प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय भाग – १

प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय
(रोगनिवारणासाठी प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळे स्वतः शोधून दूर करणे)

संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील ११ ग्रंथ आतापर्यंत (फेब्रुवारी २०१६) प्रकाशित झाले आहेत. या मालिकेतील प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय या नूतन ग्रंथाचा परिचय क्रमशः ३ भागांद्वारे करून देत आहोत.

ही उपायपद्धत केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नाही, तर एरव्हीसाठीही उपयुक्त आहे. वाचकांनी आतापासूनच हे उपाय करून पहावेत. असे केल्याने या उपायपद्धतीचा सराव होईल, तसेच तिच्यातील बारकावेही कळतील. यामुळे प्रत्यक्ष आपत्काळात विकारांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास निर्माण होण्यास साहाय्य होईल. या ३ भागांतून वाचकांना या उपायपद्धतीची ओळख होईल. सविस्तर विवेचन ग्रंथात केले आहे. तो ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावा.

आध्यात्मिक उपायांच्या नवनवीन पद्धतींचे
विवेचन करणारे जगाच्या पाठीवरील
एकमेव परात्पर गुरु डॉ. आठवले !

ppdr150
परात्पर गुरु डॉ. आठवले

व्यक्तीला होणार्‍या शारीरिक आणि मानसिक त्रासांचे कारण बहुतेक वेळा आध्यात्मिक असते. त्यातील प्रमुख कारण म्हणजे वाईट शक्तींचा त्रास. हे त्रास दूर होण्यासाठी आजवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपायांच्या अनेक नवनवीन पद्धतींचे विवेचन केले आहे, उदा. देवतांचा एक-आड-एक नामजप, रिकाम्या खोक्यांचे उपाय. या उपायपद्धतींचा सनातनच्या सहस्रो साधकांना लाभ होत असल्याने या पद्धती प्रमाणभूत शास्त्रेच झाली आहेत. यांतीलच एक पद्धत म्हणजे, प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय. वर्ष २०१० पासून सहस्रो साधकांनी या उपायांचा प्रयोग करून त्यांना लाभ झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर या उपायपद्धतीविषयी हा ग्रंथ संकलित केला आहे.

 

प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत
हिंदु धर्मातील ज्ञानावर आधारित उपायपद्धत !

प्राणशक्ती (चेतना) ही मनुष्यासाठी जीवनदायिनी शक्ती आहे. मनुष्याचे विकार बरे करण्यासाठी पिरॅमिड उपाय, रेकी उपाय यांसारख्या प्रचलित उपायपद्धतींमध्येही प्राणशक्तीचा उपयोग केला जातो. या ग्रंथातही प्राणशक्तीचा विशिष्ट प्रकारे उपयोग करून विकार बरे करता येण्यामागील शास्त्र सांगितले आहे. या उपायपद्धतीमध्ये हाताच्या बोटांच्या मुद्रा आणि नामजप करणे, हे महत्त्वाचे घटक आहेत.

मानवाच्या हाताची पाच बोटे ही पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक बोट आणि त्याच्याशी संबंधित पंचतत्त्व ही या ग्रंथात दिलेली माहिती शारदातिलक (अध्याय २३, श्‍लोक १०६ वरील टीका) आणि स्वरविज्ञान या ग्रंथांत दिलेल्या माहिती प्रमाणेच आहे.

मुद्रा करून तिचा शरिराच्या कुंडलिनीचक्रांच्या ठिकाणी किंवा विविध अवयवांच्या ठिकाणी न्यास करणे, हा प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धतीचा एक भाग आहे. प्राचीन काळापासून मंत्रयोगात मातृकान्यास करण्यास सांगितले आहे. त्यातही पाच बोटे आणि तळवा यांनी शरिराच्या विविध अवयवांच्या ठिकाणी न्यास करण्यास सांगितले आहे. (संदर्भग्रंथ : भारतीय संस्कृति कोश, खंड ४ आणि ७)

