संत तुकाराम महाराज : प्रेमातील व्यापकता

Article also available in :

SantTukaramMaharaj

संत तुकाराम महाराजांनी देहू गावाबाहेरच्या एका ऊसाच्या मळ्याची काही दिवस राखण केली; म्हणून त्या मळ्याच्या मालकाने त्यांना पंचवीस-तीस ऊसांची एक मोळी दिली. दोरखंडाने बांधलेली ती मोळी खांद्यावर घेऊन संत तुकाराम महाराज घराकडे चालले असता वाटेत खेळणारी मुले त्यांना विचारू लागली, तुकोबा, एवढे ऊस तुम्ही कोणासाठी घेतले हो ? ते म्हणाले, बाळांनो, अरे तुमच्यासाठीच. बंडू हा ऊस घे तुला, गुंडू हा तुला, धोंडू हा घे, तूपण.. हा, तू घे… हा, तू घे. असे म्हणत तुकोबा ज्या वेळी त्यांच्या घरी पोहोचले, त्या वेळी त्यांच्या खांद्यावर एकच ऊस आणि त्याच्या भोवतीचे दोरखंडाचे भले मोठे वेटोळे एवढेच काय ते शिल्लक राहिले होते.

तो प्रकार पाहून तुकाराम महाराजांची पत्नी आवली भरपूर रागावली. स्वत:ला मिळालेला सर्व ऊस लोकांच्या मुलांना देऊन आपल्या मुलांना काही आणले नाही; म्हणून ती तुकाराम महाराजांना नको नको ते बोलली आणि रागाच्या झपाट्यात तिने तो उसाचा तुकडा त्यांच्या पाठीवर मारला. त्या वेळी त्याचे तीन तुकडे होऊन एक तुकडा तिच्या हातात राहिला आणि दोन तुकडे जमिनीवर पडले. तेव्हा संत तुकाराम महाराज शांतपणे तिला म्हणाले, आवलेे, किती ग धोरणी तू ? आता तू सारखे वाटे केलेस. जो तुकडा तुझ्या हातात राहिला, तो तुझा आणि खाली जे पडले त्यांतील एक माझा अन् दुसरा मुलांचा ! ही त्यांची शांत वृत्ती पाहून बायकोला फार पश्‍चात्ताप झाला.

तात्पर्य : हे विश्वची माझे घर, असे वाटत असल्यामुळे संत तुकाराम महाराजांनी आपली आणि लोकांची मुले असा भेदभाव केला नाही.

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (वर्ष १९८०)

 

त्यागातूनच ईश्वरप्राप्ती शक्य !

संत तुकाराम महाराजांची विठ्ठलावर नितांत श्रद्धा होती. त्यामुळे ते सर्व गोष्टींचा त्याग अगदी सहजतेने करू शकले. तुकाराम महाराजांची थोरवी समजल्यानंतर लोक त्यांचा सन्मान करू लागले. तेव्हा ते दूर अरण्यात जाऊन एकांतात ईशचिंतन करू लागले. एकदा दोन मास ते घरी गेलेच नव्हते. एक दिवस त्यांची पत्नी नदीवरून पाणी आणत असतांना वाटेत तिला तुकाराम महाराज भेटले. ती पटकन त्यांना वाटेत अडवून म्हणाली, तुम्ही घरी येत नाही. आमची वाट काय ? तेव्हा तुकाराम म्हणाले, पांडुरंग हाच माझा पिता आणि रुक्मिणी हीच माझी माता. तूही त्यांचे पाय धर, म्हणजे ती तुलाही अन्न-वस्त्र पुरवतील. तेव्हा ती म्हणाली, मी हरिचरणांचे स्मरण करीन; पण तुम्ही घरी बसा. तुकाराम महाराज म्हणाले, तू तसे वचन देत असलीस, तर मी घरी येतो. तिने तसे वचन दिले आणि दोघे जण घरी आले. तुकाराम महाराज घरी आले त्या दिवशी एकादशी होती. तुळशी वृंदावनाजवळ बसून त्यांनी आपल्या पत्नीला उपदेश केला. त्या उपदेशाने ती प्रभावित झाली. तिने दुसर्‍या दिवशी सूर्योदयी स्नान करून देवपूजा केली आणि ब्राह्मणांस बोलावून सर्व घर लुटवले. नंतर दुपारच्या वेळी घरात अन्न नाही, असे पाहून मात्र ती विचारात पडली. आदल्या दिवशी एकादशीचा उपवास असल्यामुळे ती आणि मुले भुकेने अगदी व्याकुळ झाली.

जगज्जननी त्या संकटात एका महाराणीचे रूप घेऊन तुकाराम महाराजांचे सत्त्व पहाण्यासाठी आली. ती म्हणाली, तुम्ही सर्व घरदार ब्राह्मणांकरवी लुटवले असे ऐकले, तर काही उरले असेल, तर मला द्यावे. ते ऐकून घरात जे एक लुगडे वाळत घातले होते, तेही तुकाराम महाराजांनी तिला दिले. लुगडे दिले ही गोष्ट तुकारामांच्या पत्नीला समजली. तेव्हा तिला राग आला. ती म्हणू लागली, दोन मासांनी कालच त्यांना समजावून आणले. त्यांनी उपदेश करून मला कशी भुरळ घातली पहा. ब्राह्मणांकडून सर्वस्वी लुटवले. मुले भुकेने व्याकुळ झाली. ती संतापली आणि ज्या चरणांच्या चिंतनाने असा अनर्थ झाला, ते पाय फोडून टाकण्याकरिता ती दगड घेऊन जाऊ लागली. तुकाराम महाराजांनी विचारल्यावर तिने खरे कारण सांगितले. ते ऐकून तो दगड माझ्या मस्तकावर घाल, असे तुकाराम महाराज म्हणाले; परंतु ती दगड घेऊन देवळाकडे जाऊ लागली. तुकाराम महाराज तिच्या मागोमाग गेले.

दगड घेऊन ती देवळात येताच रुक्मिणीने दार बंद केले आणि तुकाराम बाहेर राहिले. तुकारामांची पत्नी पांडुरंगाच्या चरणांवर दगड मारणार इतक्यात रुक्मिणीने तिचे हात धरले आणि तुझा कोणता अपराध आम्ही केला, असे विचारले. तेव्हा ती म्हणाली, घरात मुले उपाशी असून अन्नासाठी त्यांनी रडून गोंधळ केला आहे. या चरणांनी आमचा घात केला; म्हणून मला राग येऊन मी हे चरण फोडत आहे. रुक्मिणीने तिला समजावून सांगितले, तू स्वस्थ बस. तुला संसारात जे जे न्यून पडेल ते ते मी पुरवत जाईन. मग रुक्मिणीने तिला लुगडे, चोळी, होन देऊन शांत केले. तेव्हा दगड टाकून देऊन तिने जगज्जननीचे पाय धरले आणि आनंदाने घरी गेली.

एवढा उपदेश करूनही आपली बायको उतावळी होऊन रुक्मिणीजवळून होन घेऊन आलेली पाहून तुकाराम महाराजांना फार वाईट वाटले. ते तिला म्हणाले, तू परमार्थ दवडलास. सिद्धी, संपत्ती या सर्वांचा त्याग केल्यानेच ईश्‍वरप्राप्ती होते. त्यानंतर तुकाराम महाराजांनी तिच्याकडील सर्व होन गोरगरिबांमध्ये वाटून टाकले.

 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात