सात्त्विक शुभेच्छापत्र पाठवा |  दैनिक मुख्य पान


दीपावली

दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात.

अंतर्भूत दिवस : आश्विन वद्य त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्विन वद्य चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अमावास्या (लक्ष्मीपूजन) व कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलीप्रतिपदा) असे चार दिवस दिवाळी साजरी केली जाते. काही जण त्रयोदशीला दिवाळीत न धरता, `दिवाळी उरलेल्या तीन दिवसांची आहे', असे समजतात. वसुबारस आणि भाऊबीज हे दिवस दिवाळीला जोडून येतात, म्हणून त्यांचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूत: ते सण वेगवेगळे आहेत.

दीपावलीचा भावार्थ : `श्रीकृष्णाने आसुरी वृत्तीच्या नरकासुराचा वध करून जनतेला भोगवृत्ती, लालसा, अनाचार व दुष्टप्रवृत्ती यांपासून मुक्‍त केले आणि प्रभूविचार (दैवी विचार) देऊन सुखी केले, तीच ही `दीपावली\' आपण वर्षानुवर्षे केवळ एक रूढी म्हणून दीपावली साजरी करीत आहोत. आज त्यातील गुह्यार्थ लोप पावला आहे. हा गुह्यार्थ लक्षात घेऊन त्यातून अस्मिता जागृत झाल्यास अज्ञानरूपी अंध:काराचे, तसेच भोगवृत्ती व अनाचारी, आसुरी वृत्ती असलेल्या लोकांचे प्राबल्य कमी होऊन त्यांचे सज्जनशक्‍तीवरील वर्चस्व कमी होईल.

सण साजरा करण्याची पद्धत
अ. आकाशात तारे असतांना ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात. आघाडा या वनस्पतीच्या फांदीने डोक्यापासून पायापर्यंत व पुन्हा डोक्यापर्यंत पाणी प्रोक्षण करतात. यासाठी मूळ असलेली आघाड्याची वनस्पती वापरतात.

आ. यमतर्पण : अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण करण्यास सांगितले आहे. हा तर्पणाचा विधी पंचांगात दिलेला असतो. त्याप्रमाणे विधी करावा. त्यानंतर आई मुलांना ओवाळते. काही जण अभ्यंगस्नानानंतर नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट (एक प्रकारचे कडू फळ) पायाने ठेचून उडवितात, तर काही जण त्याचा रस (रक्‍त) जिभेला लावतात.

इ. दुपारी ब्राह्मणभोजन घालतात व वस्त्रदान करतात.

ई. प्रदोषकाळी दीपदान करतात. ज्याने प्रदोषकात घेतले असेल, तो प्रदोषपूजा व शिवपूजा करतो. (संदर्भ : सनातनचे प्रकाशन `सण, धार्मिक उत्सव व व्रते')


नरक चतुर्दशी

नरक चतुर्दशीच्या दिवशी करण्यात येणार्‍या विविध कृतींमुळे होणारे परिणाम

नरक चतुर्दशीच्या दिवशी जिवाने उटणे लावून स्नान केल्याने ग्रहणता (पृथ्वीतत्त्वाची तत्त्वात्मक आकर्षणता) व ग्रहणतेची गुणरूपता (शुद्धतेतील उच्चात्मकता) निर्माण होते व तेजोमय स्वरूपाची निर्गुण-सगुण आणि मारक-तारक स्तरांवर आधारलेली साधना करण्यास तो लायक होतो.

नरक चतुर्दशीच्या दिवशी पुरुषांवर होणारे परिणाम व आईने पुत्र आणि पती यांचे औक्षण करण्याचे कारण
१. नरक चतुर्दशीच्या दिवशी वायूमंडलात प्रक्षेपित होणार्‍या लयदर्शकात्मक अवस्थेच्या संचारणाशी निगडित लहरी पुरुषांमध्ये स्त्रियांच्या तुलनेत १० टक्के अधिक प्रमाणात ग्रहण होतात.