अध्यात्म हे कृतीच्या स्तराचे शास्त्र आहे. त्यामध्ये प्रयोगशीलता आणि सृजनशीलता आहे. हिंदु धर्मातील ज्ञानाचा उपयोग करतांनाच आम्ही जिज्ञासु वृत्तीने अभ्यास केला. प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळे शोधण्याची पद्धत, तसेच विविध मुद्रा, न्यास आणि नामजप यांच्या संदर्भात स्वतः प्रयोग केले आणि अनुभव घेतला. अनेक साधकांनीही या उपायपद्धतीने प्रयोग केले. या उपायपद्धतीचे लाभ लक्षात आल्याने आता ग्रंथाच्या माध्यमातून सर्वांसमोर ही उपायपद्धत प्रस्तुत करत आहोत. वाचकांनीही या उपायपद्धतीच्या संदर्भात काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभवायला आल्यास कळवावे. ईश्‍वरानेच हे कार्य करवून घेतले, याविषयी ईश्‍वरचरणी कृतज्ञता व्यक्त करतो. – डॉ. आठवले (२८.१०.२०१५)

मनोगत

१. उपायपद्धतीचे मर्म

मानवाच्या स्थूलदेहात रक्ताभिसरण, श्‍वसन, पचन, मज्जा इत्यादी विविध संस्था कार्यरत असतात. त्यांना कार्य करण्यासाठी जी शक्ती लागते, ती प्राणशक्तीवहन संस्था पुरवते. तिच्यात एखाद्या ठिकाणी अडथळा आल्यास संबंधित इंद्रियाची कार्यक्षमता अल्प झाल्याने विकार निर्माण होतात. अशा वेळी इंद्रियांचे कार्य सुधारण्यासाठी आयुर्वेदीय, अ‍ॅलोपॅथिक आदी औषधे कितीही घेतली, तरी त्यांचा विशेष उपयोग होत नाही. त्यासाठी प्राणशक्तीवहन संस्थेत निर्माण झालेला अडथळा दूर करणे, हाच एकमेव मार्ग असतो. आपल्या हातांच्या बोटांतून प्राणशक्ती बाहेर पडत असते. तिचा वापर करून विकार बरे करणे, हे प्राणशक्तीवहन उपायपद्धतीचे मर्म आहे.

२. अधिक परिपूर्ण उपायपद्धत !

व्यक्तीला त्रास देणार्‍या वाईट शक्ती व्यक्तीतील रोगाचे मूळ स्थान वारंवार पालटतात. अशा वेळी बिंदूदाबन आदी उपायपद्धतींमध्ये सांगितलेले रोगाशी संबंधित बिंदू दाबून अचूक उपाय करणे शक्य होत नाही. प्राणशक्तीवहन संस्था उपायपद्धतीमध्ये प्रत्येक वेळी अडथळ्याचे स्थान शोधले जात असल्याने अचूकतेने उपाय करणे शक्य होते.

३. अधिक स्वयंपूर्ण उपायपद्धत !

आगामी भीषण आपत्काळाचा विचार करता रोगनिवारणाच्या संदर्भात स्वयंपूर्ण बनण्यासाठी बिंदूदाबन उपाय, रिफ्लेक्सॉलॉजी, पिरॅमिड उपाय, चुंबक उपाय यांसारख्या उपायपद्धती महत्त्वाच्या आहेत. बिंदूदाबन, रिफ्लेक्सॉलॉजी आदी उपायपद्धतींमध्ये पुस्तक किंवा जाणकार यांचे साहाय्य आवश्यक असते. पिरॅमिड, चुंबक आदी उपायपद्धतींमध्ये ती ती साधने आवश्यक असतात. या पार्श्‍वभूमीवर कोणाच्याही साहाय्याची आणि कोणत्याही साधनांची आवश्यकता न भासणारी प्राणशक्तीवहन संस्था उपायपद्धत अधिक स्वयंपूर्ण ठरते.

– डॉ. आठवले (२८.१०.२०१५)

१. प्राणशक्तीच्या प्रवाहातील
अडथळे शोधणे (न्यास करण्यासाठीचे स्थान शोधणे)

१ अ. वाईट शक्तींचा त्रास असणार्‍यांनी नामजप करत स्थान शोधावे !

बोटांनी स्थान शोधतांना श्‍वास कुठे बंद पडतो, याकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे असते. वाईट शक्तींचा तीव्र त्रास असणार्‍यांनी नामजप करतच प्रयोग करावा; कारण स्थान शोधतांना त्यांच्या हाताच्या बोटांतून त्रासदायक शक्ती त्यांच्या शरिरात जाण्याची शक्यता असते.

१ आ. कुंडलिनीचक्रांच्या स्थानी बोटे
फिरवून न्यास करण्यासाठीचे स्थान शोधणे

श्‍वासाकडे लक्ष ठेवून त्रासाशी संबंधित इंद्रियाचा ज्या कुंडलिनीचक्राशी संबंध असेल त्याच्या जवळच्या भागात बोटे वर किंवा खाली नेतांना श्‍वास अडकल्यासारखे होते. यासाठी सैल ठेवलेली हाताची अंगठा सोडून इतर बोटे शरिरापासून १ – २ सें.मी. अंतरावरून खालून वर आणि वरून खाली न्यावीत. मात्र काही न जाणवल्यास स्वाधिष्ठानचक्रापासून सहस्रारचक्रापर्यंत प्रत्येक चक्राच्या जवळच्या भागात बोटे वर आणि खाली न्यावीत. असे करतांना ज्या चक्रस्थानी किंवा त्याच्या जवळपास श्‍वास अडकल्यासारखे होते, ते न्यास करण्यासाठीचे स्थान असते.

1

१ इ. शरिराच्या सर्व भागांवर
बोटे फिरवून न्यास करण्यासाठीचे स्थान शोधणे

कधी कुंडलिनीचक्रस्थानी अडथळा असला किंवा नसला, तरी शरिरातील विविध नाड्यांमध्येही अडथळा असतो. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित इंद्रियांत त्रास जाणवतो, उदा. श्‍वास लागणे. अशा वेळी नाड्यांतील अडथळा शोधून काढण्यासाठी चक्रस्थाने सोडून शरिराच्या डोके, मान, छाती, पोट, हात, पाय इत्यादी सर्व भागांवर सर्व बाजूंनी बोटे फिरवून कोठे अडथळा आहे का ?, हे शोधावे.

2

१ ई. स्थान शोधतांना ज्या ठिकाणी त्रासाच्या प्रकटीकरणाचे
लक्षण आढळते, ते स्थानही न्यास करण्यासाठी योग्य असणे

स्थान शोधतांना कधी कधी आध्यात्मिक उपायही होतात. आध्यात्मिक उपाय झाल्यामुळे त्रासाच्या प्रकटीकरणाचे लक्षण (उदा. जांभई येणे, ढेकर येणे, त्वचेवर त्रासदायक संवेदना जाणवणे) जाणवू शकते. असे झाले, तर ते स्थानही न्यास करण्यासाठी योग्य आहे, असे समजावे.

१ उ. उजव्या हाताच्या बोटांनी स्थान
न सापडल्यास डाव्या हाताच्या बोटांनी स्थान शोधावे.

१ ऊ. दोन हातांच्या बोटांनी स्थान शोधणे

एका हाताच्या बोटांनी कुंडलिनीचक्रांतील किंवा शरिरातील इतर स्थानांतील प्राणशक्तीवहनाच्या प्रवाहातील अडथळा लक्षात येत नसला, तर एका हाताच्या पाठच्या बाजूला दुसर्‍या हाताचा तळवा लागेल, अशा तर्‍हेने तो ठेवून दोन हातांच्या बोटांनी स्थान शोधावे. दोन हातांच्या बोटांतून प्राणशक्ती अधिक प्रमाणात प्रक्षेपित होत असल्याने अडथळ्याचे प्रमाण अल्प असले, तरी अडथळ्याचे स्थान लक्षात येते आणि त्या स्थानी उपाय करता येतात.

3

१ ए. स्थान शोधण्यासाठी हातांची बोटे
फिरवत असतांना कधी कधी असह्य त्रास होणे

स्थान शोधण्यासाठी हातांची बोटे फिरवत असतांना कधी कधी उलटी आल्यासारखे वाटणे, श्‍वास बंद होणे, असा असह्य त्रास होतो. तो त्रास तेथील इंद्रियाच्या हालचालीच्या नैसर्गिक दिशेऐवजी उलट्या दिशेने बोटे फिरवल्यामुळे होतो. याचे एक उदाहरण याप्रमाणे – मोठ्या आतड्याच्या हालचालीची दिशा पोटाच्या उजव्या बाजूच्या खालच्या जागेकडून सरळ वर छातीच्या बरगडीपर्यंत, तेथून डाव्या बाजूच्या बरगडीपर्यंत आणि तेथून खाली पोटाच्या डाव्या बाजूच्या खालच्या दिशेकडे अशी आहे. त्याउलट बोटे फिरवल्यास असह्य त्रास होतो. असा त्रास झाल्यास ती दिशा चुकीची आहे, हे लक्षात घ्यावे.

पुढील भाग वाचण्यासाठी खालील मार्गिकेवर ‘क्लिक’ करा !

प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय भाग – २

संदर्भ : सनातन – निर्मित ग्रंथ ‘प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय’