तीव्र नाद करावा. शक्यतो शंख एका श्वासात वाजवावा.

उ. शंखिणीचा नाद करू नये.

 

५. देवपूजेला बसण्यासाठी आसन घेणे

अ. पातळीनुसार आसन घेणे

१. कमी आध्यात्मिक पातळीच्या (२० ते ३० टक्के पातळीच्या) पूजकाने, म्हणजे सर्वसाधारण पूजकाने पाटाचे आसन घ्यावे. पाट अखंड असावा. पाटाला लोखंडाचे खिळे मारलेले नसावेत आणि शक्यतो रंगवलेला नसावा.

२. मध्यम पातळीच्या (३० ते ५० टक्के पातळीच्या) पूजकाने रेशमी किंवा तत्सम आसन घ्यावे.

३. उच्च पातळीच्या (५० टक्क्यांपेक्षा जास्त पातळीच्या) पूजकाने कोणतेही आसन घ्यावे.

आ. प्रार्थना करणे

आसनावर बसण्यापूर्वी उभे राहून भूमीला आणि देवाला ‘आसनाच्या ठायी आपला चैतन्यमय वास असू दे’, अशी प्रार्थना करावी.

इ. रांगोळी

पूजकाच्या आसनाच्या खाली किंवा पूजकाच्या पाटाभोवती रांगोळी काढू नये.

 

६. आचमन करणे

अ. पाण्याने भरलेला कलश, पंचपात्री, पळी आणि पाणी सोडण्यासाठी ताम्हण घ्यावे. कलशातील थोडेसे पाणी पंचपात्रीत ओतावे. पंचपात्रीतील पाणी डाव्या हाताने पळीतून उजव्या तळहातावर घेऊन ‘ॐ श्री केशवाय नमः ।’ असे म्हणून प्राशन करावे. यानंतर पुन्हा तळहातावर पाणी घेऊन ‘ॐ नारायणाय नमः ।’ असे म्हणून प्राशन करावे. यानंतर पुन्हा एकदा पाणी घेऊन ‘ॐ माधवाय नमः ।’ असे म्हणून प्राशन करावे. शेवटी तळहातावर पाणी घेऊन ‘ॐ गोविंदाय नमः ।’ असे म्हणून ते ताम्हनात सोडावे.

आ. आचमन करतांना पाणी पिण्याचा आवाज करू नये.

 

७. निर्माल्यविसर्जन

अ. देवतांवरील निर्माल्य काढतांना ते अंगठा आणि अनामिका यांनी उचलावे.

आ. निर्माल्य काढल्यावर त्याचा वास घेऊन ते आपल्या डाव्या बाजूला ठेवावे.

 

८. प्राणायाम, देशकाल उच्चार, संकल्प आणि न्यास करावा.

 

९. कलश, शंख, घंटा आणि दीप यांची पूजा

शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सर्वसाधारणतः उपकरणांची पूजा करतांना उपकरणांवर गंध, अक्षता आणि फूल एकत्रितपणे वहावे. काही ठिकाणी वरील घटकांच्या जोडीलाच तुळशीचे पान वाहायची पद्धत आहे.

अ. शंखाची पूजा करतांना त्यामध्ये पाणी भरावे. शंखाला अक्षता वाहू नयेत.

आ. घंटेला तुळशीचे पान वाहू नये.

इ. काही ठिकाणी दीपाला गंध, अक्षता व फूल वाहून झाल्यानंतर हळदी-कुंकू वाहण्याची पद्धतही आहे.

 

१०. पूजासाहित्य आणि पूजास्थळ यांची आणि स्वतःची शुद्धी

कलश आणि शंख यांतील थोडेसे पाणी पळीमध्ये एकत्र घ्यावे. ‘पुंडरीकाक्षाय नमः ।’ हा नाममंत्र म्हणत तुळशीच्या पानाने ते पाणी पूजासाहित्यावर, आजूबाजूला व स्वतःच्या शरिरावर शिंपडावे आणि नंतर तुळशीचे पान ताम्हनात सोडावे.

 

११. देवतांच्या मूर्ती आणि चित्रे स्वच्छ करणे

देवतांच्या मूर्ती धातूच्या असल्यास त्या लिंबू, चिंच आणि पाणी यांनी धुऊन नंतर वस्त्राने स्वच्छ पुसून घ्याव्यात. मातीच्य मूर्ती असल्यास कोरड्या वस्त्राने हळूवारपणे पुसाव्यात. देवतांची चित्रे असल्यास ती आधी ओल्या वस्त्राने पुसून नंतर कोरड्या वस्त्राने पुसावीत. मूर्ती आणि चित्रे पुसतांना देवतेच्या (छातीच्या ठिकाणच्या) अनाहतचक्राच्या बिंदूपासून पुसायला सुरुवात करून प्रदक्षिणाकार मार्गाने गोलाकार दिशेने बाहेरच्या बाजूला पुसत यावे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘देवपूजेपूर्वीची तयारी’

Leave a Comment