२. नरक चतुर्दशीच्या दिवशी आईने पुत्र व पती यांचे औक्षण करावे. असे केल्याने स्वत:च्या उत्पत्तीजन्य स्वरूपदर्शकात्मक ऊर्जास्वरूपाद्वारे पुरुषामध्ये ग्रहण झालेल्या लयात्मक स्वरूपाशी निगडित बिजाला स्थितीस्वरूपात रहाण्यासाठी आवाहन करून लयगामी संचारणेकडे होत असलेली वाटचाल थांबते.

३. नरक चतुर्दशीच्या दिवशी घरातील सुवासिनीने पुरुषाला स्नानापूर्वी औक्षण करावे. असे करणे, म्हणजे संस्कार सक्षमतेचा आध्यात्मिक लाभ प्रदान करणार्‍या स्नानापूर्वी तिने स्वत:च्या ऊर्जेतील चालनेद्वारे व अग्नीदीपाद्वारे जिवावर आलेले आवरण दूर करून त्याच्यात क्रियाबलाची जागृती करणे होय.

नरक चतुर्दशीच्या दिवशी ब्राह्मणभोजन, वस्त्रदान, दीपदान, प्रदोषपूजा आणि शिवपूजा करण्यामागील अध्यात्मशास्त्रीय कारण

अ. ब्राह्मणभोजन : नरक चतुर्दशीच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन देणे, म्हणजे धर्मस्वरूप अवतरीत होऊन कार्य करण्यासाठी आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करणे. या माध्यमातून ब्रह्मांडात संचारत असलेल्या धर्मलहरींना पुष्टता प्रदान करून अवतारी कार्यासाठी, म्हणजेच पृथ्वीवर येणार्‍या त्रासदायक अधोगामी लहरींना नष्ट करण्यासाठी समष्टीच्या इच्छाशक्‍तीचा पुरवठा करून प्रत्यक्ष स्वरूपात कार्य करण्यासाठी आवाहन करणे. या माध्यमातून स्वत: धर्मकर्तव्य करून ईश्‍वराच्या कृपाशीर्वादात्मक लहरींना ग्रहण करता येते.

आ. वस्त्रदान : वस्त्रदान करणे, म्हणजे देवतांच्या लहरींना भूतलावर येण्यासाठी दानाच्या स्वरूपात, म्हणजेच धर्माच्या संवर्धनतेच्या माध्यमातून पोषणता प्रदान करून कार्यस्वरूपाच्या जागृतीचे आवाहन करणे. या माध्यमातून आपल्या धनसंचयाला धर्म स्वरूपाच्या कार्यासाठी अर्पण केल्याने आपली आध्यात्मिक उन्नती होते.

इ. दीपदान : दीपदान करणे, म्हणजे लयाच्या ऊर्जात्मक व चालनात्मक स्वरूपात होणार्‍या युद्धात स्वत:च्या रक्षणासाठी मृत्यूची देवता यम, याला त्याचा भाग देऊन अपमृत्यूपासून स्वत:चे रक्षण करणे. या माध्यमातून धर्माला त्याचा हविर्भाग देऊन तृप्‍त करून आपले समष्टी कर्तव्य करता येते.

ई. प्रदोषपूजा : `कालाय तस्मै नम:' या कालमहात्म्याचे वर्णन करून कालाच्या माध्यमातून कार्यरत होणार्‍या स्थिरात्मक व पुरुषदर्शकात्मक क्रियाशक्‍तीच्या एका भागाची पूजा करून त्याचे संवर्धन करणे, म्हणजेच कार्यदर्शक स्वरूपात्मकता प्रदान करणे. या माध्यमातून कालमहिमा चित्तावर बिंबवून त्याप्रमाणे आचरण करून उच्च स्तराची अवस्था प्राप्‍त करून धर्म आचरता येतो.

उ. शिवपूजा : समष्टीला त्रास देणार्‍या अधोगामी लहरींच्या निर्दालनासाठी जागृत झालेल्या ईश्‍वराच्या मारक स्वरूपाच्या सगुणतेला पूजेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्‍त करणे. या माध्यमातून ईश्‍वराच्या प्रत्येक कृतीत आपुलकी निर्माण होऊन भाववृद्धी होऊन ईश्‍वराशी एकरूपता गाठण्याच्या दिशेला वाटचाल होते. - एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून)  


लक्ष्मीपूजन

लक्ष्मीपूजनाचे शास्त्र व महत्त्व

लक्ष्मीपंचायतन : या दिवशी ब्रह्मांडाच्या कक्षेमध्ये संपूर्ण `लक्ष्मीपंचायतन\' प्रवेश करते. `श्रीविष्णु, इंद्र, कुबेर, गजेंद्र व लक्ष्मी' यांचा पंचायतनामध्ये समावेश असतो. या पंचायतनाचे कार्य वेगवेगळे आहे.
१. श्री विष्णु : सुख (समाधानातील आनंद)
२. इंद्र : ऐश्वर्य (संपत्तीतून मिळालेले समाधान)
३. कुबेर : संपत्ती (प्रत्यक्ष धन देणारा)
४. गजेंद्र : संपत्तीचे वहन करणारा
५. लक्ष्मी : वरील चार घटकांना प्रत्यक्ष बळ पुरवणारी शक्‍ती

लक्ष्मीपूजनाचे महत्त्व : या दिवशी अमावस्येचा काळ असल्यामुळे लक्ष्मीचे मारक तत्त्व कार्यरत असते. या मारक तत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी धनसंपत्तीची यथासांग पूजा ही तिन्हीसांजेला म्हणजेच कातरवेळेलाच केली जाते; कारण पूजेतील पूजकाच्या भावामुळे श्री लक्ष्मीचे मारक तत्त्व कार्यरत होऊन वायूमंडलातील त्रासदायक लहरींचे उच्चाटन करते. लक्ष्मीच्या मागोमाग इंद्रादी देवताही पूजास्थळी आकृष्ट होतात. अशा तर्‍हेने पाचही तत्त्वांचा लाभ मिळून वास्तूत सुख, ऐश्वर्य, समाधान व संपत्ती नांदते.

लक्ष्मीपूजन
सामान्यत: अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांना नाही; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य ठरते.

सण साजरा करण्याची पद्धत
`प्रात:काळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध व ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी लतापल्लवांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता व कुबेर यांची पूजा, असा या दिवसाचा विधी आहे.

लक्ष्मीपूजन करतांना एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. काही ठिकाणी कलशावर ताम्हण ठेवून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. लक्ष्मीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवतात. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची व साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्‍तेष्टांना वाटतात. मग हातातील चुडीने पितृमार्गदर्शन करतात. (हातातील पलिता दक्षिण दिशेकडे दाखवून पितृमार्गदर्शन करतात.) ब्राह्मणांना व अन्य क्षुधापीडितांना भोजन घालतात. रात्री जागरण करतात. पुराणांत असे सांगितले आहे की, आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते व आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जिथे स्वच्छता, शोभा आणि रसिकता आढळते, तिथे तर ती आकर्षित होतेच; शिवाय ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्‍त व क्षमाशील पुरुष आणि गुणवती व पतिकाता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.'

या पूजेत धने व साळीच्या लाह्या वाहायच्या असतात. `धने\' हा शब्द धनवाचक आहे. `लाह्या\' हे समृद्धीचे प्रतीक आहे. थोड्याशा साळी भाजल्या की, त्याच्या ओंजळभर लाह्या होतात. लक्ष्मीची समृद्धी असली पाहिजे; म्हणून समृद्धीचे प्रतीक असलेल्या लाह्या वाहतात.

कोजागरी पौर्णिमा व श्री लक्ष्मीपूजन
कोजागरीस लक्ष्मी व इंद्र या देवतांचे पूजन सांगितले आहे, तर आश्विन अमावास्येस लक्ष्मी व कुबेर या देवतांचे पूजन सांगितले आहे.
श्री लक्ष्मी व कुबेर : लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे, तर कुबेर हा संपत्ती-संग्राहक आहे. अनेकांना पैसा मिळवण्याची कला साध्य असते; पण तो राखावा कसा, हे माहीत नसल्यामुळे अनाठायी खर्च होऊन पैसा त्यांच्याजवळ शिल्लक रहात नाही. किंबहुना पैसा मिळवण्यापेक्षा तो राखणे, सांभाळणे व योग्य ठिकाणीच खर्च करणे हे फार महत्त्वाचे आहे. कुबेर ही देवता `पैसा कसा राखावा\', हे शिकवणारी आहे, कारण तो धनाधिपती आहे; म्हणून या पूजेसाठी लक्ष्मी व कुबेर या देवता सांगितलेल्या आहेत. सर्वच लोक विशेषत: व्यापारी ही पूजा मोठ्या उत्साहाने व थाटामाटात करतात.

अलक्ष्मी नि:सारण

महत्त्व :
गुण निर्माण केले तरी दोष नाहीसे झाले, तरच गुणांना महत्त्व येते. येथे लक्ष्मीप्राप्‍तीचा उपाय झाला, तसेच अलक्ष्मीचा नाशही झाला पाहिजे; म्हणून या दिवशी नवीन केरसुणी विकत घेतात. तिला `लक्ष्मी\' म्हणतात.
कृती : `मध्यरात्री नवीन केरसुणीने घरातील केर सुपात भरून तो बाहेर टाकावा', असे सांगितले आहे. याला `अलक्ष्मी (कचरा, दारिद्र्य) नि:सारण' म्हणतात. एरव्ही कधीही रात्री घर झाडणे वा केर टाकणे करायचे नसते. फक्‍त या रात्री ते करायचे असते. कचरा काढतांना सुप व दिमडी वाजवूनही अलक्ष्मीला हाकलून लावतात.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होणार्‍या अयोग्य कृती व त्यामुळे सूक्ष्मातून होणारे परिणाम
दिवाळीच्या दिवशी कृत्रिम, लुकलुकणारी व विचित्र आकाराची रोषणाई केल्याने प्रकाशाच्या स्वरूपात तम ऊर्जात्मक शक्‍तीचे प्रक्षेपण होते. यामुळे मांत्रिकांना वातावरणात काळी शक्‍ती सोडता येते. ही रोषणाई बघणार्‍या जिवांवरही काळे आवरण येते.

कृत्रिम रोषणाई केल्यामुळे होणारे परिणाम : दिवाळीच्या दिवशी केल्या जाणार्‍या कृत्रिम रोषणाईमुळे वातावरणात प्रवाहित होणार्‍या ईश्‍वराच्या तारक लहरी कृत्रिम रोषणाईतून प्रक्षेपित होणार्‍या तेजोमय तमात्मक ऊर्जेच्या आच्छदनात्मक प्रकाशाच्या ऊर्ध्वगामी व अधोगामी प्रक्षेपणामुळे गतीच्या अभावी संचारणात्मक अवस्थेतून स्थिर स्वरूपात बद्ध होतात. वातावरणात असणार्‍या कनिष्ठ वाईट शक्‍ती व मांत्रिकांद्वारे सोडल्या जाणार्‍या चक्राकार काळया शक्‍तीचे साठे वायूमंडलात गतीमान होऊन पूर्ण वातावरणाच्या नैसर्गिक क्षमतेला शोषले जाते व वातावरण रज-तमाने भारीत आणि स्मशानाप्रमाणे त्रासदायक बनते.

लुकलुकणारी रोषणाई केल्यामुळे होणारे परिणाम : लुकलुकणारी रोषणाई केल्यामुळे आकर्षणतेमुळे त्यातून प्रक्षेपित होणार्‍या रजांकित आच्छादनाबरोबर मांत्रिक त्या प्रकाशाचा वापर करून रोषणाई बघणार्‍या जिवांवर काळया शक्‍तीचे मोठ्या प्रमाणात प्रक्षेपण करतात. त्यामुळे जिवाभोवती ५-७ फूट एवढ्या मोठ्या आवरणाची निर्मिती करणे मांत्रिकांना सहजरीत्या शक्य होते.

विचित्र आकारात रोषणाई केल्यामुळे होणारे परिणाम : एका रेषेत रोषणाई न केल्यामुळे रोषणाईच्या विचित्र आकारांच्या माध्यमातून मांत्रिकांना विविध प्रकारचे काळया शक्‍तीचे समूह एकाच वेळेस पूर्ण वायूमंडलात प्रक्षेपित करता येतात. - एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ८.१०.२००६, रात्री ८.२२)


भाऊबीज (यमद्वितीया)
 

इतिहास : या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला; म्हणून या दिवसाला `यमद्वितीया' असे नाव मिळाले.

महत्त्व :
अ. अपमृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी व यमद्वितीया या दिवशी मृत्यूची देवता `यमधर्म' हिचे पूजन करतात.
आ. `या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो व त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जिवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो.'

सण साजरा करण्याची पद्धत

यमतर्पण, यमदीपदान व यमाची प्रार्थना करणे :
अपमृत्यू निवारणार्थ `श्री यमधर्मप्रीत्यर्थं यमतर्पणं करिष्ये ।' असा संकल्प करून यमाच्या चौदा नावांनी तर्पण करावे. हा विधी पंचांगात दिलेला असतो. `याच दिवशी यमाला दीपदान करायचे असते. यम ही मृत्यू व धर्म यांची देवता आहे. `प्रत्येक माणसाला मरण आहे\', ही जाणीव सतत असणे आवश्यक आहे; कारण त्यामुळे माणसाच्या हातून वाईट कार्य वा धनाचा अपव्यय होणार नाही. तेव्हा यमाला दीपदान करून सांगायचे, `हे यमा, या दीपाप्रमाणे आम्ही सतर्क आहोत, जागरूक आहोत. जागरूकतेचे, प्रकाशाचे प्रतीक असलेला दीप तुला अर्पण करत आहोत, त्याचा स्वीकार कर. तुझे आगमन केव्हा होईल, हे आम्हाला माहीत नाही; म्हणून आम्ही आमचा हिशोब वेळच्या वेळी ठेवतो, ज्यामुळे अर्धवट राहिलेल्याची चिंता करण्याची वेळ येत नाही; कारण आम्हाला माहीत आहे की, तू अचानक कधीही येऊ शकतोस.' - प.पू. परशराम माधव पांडे महाराज, सनातन आश्रम, पनवेल.

बहिणीने भावाला ओवाळणे
या दिवशी भावाने बहिणीकडे जावे व बहिणीने भावाला ओवाळावे. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल, तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून त्याला ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळावे. `या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वत:च्या घरी पत्‍नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे व तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल, तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे.'


अभ्यंगस्नान
 

अभ्यंगस्नानाच्या वेळी स्नानापूर्वी तेल लावण्याचे महत्त्व व नामजप करत किंवा श्लोक म्हणत स्नान करण्याचे महत्त्व

१. अर्थ :
पिंडाच्या अभ्युदयासाठी केलेले स्नान म्हणजेच अभ्यंगस्नान.

२. स्नानापूर्वी तेल लावण्याचे महत्त्व :
अभ्यंग म्हणजेच स्नानापूर्वी तेल लावण्याने पिंडातील चेतनेतील प्रवाहाला अभंगत्व, म्हणजेच अखंडत्व प्राप्‍त होते. स्नानापूर्वी देहाला तेल लावल्याने पेशी, स्नायू, तसेच देहातील पोकळया जागृत अवस्थेत येऊन पंचप्राणांना कार्यरत करतात. पंचप्राणांच्या जागृततेमुळे देहातील टाकाऊ वायू ढेकरा, जांभया इत्यादीद्वारे बाहेर पडतात. यामुळे देहातील पेशी, स्नायू, तसेच अंतर्गत पोकळया चैतन्य ग्रहण करण्यात संवेदनशील बनतात. हा टाकाऊ वायू किंवा देहात घनीभूत झालेली उष्ण टाकाऊ ऊर्जा कधी कधी लहरींच्या रूपात डोळे, नाक, कान, तसेच त्वचेची रंध्रे यांतून बाहेर पडते; म्हणून तेल लावून झाल्यावर कधी कधी चेहरा व डोळे लाल होतात.

३. नामजप करत किंवा श्लोक म्हणत स्नान करण्याचे महत्त्व : नामजप करत किंवा श्लोक म्हणत स्नान केल्याने पाण्यातील अंगीभूत चैतन्य जागृत होऊन त्याचा देहाला स्पर्श होऊन चैतन्याचे संक्रमण पेशीपेशींपर्यंत झाल्याने देहाला देवत्व प्राप्‍त होऊन दिवसभरातील कृती चैतन्याच्या स्तरावर करण्यास देह सक्षम बनतो.

४. फायदे
अ. तेलाच्या त्वचेवरील घर्षणात्मक मर्दनाने देहातील सूर्यनाडी जागृत होऊन पिंडातील चेतनेलाही सतेज बनवते. ही सतेजता देहातील रज-तमात्मक लहरींचे विघटन करते. ही एक प्रकारची शुद्धीकरण प्रक्रियाच आहे. चैतन्याच्या स्तरावर घडलेल्या शुद्धीकरण प्रक्रियेने पिंडातील चेतनेतील प्रवाहाला अभंगत्व प्राप्‍त झाल्याने जिवाचे प्रत्येक कर्म हे साधना म्हणून घडते.

आ. या कर्मामुळे जिवाच्या देहात सत्त्वगुणाचे संवर्धन होण्यास मदत झाल्याने जिवाचा अभ्युदय साधतो. अभ्युदय म्हणजे उत्कर्ष. जिवाचा सत्त्वगुणसंवर्धनाकडे होत असलेला नित्य प्रवास, म्हणजेच त्याचा अभ्युदय होय. यासाठी अभ्यंगस्नानाला अत्यंत महत्त्व आहे.

इ. अभ्यंगस्नानातून निर्माण झालेल्या चैतन्याच्या स्तरावर घडणारी प्रत्येक कृती जिवाच्या हातून साधना म्हणून झाल्याने या कृतीमुळे वायूमंडलाचीही शुद्धी होते.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १२.९.२००७, दुपारी २.०८)


सनातन-निर्मित आकाशकंदिलाची वैशिष्ट्ये
 

दीपावली सणामध्ये आकाशकंदिलाला अनन्य साधारण महत्त्व आहे. राष्ट्ररक्षण व धर्मजागृती या अनुषंगाने सनातनने तयार केलेल्या सात्त्विक आकाशकंदिलाबद्दल सनातनचे साधक श्री. निषाद देशमुख यांना एक ज्ञानी यांनी दिलेली माहिती येथे देत आहोत.

आकाशकंदिलाचा शून्यात्मक आकार

अ. निर्गुण तत्त्व आकृष्ट होणे :
आकाशकंदिलाच्या शून्यात्मक आकारातून वातावरणात संचारणात्मक स्थितीस्वरूपात असलेले निर्गुण तत्त्व भोवर्‍याच्या स्वरूपात आकृष्ट होते.

आ. शून्याशी निगडित लहरींना आकर्षित व प्रक्षेपित करणे : आकाशकंदिलाच्या विलक्षणात्मक आकारस्वरूपात शून्याशी निगडित लहरींना आकृष्ट करून त्यांना संचारणता प्रदान करून वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता असते.

इ. शून्यात्मक पोकळीची व त्यातून कार्यदर्शकतेची निर्मिती होणे : आकाशकंदिलाच्या आकारकक्षेत सूक्ष्म शून्यात्मक पोकळीची निर्मिती होते व ती पोकळी दृश्य बंधनातून साकार होऊन कार्यदर्शकतेच्या अवस्थेत संचारते.

ई. सर्व दिशांना चक्राकार लहरींचे प्रक्षेपण होणे : आकाशकंदिलावर निर्माण होणार्‍या शिवमय प्रभावलयांमुळे सर्व दिशांना भोवर्‍याच्या स्वरूपात चक्राकार लहरींचे प्रक्षेपण होते.

उ. इच्छा, क्रिया व ज्ञान यांची सूक्ष्म-वलये निर्माण होणे : आकाशकंदिलाजवळ इच्छा, क्रिया आणि ज्ञान या ईश्‍वराच्या
शक्‍तीस्वरूपाचे दर्शक असणारी सूक्ष्म वलये निर्माण होतात. आकाशकंदिलाच्या दोन्ही सपाट भागांतून सम प्रमाणात वलयांकित होत जाणार्‍या चैतन्याने भारीत वलयांचे प्रक्षेपण होते.
 
आकाशकंदिलामुळे होणारे सूक्ष्मातील फायदे

अ. कनिष्ठ देवतांच्या लहरी आकर्षित झाल्यानेही घराची शुद्धी होणे :
आकाशकंदिल घरी ठेवल्यावर घराची ०.२५ टक्के शुद्धी होते. आकाशकंदिल घरात ठेवल्यावर त्यात वायूमंडलात संचारत असलेल्या कनिष्ठ देवतांच्या लहरींचे आकर्षण होऊन वास्तूची काही प्रमाणात शुद्धी होते.

आ. घरावर सूक्ष्म संरक्षककवच तयार होणे : आकाशकंदिल घराच्या बाहेरच्या बाजूस लावल्यास वातावरणात प्रक्षेपित होत असलेल्या ईश्‍वराच्या चक्राकार लहरींचे एकत्रीकरण होऊन त्यांचे घरावर कवचाच्या स्वरूपात प्रक्षेपण केले जाते. त्यामुळे घरावर सूक्ष्म स्वरूपात संरक्षककवच निर्माण होते.

इ. दिवसा ईश्‍वरी चैतन्य ग्रहण करून रात्री त्याचे प्रक्षेपण करणे : दिवसा आकाशकंदिल ईश्‍वरी चैतन्य ग्रहण करून रात्री त्याचे प्रक्षेपण करतोे. दिवसा केले जाणारे प्रक्षेपण हे ब्राह्मतेजाने भारीत असते, तर रात्री प्रक्षेपित करत असलेले तत्त्व हे क्षात्रतेजाने भारीत असते.

ई. सतत ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांनी भारीत विचारांचे समाजात प्रक्षेपण होणे : आकाशकंदिलावर लिहिलेला मजकूर शब्दब्रह्मस्वरूपाचा असल्यामुळे ऊर्जेचे वलय निर्माण होऊन त्या माध्यमातून सतत ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांनी भारीत विचारांचे समाजात प्रक्षेपण होत रहाते.
 
उ. शेजारच्या घराचीही शुद्धी होणे : घरात आकाशकंदिल लावल्यावर त्यातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे शेजारच्या घराचीही काही प्रमाणात शुद्धी होते. (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून)


फटाक्यांचे आध्यात्मिक दुष्परिणाम

फटाक्यांमुळे वातावरण चैतन्यरहित व वाईट शक्‍तींनी युक्‍त बनणे, शारीरिक व मानसिक त्रास होणे आणि वाईट शक्‍तीचा शरीरात शिरकाव होण्याचाही संभव असणे

१. वातावरण चैतन्यरहित बनणे :
फटाक्यातून निर्माण होणार्‍या तप्‍त दूषित वायूच्या निर्मितीमुळे वायूमंडलातील रज-तम कणांच्या हालचालींना वेग प्राप्‍त होतो, तसेच या तेजतत्त्वरूपी विषारी वायूमुळे वातावरणातील सत्त्वकणांचे विघटन होऊन वातावरण चैतन्यरहित बनते.

२. फटाक्यांचा स्फोट झालेले ठिकाण वेगवेगळया प्रकारच्या वाईट शक्‍तींनी युक्‍त बनणे : रज-तम कणांच्या वेगवान ऊर्जास्रोतातील आकर्षणशक्‍तीमुळे वायूमंडलात भ्रमण करणार्‍या वाईट शक्‍तींचे कोष कार्यरत होऊन त्या त्या स्तरातील कक्षेकडे आकर्षित झाल्याने फटाक्यांचा स्फोट झालेले ठिकाण वेगवेगळया प्रकारच्या वाईट शक्‍तींनी युक्‍त बनते.

३. देहातील सात्त्विकताही नष्ट होणे : फटाक्यांच्या आवाजातून निर्माण होणार्‍या त्रासदायक ध्वनीकंपनांमुळे वायूमंडलात वेड्यावाकड्या व अनियमित गतीने कार्य करण्याची क्षमता असणार्‍या सुप्‍त त्रासदायक लहरी कार्यरत झाल्याने या लहरींच्या प्रभावाचा परिणाम होऊन जिवाच्या शरीरातील रज-तम कणांच्या हालचालींत वाढ होऊन देहातील सात्त्विकताही नष्ट होते.

४. शारीरिक व मानसिक त्रास होणे : याचे दुष्परिणाम होऊन देहात झालेल्या रज-तम कणांच्या शिरकावामुळे पंचप्राणांच्या कार्यावर परिणाम होऊन अनेक जुनाट व्याधी डोके वर काढतात किंवा नवीन व्याधी उद्‌भवतात. त्यामुळे मनाला अस्थिरता प्राप्‍त होते. फटाक्यातून प्रक्षेपित होणार्‍या रज-तम कणांतून निर्माण होणार्‍या सूक्ष्म दूषित वायूचा परिणाम मस्तिष्कपोकळीवर होऊन मेंदूचे कार्य मंदावून जीव सुस्त बनतो. - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १६.११.२००५, दुपारी २.३१)


हिंदूंनो, सणासुदीच्या मंगलसमयी तुमच्याकडून अमंगल तर घडत नाही ना ?

दिवाळी, गणेशोत्सव यांच्या काळात काय घडते ?

१. देवता व राष्ट्रपुरुष यांची नावे वा चित्रे असलेले फटाके वाजवले जातात. त्यामुळे देवता व राष्ट्रपुरुष यांच्या नावांच्या/चित्रांच्या अक्षरश: चिंधड्या उडतात.


          
२. भेट म्हणून दिल्या जाणार्‍या मिठाईच्या खोक्यांच्या वेष्टनांवर देवतांची चित्रे वा नावे असतात. बहुतेक वेळा हे खोके रिकामे झाल्यावर कचर्‍यात टाकले जातात.

३. देवतांची चित्रे वा नावे असलेली लॉटरीची तिकिटे विकत घेतली जातात. उपयोग झाल्यानंतर ती चुरगळून फेकून दिली जातात.
अध्यात्मशास्त्रानुसार देवतेचे नाव वा रूप असणे, म्हणजेच तेथे देवतेचे तत्त्व, म्हणजेच देवतेचे सूक्ष्मातून अस्तित्व असणे. म्हणून वरील प्रकार म्हणजे देवतांची विटंबना होय. यामुळे देवतांची अवकृपा होते. अशाच प्रकारे राष्ट्रपुरुषांचीही विटंबना होत असते. यासाठी,
१. अशा प्रकारचे अधर्माचरण स्वत: टाळा !
२. याविषयी इतरांचेही प्रबोधन करा !
३. हेतूपुरस्सर विटंबना करणार्‍यांचा निषेध करा व त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार टाका !
४. धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून पोलिसांत तक्रार करा !

 

सात्त्विक शुभेच्छापत्र पाठवा |  दैनिक मुख्य पान